पूर्वीच्या मुंबई प्रांतातील अथणी (आता कर्नाटकात) येथे जन्मलेल्या कोकटनूर यांनी बीएस्सी केल्यावर पुण्याच्या रानडे औद्योगिक संस्थेत रसायनतज्ज्ञ म्हणून एक वर्ष काम केले. नंतर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली व ते कॅलिफोíनया राज्यातील ओकलंड शहरी पुढील शिक्षणासाठी गेले. बटाटय़ावर संशोधन करण्यासाठी ते तेथे गेले होते. पण त्या वर्षी पीक बुडाल्याने त्यांना संशोधन करता आले नाही आणि शिष्यवृत्ती परत करावी लागली. मग भारतात परत येण्याऐवजी ते तेथील ‘कॅलिफोíनया फ्रुट केनर्स’ या कंपनीत संशोधक म्हणून कामाला लागले. तेथे त्यांनी अनेक प्रयोग केले. नंतर त्यांनी मिनेसोटा विद्यापीठात एमएस्सी आणि पीएचडी केली. ते शिकत असताना त्यांनी लिहिलेले शोधनिबंध अमेरिकन केमिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. त्यांचा पीएचडीचा प्रबंधही त्यात प्रसिद्ध झाला. १९२२ साली त्यांनी रसायनशास्त्रातील औद्योगिक सल्लागार म्हणून स्वत:ची कंपनी काढली. १९२८ साली क्लोरिन आणि कॉस्टिक सोडय़ातील तज्ज्ञ म्हणून रशियन सरकारच्या पंचवार्षकि योजनेला सल्ला देण्यासाठी ते गेले. नंतर भारतातील ‘श्रीशक्ती अल्कली’ कारखान्यात सल्लागार व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले. १९३३ सालापर्यंत भारतातील अमेरिकन ट्रेड कमिशनवर सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले.
 डॉ. कोकटनूर यांच्या नावावर डझनभर शोध आणि ३० पेटंट्स आहेत. हे सर्व शोध औद्योगिक क्षेत्राला उपयोगी पडणारे आहेत. विमानाच्या पंख्याला डोप नावाचे द्रव्य लागते. त्याची निर्मिती धोकादायक समजली जाई. पण कोकटनूर यांनी ती निर्धोक करून दिली. रेड डाय हा रंग कापसाच्या आणि लोकरीच्या कापडात मिसळण्यासाठी लागे. ही खर्चीक प्रक्रिया त्यांनी स्वस्तात उपलब्ध करून दिली. स्वयंपाकघरातील प्रेशर कुकिंगचे ते एक संशोधक आहेत.
‘मॅन ऑफ सायन्स’ म्हणून त्यांचा अमेरिकेत गौरव झाला. युनायटेड स्टेट्स पेटंट ऑफिसात त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
अ. पां. देशपांडे, (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – गणाधीश जो..
अनेकांच्या नित्यपाठातील आणि शाळेत घोकून घेतलेल्या त्या श्लोकापाशी प्रथमच थांबलो. थबकलो आणि विचारात पडलो. शब्दामागून शब्द म्हणत होतो, गेली अनेक र्वष पण कधी त्या शब्दात कोडं आहे, हे कोणी ना सांगितलं ना कधी विचारात घेतलं.
त्या श्लोकाचा पाठपुरावा करता करता कधी स्थिरचित्त झालो कळलं नाही. केवळ स्थिरचित्त नाही तर मनावाटे शरीरातल्या प्रत्येक घडामोडीवर एकाग्र झालो. शरीरातल्या काही लयबद्ध तर काही सूक्ष्म हालचाली जाणवू लागल्या.
मनातल्या शंकांमुळे अस्वस्थ झालेले हृदयाचे ठोके, पुढे करायच्या कामातल्या कौशल्याची उत्सुकता आणि श्वासानं क्षणोक्षणी शरीरात उत्फुल्ल होणारी ऊर्जा या सर्व गोष्टींचा अनुभव येऊ लागला.
आपल्या मनातल्या सद्भावना आणि राग, लोभ, मत्सर अशा दुर्गुणांचा इतिहास आठवू लागला. या सर्व मानवी भावभावनांचा उगम आपल्या मनातल्या संचितात होतो. मनानं आणि शरीरानं केलेलं कर्म याचा हिशेब आपल्या ठायी जिवंत असल्याची जाणीव झाली.
मानवी जीवनाच्या या अनुभूतीविषयी अचंबा वाटला. कसं असतं ना माणूस म्हणून जगणं! असंही वाटलं. मन त्या नवलाईनं भारून गेलं. हे सारं घडविणाऱ्या निसर्गरूपी ईश्वराविषयी कृतज्ञता वाटली.
क्षणभर थांबलो आणि अंतर्मुख झालो ते श्लोक असे.
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमूं शारदा मूळ चत्वारवाचा
गमूं पंथ आनंत या राघवाचा
सर्व गुणांचा म्हणजे ‘तम, रज आणि सत्त्व’ या त्रिगुणांचा आणि इंद्रियाकडून येणाऱ्या संवेदना ग्रहण करणाऱ्या मनाचा अधिपती ‘ईश’ रूपी (निसर्ग) आहे. त्याचे मूळ रूप ‘निर्गुण’ आहे. तो या त्रिगुणांचा मुळारंभ आहे. मुळारंभ म्हणजे मूलाधारचक्रापासून. जे आद्य अथवा प्रथम चक्र. शारदा म्हणजे सरस्वती अथवा प्रत्यक्ष प्रकट वाचा हिचे मूळ. ही निराकार अथवा निर्गुण आहे म्हणजे चत्वारवाचामधील ‘परा’ हे तिचं मूळ स्वरूप आहे. ‘परा’रूप म्हणजे शुद्ध अनुभवाचं असंस्कारित रूप. त्यापुढे पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी.
हे शुद्ध अनुभवरूप आद्य आहे. तो शुद्ध अनुभव म्हणजे चेतसाची नि:शब्द अनुभूती तिला नमन करतो. कारण ते विशुद्ध रूप सगुण रूपाने प्रकट होतं. सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचं प्रत्यक्ष रूप म्हणजे मानवी शरीर. या त्रिगुणांच्या उगमस्थानी असलेलं चैतन्य म्हणजे ‘आत्मा.’ त्या आत्म्याला समर्थानी ‘आत्माराम’ म्हटलं. अथवा ‘राघव’ म्हटलं.
कोणत्याही कार्याचा आरंभ आपण आद्यशक्तीला स्मरून करतो. ही आत्मशक्ती आत्मारामाच्या रूपाने आपल्यात सामावलेली आहे. त्याचं स्मरण करून आपल्याला सत्पंथाच्या वाटेनं जायचं आहे.
समर्थानी ही परमार्थदृष्टी ऐहिक जीवनापर्यंत आणून ठेवली. त्या (आत्मा)रामाची म्हणजे विशुद्ध चेतसाची उपासना शिकवली. ती उपासना केवळ प्रार्थनेपुरती मर्यादित न ठेवता, बलोपासनेची जोड दिली. त्यावर याच कट्टय़ावर..
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – तुम्हीच कोण असे शूर?
‘‘अरे, नवऱ्याआधी बायकोने मरावे किंवा नवऱ्याने बायकोआधी मरावे याचा तुमच्या बापदादांनी काही दाखला आणला काय रे? मरणे किंवा जगणे हे तर त्या सर्व शक्तिमान नारायणाचे हाती. तुमचे हाती काय दगड आहे? तरुणांनी मरावे अगर म्हाताऱ्यांनी जगावे, याचा काही नेम आहे काय?..  मोठा राजा जरी असला तरी यमदुतापुढे त्याचे काहीच चालत नाही; मग तेथे या गरीब स्त्रियांचे कोण ऐकतो? तेव्हा हा ईश्वराघरचा मळा. त्याला या स्त्रियांनी काय करावे? बरे असो.’’
हे सार्वकालीन सत्य सांगत ताराबाई शिंदे स्त्री-पुरुष समानतेसंदर्भात बिनतोड युक्तिवाद करतात- ‘‘मागे कधीकाळी कोणीतरी एखादी स्त्री आपले नष्ट झालेले अगर यमाने नेलेले सौभाग्य परत मागण्यास ब्रह्मदेवाजवळ गेली होती, तेव्हा तिला सृष्टिनिर्मित्या भगवंतानी ‘‘कोणत्याही स्त्रियेस पुन्हा सौभाग्य तिचे हयातीत मिळणार नाही’’ असा काही दाखला तरी दिलेला तुमच्या भारतात सापडतो काय? एक सावित्री वेगळी करून तर यमामागे सौभाग्यदानाकरिता कोणीच गेली नाही. बरे, ती गेली तशी आपल्या पतीस परत घेऊन आणखी त्याजवळून तिने पुष्कळ दुसरे वरदान मागून आणले. या स्त्रीजातीत सावित्री तरी आपले पतीचा प्राण परत आणण्याकरिता यमदरबारात जाऊन आली. पण पुरुषांमध्ये कोणी तरी आपले बायकोचे प्राणाकरिता यमराजाचे दरबारात तर नाहीच; पण उगीच त्या दरबाराचे वाटेवर तरी गेलेला कोठे ऐकण्यात आला आहे काय? तर जसे एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुन्यांपेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून सर्व आयुष्यभर आंधार कोठडीत राहावे, त्याप्रमाणे तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्हीही आपले तोंड काळे करून दाढय़ा मिशा भादरून यावत् जन्मपर्यंत कोठेही अरण्यवासात का राहू नये बरे? एक बायको मेली की तिचे दहावे दिवशीच तुम्ही दुसरी करून आणावी, असा तुम्हाला कोणत्या शहाण्या देवाने दाखला दिला आहे, तो दाखवा बरे! जशी स्त्री तसेच पुरुष. तुमच्यामध्ये मोठे अलौकिक गुण कोणते? तुम्हीच कोण असे शूर म्हणून देवांनी तुम्हाला इतकी मोकळीक दिली?’’