23 September 2020

News Flash

जे आले ते रमले.. : एस्थर डेव्हिड

धार्मिक छळामुळे त्रासलेली इस्रायलमधील ज्यू कुटुंबे प्रथम भारतात आश्रयासाठी आली ती अलिबागच्या परिसरात.

धार्मिक छळामुळे त्रासलेली इस्रायलमधील ज्यू कुटुंबे प्रथम भारतात आश्रयासाठी आली ती अलिबागच्या परिसरात. अलिबाग, मुंबई, ठाणे या भागात स्थायिक झालेल्या या ज्यू म्हणजेच यहुदींना, ‘बेने इस्रायली’ म्हणतात. या समाजातले काही लोक भारताच्या इतर प्रांतांमध्ये स्थायिक झाले. अहमदाबादस्थित इस्थर डेव्हिड या प्रसिद्ध लेखिका, कलाकार, कलासमीक्षक आणि शिल्पकार याही बेने इस्रायली ज्यू आहेत. १९४५ साली अहमदाबादेत जन्मलेल्या इस्थरचे वडील रूबेन डेव्हिड हे प्रथम एक निष्णात शिकारी होते आणि पुढे ते प्राण्यांचे डॉक्टर झाले! त्यांनी अहमदाबाद येथे कमला नेहरू झूलॉजिकल गार्डन स्थापन केलं.

शालेय शिक्षणानंतर महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी, बडोदे येथे फाइन आर्ट आणि कलेतिहासात पदवी शिक्षण पूर्ण करून इस्थर अहमदाबादच्या ‘एनआयडी’ व ‘सेप्ट’मध्ये कलेतिहासाचे अध्यापन करू लागल्या. तत्कालीन प्रसिद्ध शिल्पकार सांखो चौधरी यांनी इस्थरना शिल्पकलेचे शिक्षण दिले. पुढे त्या अहमदाबाद येथील शेठ चिमणलाल नगीनदास फाइन आर्ट कॉलेजात अध्यापनाचे काम करीत असताना इंग्रजी दैनिकाच्या स्थानिक आवृत्तीत कलासमीक्षा तसेच फेमिनामध्ये स्तंभलेखन करू लागल्या. कलासमीक्षक म्हणूनही त्यांचं नाव झालं.

वयाच्या ४६व्या वर्षी इस्थर यांनी लिहिलेली ‘द वॉल्ड सिटी’ ही पहिली कादंबरी, पुढे चेन्नईच्या ईस्ट-वेस्ट बुक पब्लिशर्सनी प्रकाशित केली. त्यांच्या साहित्य संपदेपैकी ‘द वॉल्ड सिटी’ (१९९७), ‘अहमदाबाद : अ सिटी वुइथ पास्ट’ (२०१६) , तसेच ‘बाय द साबरमती’, ‘द बुक ऑफ इस्थर’, ‘द बुक ऑफ रॅचेल’, ‘द मॅन वुइथ इनॉर्मस िवग्ज’, ‘माय फादर्स झू’ या कादंबऱ्या  वाचकप्रिय झाल्या. ‘द वॉल्ड सिटी’चं गुजराती भाषांतर रेणुका सेठ यांनी केलं. या कादंबरीचे फ्रेंच भाषेतही भाषांतर झालं. इस्थर डेव्हिड यांच्या ‘द बुक ऑफ रॅचेल’ या कादंबरीला २०१० सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. इस्थर यांचे आई-वडील त्यांच्या धार्मिक रूढी, परंपरा यांचे पालन करण्यात तसे उदासीनच होते, पण इस्थर यांच्या बहुतेक साहित्यात ज्यू समाजाशी संबंधित कथानक दिसते; ते त्यांच्या अभ्यासामुळे!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 2:50 am

Web Title: indian author esther david
Next Stories
1 मूलद्रव्यांचे नामकरण-३
2 सुलोचना – रुबी मायर्स
3 मूलद्रव्यांचे नामकरण – २
Just Now!
X