शेतीच्या क्षेत्रातील भारत देशाची ही सर्वोच्च संस्था असून ती १६ जुल १९२९ रोजी स्थापन झाली. संस्थेचे सध्याचे अंदाजपत्रक पाच हजार कोटी रुपयांचे असून देशाचे कृषिमंत्री संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. संस्थेची उद्दिष्टे अशी आहेत – १) देशभरच्या शेती कार्यक्रमाचे नियोजन करणे २) शेतीतील शिक्षण व संशोधन करणे ३) शेतीबरोबरच वनशेती, पशुपालन, मत्स्यपालन, गृहविज्ञान व इतर संबंधित शास्त्रांचा शिक्षण व संशोधनाबाबत परामर्श घेणे ४) वरील सर्व शास्त्रात होणारे संशोधन प्रसिद्ध करणे व सर्व माध्यमे वापरून ते लोकांपर्यंत पोहोचवणे ५) संस्थेत निर्माण झालेल्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञान विकसित करून ते लोकांपर्यंत पोहोचवणे ६) वरील सर्व विषयांवर सल्ला देणे ७) शेती आणि कापणीनंतरच्या पिकांबाबत ग्रामीण लोकांच्या समस्या सोडवणे व त्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्सेस रिसर्च, कौन्सिल ऑफ सायण्टिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च, भाभा अणुसंशोधन संस्था व विद्यापीठे यांच्या मदतीने कार्यक्रम करणे.
कौन्सिलने १९८६ साली देशातील सर्व पिकांच्या बियाणांचे एक संग्रहालय दिल्लीत स्थापन केले. शेतीसंबंधी देशात ४८ राज्यस्तरावरील संशोधन केंद्रे स्थापन केली. त्यात देशभरच्या सर्व पिकांवर संशोधन केले जाते. संस्थेच्या अखत्यारीत चार अभिमत विद्यापीठे, ४८ राज्यस्तरावरील संशोधन केंद्रे, सहा राष्ट्रीय ब्युरो, ११ राष्ट्रीय संशोधन केंद्रे, विविध प्रकल्पांसाठी २५ प्रकल्प संचालक, १३८ उपकेंद्रे आणि राज्यस्तरावरील ४५ कृषी विद्यापीठे एवढा पसारा येतो. कौन्सिल करीत असलेल्या कार्यात शेतीसंबंधित संख्याशास्त्रावर संशोधन, शेती शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण, कोरडवाहू शेतीवर संशोधन, खारफुटी जमिनीत कोणती पिके घेता येतील यावर संशोधन, डेअरी विषयावर संशोधन, शेतीला उपयोगी पडणाऱ्या पशूंवर संशोधन, ऊस-कापूस-बटाटा-ज्यूट-तांदूळ-लोकर-गवत-डाळी-भाज्या या पिकांवर संशोधन चालू आहे.
डॉ. आत्माराम भरव जोशी हे मराठी गृहस्थ या संस्थेचे १९६६ ते १९७२ या काळात उपमहासंचालक होते.
संस्थेचा पत्ता – इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च (आयसीएआर), कृषी भवन, डॉ.राजेंद्रप्रसाद रोड, नवी दिल्ली-११००१४. दूरध्वनी – ०११-२५८४२७८७, २३३८८८४२, वेबसाइट – http://www.icar.org.in

जे देखे रवी.. – वैद्यकीय विज्ञानाची चूकभूल/ आईचा मृत्यू
मी एकदा सत्तरीच्या एका स्त्रीवर शस्त्रक्रिया करणार होतो तेव्हा तिने माझा हात घट्ट हातात घेतला आणि म्हणाली, मला माझ्या आईची आठवण येत आहे. तिच्यासारखा मीही सत्तरीचा. तिच्यासारखीच तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली होती. मी सांगलीला ११ वीला होतो तेव्हा माझी आई गेली. तिचे डोके दुखू लागले. डोकेदुखीने ती वेडीपिशी होत असे. तिला पुण्या-मुंबईला नेले, काही निदान होईना. त्या काळी अत्याधुनिक तपासण्या नव्हत्या. शेवटी मुंबईचे माझ्या वडिलांचे शिक्षक वडिलांना म्हणाले, ‘हिला लंडनला घेऊन जा.’
वडिलांनी कर्ज काढून तिला इंग्लंडला नेले. तिथल्या जगत्विख्यात तज्ज्ञाने रक्ताची गाठ असणार, औषध देतो, विरघळेल, असे म्हणत १० दिवस थांबायला सांगितले. झाले भलतेच. तिची दृष्टीच गेली. मग हा तज्ज्ञ घाबरला. म्हणाला, आता शस्त्रक्रिया करून बघितल्याशिवाय उपाय नाही. मग शस्त्रक्रिया केली. ती करतानाच परिस्थिती हाताबाहेर गेली. तिला जेमतेम वाचवत अत्यवस्थ कक्षात आणली. कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ती थोडी जगली, मग गेली. नियमाप्रमाणे शवविच्छेदन झाले त्यात ते रहस्य उलगडले. एक लहान बोराएवढी टीबीची गाठ सापडली. खरेतर टीबीचा त्या काळातला जुजबी पण एकमेव निर्देशक म्हणजे रक्ताची ईएसआर नावाची तपासणी. ती तपासणी अनेक वेळा अंगुलीनिर्देश करीत होती; परंतु इथल्या किंवा तिथल्या त्या तज्ज्ञाला तो आकडा दिसत असूनही दुर्दैवाने दिशा दाखवत नव्हता. सर्वात दैवदुर्विलास म्हणजे Streptomycin  हे औषध बाजारात आले होते. दहा इन्जेक्शनने आईचे डोके थांबले असते आणि साठाचा कोर्स झाल्यावर ती बरी झाली असती.
वैद्यकीय विज्ञानावर या स्तंभात लिहीत आहे आणि पुढे कधीतरी जनतेच्या मनातला डॉक्टर मंडळींबद्दलचा समज यावरही लिहिणे होणारच आहे. इथे माझ्या आईच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला नाही. निदान चुकले. To err is human  असे म्हणून सगळेच गप्प बसले. माझी आई माझे सर्वस्व होती. मोठी धाडसी. १९३८ साली तिने नोंदणी पद्धतीने विवाह केला. १९४८ साली गोध्रा नावाच्या मागासलेल्या जिल्ह्य़ात तिने सर्व प्रकारच्या लोकांमध्ये कुटुंबनियोजनाचा प्रचार केला. आमच्या घरासमोर निदर्शने झाली, पण ही बधली नाही. ती ‘स्त्री/ किलरेस्कर’ या पूर्वीच्या मासिकात लिहीत असे. मी वयात येऊ लागलो तेव्हा बेधडकपणे मला लैंगिकतेबद्दल समजावून सांगण्याची हिंमत तिने दाखवली. एकदा विचार आला ‘तुझी जडणघडण हिने केली, काहीतरी दाद दे’ हा स्तंभ वाचून काही लोक मला विचारतात हे कसले विचित्र आडनाव? मायदेव माझ्या आईच्या माहेरचे आडनाव म्हणून हे जोड आडनाव.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  – आर्तवविकार: अनार्तव, अल्पार्तव
सुमारे पंधरा-वीस वर्षांपूर्वी माझ्या चिकित्सालयात विटाळ अजिबात न जाणे किंवा नुसतेच थेंब दोन थेंब असे दर्शन होणे, अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या मायभगिनी फार थोडय़ा असत. अलीकडे विटाळ अजिबात न येणे व त्यामुळे स्थौल्य, अनपत्यता, चेहरा बोजड वा शरीर पुरुषी दिसणे अशा खूप महिला येतात. एक काळ महिला आपल्या घरात खाली बसून स्वयंपाक, पाटपाणी, धुणे-भांडी अशा स्वरूपाच्या राहणीमुळे ‘फायटिंग फिट’ असायच्या. आता शहरांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करतात, रात्रपाळी करतात, वेळी-अवेळी जेवतात; घरी उभ्याने स्वयंपाक करतात. धुण्या-भांडय़ाला वा वरकामाला इतरांची मदत घेतात. त्यामुळे शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवाला कमरेला फार श्रम करावे लागत नाहीत. या अवयवात ‘अपानवायूचे’ काम चालते. विटाळ अजिबात न जाणे किंवा खूपच कमी जाणे व त्यामुळे स्थौल्य, स्थौल्यामुळे पांडुता असे दुष्ट चक्र चालू राहते.
अशा महिलांना आपली जीवनशैली बदलता आली तर ‘सोन्याहून पिवळे’ असे गुण महिन्यात मिळतात. सामान्यपणे विटाळ साफ व भरपूर येण्याकरिता कोरफडीचे योगदान मोठे आहे. तसेच गाजरबी, केळीचा खुंट या वनस्पतींचीही मोलाची मदत विटाळाचे प्रमाण वाढविण्याकरिता होते. विटाळाचे प्रमाण कमी असल्यास ते वाढविण्याकरिता कुमारी आसव, कन्यालोहादी वटी, चंद्रप्रभा व कठपुतळी ही औषध योजना पुरेशी आहे. कृमी, जंत हे कारण असल्यास जादा औषध म्हणून सातापा काढा व कृमीनाशक गोळ्या योजाव्यात, स्थौल्य, फोफसटपणा असल्यास आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, त्रिफळा गुग्गुळ, गोक्षुरादी गुग्गुळ, अम्लपित्त टॅबलेट यांची योजना करावी. दीर्घकाळ अनार्तवाची तक्रार असल्यास आर्तवक्वाथ, कुमारी आसव दोन्ही जेवणानंतर व जेवणाअगोदर कन्यालोहादी, कठपुतली, चंद्रप्रभा, त्रिफळा गुग्गुळ, गोक्षुरादी गुग्गुळ, या गोळ्या प्र. ३ दोन वेळा घ्याव्या. न कंटाळता रोज दोन खारका व जेवणानंतर बाळंत शोपा आठवणीने घ्याव्या.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १६ एप्रिल
१९२८ > तत्त्वचिंतक व साक्षेपी समीक्षक महादेव मल्हार जोशी यांचे निधन. ‘आधुनिक सुशिक्षितांचा वेदांत’ आणि ‘स्वामी विवेकानंदांचे वाङ्मयीन विचार’ ही त्यांची पुस्तके.
१९५७ > स्त्रीला संस्कृतीने शरीराच्या नियतीत जखडून ठेवले असून परंपरेने  तिला आदर्श भूमिकांशी बांधून ठेवले आहे,  अशी बंधनांची जाणीव देऊन मुक्तीचा ध्यास घेणाऱ्या कवयित्री मल्लिका अमरशेख यांचा जन्म. ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ (आत्मकथा) हे त्यांचे गद्यलेखन सर्वाधिक गाजले, रूढ स्त्री-कल्पनांना थेट धक्का देणारे ते असल्याने वादग्रस्तही ठरले. परंतु मल्लिका यांचा स्वभाव कवयित्रीचाच राहिला. ‘वाळूचा प्रियकर’, ‘महानगर’ आणि ‘देहऋतू’  हे त्यांचे कवितासंग्रह. त्यांनी कथालेखनही केले आहे. शाहीर अमरशेख यांच्या त्या कन्या आणि कवी नामदेव ढसाळ यांच्या सहचर होत.
१९७६ > चरित्रकार आणि कथाकार नीळकंठ महादेव केळकर यांचे निधन. त्यांनी लेखनाला सुरुवात कथांद्वारे केली, ‘जीवनपथ’ हा कथासंग्रहदेखील आला. परंतु हरी नारायण आपटे आणि भास्करबुवा बखले यांच्या चरित्र-पुस्तकांमुळे ते विशेष प्रकाशात आले.
– संजय वझरेकर