06 July 2020

News Flash

कुतूहल – भारतीय रसायनशास्त्रज्ञ : डॉ. विक्रम त्र्यंबक आठवले

डॉ. विक्रम त्र्यंबक आठवले यांनी १९४५ साली बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्रात पीएच.डी. केली.

| April 17, 2014 12:56 pm

डॉ. विक्रम त्र्यंबक आठवले यांनी १९४५ साली बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्रात पीएच.डी. केली. त्यानंतर त्यांनी कोलकात्याच्या नॅशनल टेस्ट हाऊस या प्रयोगशाळेत जाऊन रसायनशास्त्राच्या अद्ययावत विश्लेषण पद्धतीचे संशोधन केले. १९४९ साली डॉ. भाभा यांनी त्यांना अणू संशोधन संस्थेत काम करण्यासाठी मुंबईत बोलावून घेतले व त्यांना अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री विभागाचे प्रमुख म्हणून नेमले.
पुढे ते संपूर्ण रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख झाले. अणुशक्तीसाठी उपयोगी पडणाऱ्या सर्व रासायनिक पदार्थाची शुद्धता तपासण्याचे काम या वेळी त्यांच्या विभागाने केले. या वेळी विभागाकडे स्पेक्ट्रोस्कोपी, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, मासस्पेक्ट्रोस्कोपी, क्षकिरण यंत्रे इत्यादी उपकरणे होती. १९५८ साली अप्सरा अणुभट्टी सुरू झाल्यावर तिचा वापर करून न्यूट्रॉन अ‍ॅक्टिव्हेशन अ‍ॅनालिसिस पद्धत विकसित करण्यात आली. अणुभट्टीत वापरल्या जाणाऱ्या पदार्थाची शुद्धता खूप जास्त प्रमाणात असावी लागते. इतकी शुद्धता तपासणे हे फार कटकटीचे काम असते. परंतु अशी जिकिरीची कामे, आठवले आणि त्यांच्या गटाने लीलया पार पाडली. डॉ. आठवले त्यांच्या नेतृत्वाखाली अशी अनेक तंत्रज्ञाने, अणुशक्ती मंडळाने विकसित केली. कारण अणुशक्तीच्या क्षेत्रातील तंत्रज्ञान जगात कोठेही आयते विकत मिळत नाही.
इंधनयुक्त युरेनिअम व थोरिअम यांची शुद्धता तपासण्यासाठी या धातूंवर आठवले यांनी संशोधन केले. जड पाण्याची शुद्धता तपासून ती प्रमाणित केली. त्यातूनच ‘वॉटर केमिस्ट्री’ या क्षेत्राचा उदय झाला. झिरकॉनिअम धातूचा उपयोग अणुभट्टीच्या इंधननलिका बनवण्यासाठी करतात, पण त्यासाठी अत्यंत शुद्ध झिरकॉनिअम लागते. आठवले यांनी झिरकॉनिअम, अ‍ॅल्युमिनिअम, कॅडमिअम, बोरॉन, बेरेलिअम, अशा अनेक धातूंची शुद्धता तपासून आणि प्रमाणित करून दिली.
गुन्हे विश्लेषणशास्त्रात निरनिराळ्या मूलद्रव्यांच्या प्रमाणाची अचूक मोजणी करणे गरजेचे असते. त्यासाठीही आठवले यांनी कार्यप्रणाली तयार करून दिली. त्यासाठीचे सर्व संशोधन अणुशक्ती मंडळाच्या प्रयोगशाळेतच झाले.
अ. पां. देशपांडे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – चरखा चला के..
अगदी सहज आलेला अनुभवदेखील खूप काही शिकवितो, याची गोष्ट आहे. त्या अनुभवातले तपशील आणि बारकावे स्मरणाच्या चाळणीतून निसटले आहेत; परंतु मनावर कायमस्वरूपी ठसा उमटला हे मात्र खरंय.
उदयपूरच्या स्वयंसिद्धतेच्या मार्गाने जाणाऱ्या स्वपथगामी युवकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत युवक-युवतींशी बोलत होतो. चाकोरीबद्ध (कंटाळवाण्या, सर्जनशून्य) शिक्षणाला रामराम ठोकून खरंखुरं शिकायला आलेल्या जवान मुलांना ‘इमोशनल इंटेलिजन्स’ची गोष्ट सांगत होतो. मधल्या खाऊच्या वेळात तिथे मांडलेल्या चरख्यावर हौशीनं बसलो नि दिवसभर शिकवायचे धडे त्या चरख्यानं नकळत शिकविले.
वरवर पाहता काम सरळ होतं. कापसाचे पेळू, चरखा, त्याचं मोठं चक्र, लहान चक्र, त्यावरची बॉबीन यांच्या मदतीने सुताची गुंडळी तयार करायची ही प्रक्रिया.
पेळूचा कापूस नाजूक आणि विरविरता, तो पकडताना लक्षात आलं की, पारिजातकाच्या फुलाचा देठ जसा हळुवारपणे धरावा तसा पकडावा लागतो. जणू काही आपापल्या मनातल्या भावभावना. हिसका, विनाकारण घाई आणि असंवेदनशीलता केली तर हमखास तुटतात. तसेच हे पेळू.
चाकाच्या गतीसाठी उजवा हात राखीव आणि डाव्या कमी कुशल हाताला धागा अधूनमधून धरावा लागतो, हे लक्षात आलं म्हणजे आपल्या मनाच्या व्यवस्थापनेमध्ये कुशलता महत्त्वाची तशी कामाची विभागणीदेखील. चाकाच्या गतीची गोष्ट तर फारच विलक्षण. अधिक वेगानं फिरलं तर धाग्याचा गुंता होतो आणि हळू फिरवलं तर हात दुखतो. याचा अर्थ आपल्या कामाचा वेग आणि झपाटा याची अचूक जाणीव असली तर प्रत्यक्ष कामाची प्रक्रिया आणि कामाचं आऊटपूट यांचं गणित जमविता येतं. अतिवेगानंही काम करता उपयोगी नाही, कारण त्यामुळे कामातल्या उत्कृष्टतेचा बळी जातो. काम मंदावलं तर कंटाळवाणं होतं. मनात सुसूत्रीकरण फार महत्त्वाचं. माझ्या हातून वारंवार धागा तुटत होता नि त्या गुंडाळीवरून निसटत होता. तो नीटपणे पुन्हा सुरळीत करावा लागायचा. त्या क्षणी माझं मन विचलित व्हायचं. राग आला, आधी धाग्याचा नि मग माझा. चिडचिड झाली तर मनाचं सुसूत्रीकरण निसटतं आणि धागा चटकन तुटायचा, मग पुन्हा चिडचिड व्हायची. ‘शिकाऊ आहेस, जमेल हळूहळू,’ असं स्वत:ला बजावीत राहिलो तेव्हा कुठे शांतपणे काम करता आलं. मग लक्षात आलं की, अस्वस्थ मनानं घेतलेल्या श्वासानं धागा सूक्ष्मपणे थरथरतोय. म्हणजे शांतपणे, रोखून न धरता (सहज, नैसर्गिकपणे) श्वास घेतला तर हातही स्थिर राहतो. बोटांची अतिसूक्ष्म थरथर थांबते. शांत राहिलो तर धाग्याची उत्कृष्टता टिकते.
..आणि हे सारं करताना, मन फक्त त्या कामातच गुंतलेलं हवं. एकाग्र, स्थिर चित्त आणि प्रसन्न! चरखा बंद करता करता वर महात्माजींची तसबीर होती.. हे सगळं जाणलं होतं तुम्ही बापू.. बंदे में था दम खरंय किंवा काकाजींसारखा, त्यातही मोठा मझा असतो यार!
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – ममतेच्या पोटी ममता उपजते
‘‘बरे असो, तुम्ही मोठे कलमबहाद्दर, ज्ञानी, धर्मशील, परोपकारी, कनवाळू असे सर्वगुणसंपन्न बत्तीसलक्षणी पुतळे आहात तर तुमच्या अंगी भूतदया का नसावी बरे? का भूतदयेचे तुम्हास काही वावडे आहे? अगर ती तुम्ही वाघाला तर उसणी दिली नाही ना?.. अरे, तुम्ही म्हणता ना की, आपल्या जिवावरून दुसऱ्याचा जीव जाणावा. मग येथे तुमचा जीव कोठे जातो? तुमचा जीव जसा तुम्हाला प्यारा आहे तसा स्त्रियांचा त्यांना नसेल काय? स्त्रिया दुसऱ्या मातीच्या, दगडाच्या नाहीत तर लोखंडाच्या बुकणीच्या केल्या असतील? तुम्ही व तुमचा जीव हे अगदी गाळीव सोने, स्त्रिया काय अगदी य:कश्चित् प्राणी, ढेकूण नाही तर पिसू असे तुम्हाला वाटते? व हे तुमचे अनुभवाप्रमाणे अगदही बरोबर आहे. कसे जर म्हणाल तर पतिराज एकदा स्वर्गवासी झाले म्हणजे त्या बाईसाहेबांचे हाल कुत्रे खात नाहीत. .. स्त्रियांवर त्या शास्त्रकर्त्यांची करडी नजर का? स्त्रियांनी त्या शास्त्रकर्त्यांचे घरात कधीकाळी आग लाविली होती वाटते; म्हणून त्याने एकदम एकीकरता साऱ्यांना एकच कायदा लागू केला. ’’  असे प्रश्नामागून प्रश्न विचारत, त्यांची तिरकस उत्तरेही देत ताराबाई शिंदे पुरुषांच्या दांभिकतेचा पंचनामा करतात आणि लगेच त्यांना कनवाळूपणाने समजावण्याचाही प्रयत्न करतात-
‘‘आपण कोणाही बरोबर ममतेने, निष्कपटाने वागत असलो, म्हणजे तो म्हणा अगर ती म्हणा, कशीही बाजिंदी असली तरी तिला त्याबरोबर चांगले वागणे भागच पडते. नाही तर तुम्ही तिला रोज पाहिजे तशी, वाटेल त्याप्रमाणे वागवून पुन: तिने नेकीनेच रहावे, असे म्हणाल तर कसे होईल? मग बरी किंवा वाईट वागणूक सहजी स्वाभाविकच उत्पन्न होते. तुमच्यावरून तुम्ही पहा. तुम्हाला एक लुच्चा भेटला म्हणजे तुम्ही त्यापेक्षा दसपटलुच्चे बनता किंवा नाही? तसेच हे. इंग्रजीत एक म्हण आहे की, ममतेपासून ममता उत्पन्न होते. तर जशी ममतेच्या पोटी ममता उपजते तसेच सर्व गोष्टीत आधी आपले मनास विचारून मग दुसऱ्याचा विचार करावा. पण पुरुषाचेजवळ तेही नाही. ’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2014 12:56 pm

Web Title: indian chemical scientist dr vikram tryambak athavale
टॅग Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल- भारतीय रसायनशास्त्रज्ञ – डॉ. वामन रामचंद्र कोकटनूर (१८८७-१९५०)
2 कुतूहल – भारतीय रसायनशास्त्रज्ञ – डॉ. के. वेंकटरामन (१९०१-१९८१)
3 कुतूहल: भारतीय रसायनशास्त्रज्ञ
Just Now!
X