25 March 2019

News Flash

कुतूहल : तू नाहीस तर मी नाही..

१८४५ मध्ये मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाचे वायू द्रवरूपात मिळविण्याचे संशोधन चालू होते.

गिर्यारोहक आणि पाणबुडे ऑक्सिजनची नळकांडी पाठीवर घेऊन फिरतात.

अतिउंचावर ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते आणि पाण्यातील ऑक्सिजन आपण श्वसनासाठी वापरू शकत नाही. त्यामुळे गिर्यारोहक आणि पाणबुडे ऑक्सिजनची नळकांडी पाठीवर घेऊन फिरतात. याव्यतिरिक्त ऑक्सिजनचा उपयोग केला जातो तो रुग्णालयात. रुग्ण ऑक्सिजनवर आहे असे म्हणताच, रुग्णाची तब्येत किती गंभीर आहे हे लक्षात येते. रुग्णाला श्वसनात अडथळा येत असेल, उपचारात फुप्फुसाला आराम देण्याची आवश्यकता असेल किंवा रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असेल तेव्हा रुग्णाला नळकांडय़ांमधून ऑक्सिजन दिला जातो. ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार नळीद्वारे, मास्क (आच्छादक) किंवा मच्छरदाणीसारखा हवाबंद तंबू अशा विविध प्रकारे रुग्णाला ऑक्सिजन पुरवला जातो. या वैद्यकीय उपचारात जास्त दाबाखाली असलेला ऑक्सिजन वायू किंवा द्रव ऑक्सिजनचा वापर केला जातो.  एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस शास्त्रज्ञांना हवा द्रवरूप करून, हवेचे घटक वेगळे करण्यात यश आले होते. वायू द्रवरूपात मिळविण्याचेही संशोधन चालू होते. १८४५ मध्ये मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाचे वायू द्रवरूपात मिळविण्याचे संशोधन चालू होते. काही वायू द्रवरूपात मिळविण्यात त्याला यश आले, पण बरेच प्रयत्न करूनही सहा वायू द्रवरूपात मिळविण्यात त्याला अपयश आले आणि त्यातील एक ऑक्सिजन होता.

१८७७ मध्ये फ्रान्सच्या लुइस पॉल कायलिटिट आणि स्वित्र्झलडच्या राउल पिक्टेट यांना द्रवरूप ऑक्सिजनचे काही थेंब मिळविण्यात यश मिळाले. १८८३ मध्ये (पोलंड देशातील) पॉलिश शास्त्रज्ञ झायगमट रोब्लेएस्की आणि करोल ओलशिएस्की या दोघांना चांगल्या प्रमाणात द्रव ऑक्सिजन मिळविण्यात यश मिळाले. ऑक्सिजन वायू उणे १८३ अंश सेल्सिअस तापमानाला थंड केल्यावर त्याचे निळसर रंगाच्या द्रवरूप ऑक्सिजनमध्ये रूपांतर होते. द्रव ऑक्सिजनचा वापर वैद्यकीय क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात तसेच विमानात आणि अंतराळयानातही केला जातो. रॉकेट आणि क्षेपणास्त्रे उडवताना इंधन म्हणून द्रव ऑक्सिजनचा वापर करतात. ऑक्सिजन जीवनासाठी आवश्यक असला तरी ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हा नियम इथेही लागू होतो. जास्त दाबाखाली असलेला ऑक्सिजन किंवा साधारण दाबाखाली असलेला ऑक्सिजन जास्त वेळ श्वसन केल्याने शरीरास अपायदेखील होऊ शकतो; त्यामुळे गिर्यारोहक, पाणबुडे किंवा रुग्णालयात ऑक्सिजन वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. याशिवाय शुद्ध ऑक्सिजनचे श्वसनही अपायकारक असते. त्यासाठी ऑक्सिजनच्या नळकांडय़ात ऑक्सिजनबरोबर नायट्रोजन आणि हेलिअम हे वायूही वापरले जातात.

-अनघा वक्टे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on February 26, 2018 5:16 am

Web Title: importance of oxygen