बार्बाडोसच्या अंतर्गत राजकारणात तिथली आफ्रिकी मंडळी भाग घेऊ लागली आणि त्याबरोबरच त्यांचे काही राजकीय पक्षही निर्माण झाले. १९६१ साली येथील अंतर्गत प्रशासकीय निवडणुका होऊन हे प्रशासन पूर्णपणे बार्बाडोसच्या जनतेकडे आले. त्यापाठोपाठ तेथील राजकीय पक्षांची ब्रिटनकडे बार्बाडोसच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली. अखेरीस ब्रिटिश सरकारकडून बार्बाडोसला ३० नोव्हेंबर १९६६ रोजी स्वातंत्र्य देण्यात आले. एरॉल बॅरो हे या नवजात सार्वभौम बार्बाडोसचे पहिले पंतप्रधान झाले. तिथल्या जनतेने ब्रिटिश राष्ट्रकुल संघटनेचे सदस्य म्हणून राहणे पसंत केले आणि राष्ट्रप्रमुखपद ब्रिटिश सम्राज्ञी एलिझाबेथ-द्वितीयकडे देण्यात आले. ब्रिटिश सरकारने नियुक्त केलेला गव्हर्नर जनरल तिचे प्रतिनिधित्व करतो. सध्या बार्बाडोसमध्ये २०१८ साली निवडून आलेल्या मिया एमोर मोटली या पंतप्रधानपदी आहेत. त्यांच्या सरकारने- बार्बाडोसच्या स्वातंत्र्याच्या ५५ व्या वर्धापनदिनी, म्हणजे ३० नोव्हेंबर २०२१ रोजी राणीचे राष्ट्रप्रमुखपद बरखास्त करून त्याजागी स्थानिक निर्वाचित लोकप्रतिनिधी राष्ट्राध्यक्षपदी नियुक्त केला जाईल, अशी घोषणा केली आहे आणि त्याच दिवशी देशात प्रजासत्ताक सरकारही स्थापन केले जाईल, असेही जाहीर केले आहे.

सुमारे तीन लाख लोकसंख्येच्या बार्बाडोसमधील साधारणत: ९० टक्के लोक हे आफ्रो-कॅरिबियन मिश्र वंशाचे आहेत. यांना ‘बाजान’ या नावाने संबोधले जाते. उर्वरितांमध्ये इंग्लिश, आयरिश, इटालियन, चिनी आणि भारतीय वंशाचे लोक आहेत. भारतीय वंशाच्या बार्बाडोनियन्समध्ये विशेषत: गुजराती मुस्लीम आहेत. इंग्रजी ही येथील राजभाषा आणि सामान्यत: प्रचलित भाषाही आहे. येथील ९५ टक्के लोक ख्रिस्ती धर्मीय आहेत. उर्वरितांमध्ये हिंदू, मुस्लीम आणि ज्यू धर्मीयांचा समावेश आहे. ब्रिजटाऊन हे बार्बाडोसचे राजधानीचे शहर.

सन १६४० पासून बार्बाडोसची अर्थव्यवस्था उसाचे मळे व पर्यायाने साखर उत्पादन आणि निर्यात यांमुळे भक्कम पायावर उभी आहेच; परंतु तेथील सरकारने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात केवळ ऊसमळ्यांवर अवलंबून न राहता नवनवीन औद्योगिक क्षेत्रांना चालना देऊन पर्याय निर्माण केले आहेत. क्रिकेट हा येथील अत्यंत लोकप्रिय खेळ. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला बार्बाडोसने सर गारफिल्ड सोबर्स, वेस्ले हॉल, माल्कम मार्शल यांसारखे अनेक नामवंत खेळाडू दिलेले आहेत.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com