१० ऑक्टोबर १९७० रोजी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवून फिजी हा स्वतंत्र, सार्वभौम देश अस्तित्वात आला. तब्बल ९६ वर्षांचा फिजीचा वसाहतकाळ संपल्यानंतर स्वायत्त फिजीने ब्रिटिश पद्धतीची राजकीय व्यवस्था स्वीकारली. येथील दोन सभागृहे असलेल्या संसदेच्या वरिष्ठ प्रतिनिधीगृहाचे सदस्य फिजीच्या विविध राजघराण्यांतील असतात. स्वतंत्र फिजीला राष्ट्रकुल संघटनेचा सदस्य बनवून ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ द्वितीयकडे त्या देशाचे औपचारिक राष्ट्रप्रमुखपद देण्यात आले. फिजीच्या बहुसंख्य जनतेचा फिजीने राष्ट्रकुल संघटनेचा सदस्य बनण्यास विरोध होता. त्यातच १९८७ मध्ये तेथील लष्करप्रमुखाने दोन वेळा उठाव केल्यानंतर स्वतंत्र फिजीचे राष्ट्रकुल संघटनेतील सदस्यत्व रद्द करण्यात येऊन ते प्रजासत्ताक राष्ट्र असल्याचे जाहीर करण्यात आले.

फिजीत अनेक वंशांचे लोक राहतात. मात्र, प्रजासत्ताक फिजीच्या राज्यघटनेत मूळच्या फिजीयन वांशिक लोकांना संसदेत प्रतिनिधित्व अधिक होते. भारतीय-फिजीयन वंशाच्या लोकांसाठी फक्त दोनच जागा होत्या. १९९७ साली राज्यघटनेत बदल करण्यात येऊन सर्व वंशांना सारखे प्रतिनिधित्व देण्यात आले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत महेंद्र चौधरी हे मूळ भारतीय वंशाचे नेते फिजीचे पंतप्रधान झाले. मात्र पुढे २०१४ पर्यंत झालेल्या निवडणुका राजकीय विरोधकांचे उठाव, हिंसक कारवायांमुळे नीट पार पडल्या नाहीत. २०१४ मध्ये शांततेत, लोकशाही पद्धतीने पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेले फ्रँक बैनिमारमा हे सध्या फिजीचे पंतप्रधान आहेत.

सुवा हे फिजीच्या राजधानीचे शहर. साखर उत्पादन आणि पर्यटन ही या देशाच्या उत्पन्नाची प्रमुख साधने होत. फिजीच्या बेटांवरचे पांढऱ्याशुभ्र रेतीचे किनारे, प्रवाळाची लहान बेटे, निळाशार समुद्र यांचे मोठे आकर्षण इथे येणाऱ्या पर्यटकांना असते. पर्यटनाशिवाय फिजी बेटांवर असलेली नैसर्गिक संसाधने, ऊसशेती, इमारती लाकूड आणि विपुल प्रमाणात मिळणारे मासे यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. दहा लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या फिजीमध्ये मूळचे फिजीयन वंशाचे लोक ५५ टक्के, तर भारतीय-फिजी वंशाचे सुमारे ४० टक्के लोक आहेत. या बेटांवरचे ६५ टक्के लोक ख्रिस्ती धर्मपालन करणारे, तर २८ टक्के लोक हिंदूधर्मीय आहेत.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com