भारतात येऊन स्थायिक झालेल्या ज्यू लोकांच्या सात गटांपैकी, कोचीनच्या परिसरात प्रथम आलेल्या ज्यूंना ‘ब्लॅक ज्यू’ म्हटले जाते. मग, स्पेन आदी युरोपीय देशांतून १४९२ साली हाकलले गेलेल्या काही ज्यूंनी कोचीनच्या परिसरात आश्रय घेतला. या ज्यूंना ‘व्हाइट ज्यू’ असे नाव पडले. कोचीन ज्यूंची केरळात सात सिनेगॉग आहेत. ते जुदो-मल्याळम भाषा बोलतात. हस्तिदंत, मसाले, मोर यांचा व्यापार हा कोचीन ज्यूंचा प्रमुख व्यवसाय होता. १९४८ साली इस्रायलने आपले स्वातंत्र्य घोषित करून जगभरात विखुरले गेलेल्या ज्यूंना त्यांच्या मायदेशी परतण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन बहुतेक कोचीन ज्यूंनी इस्रायलमध्ये स्थलांतर केले आहे.

साधारणत २५० वर्षांपूर्वी इराक व अन्य अरब देशांतून सुरतला काही ज्यूंचा एक गट येऊन स्थायिक झाला. पुढे हे ज्यू कलकत्त्याच्या परिसरात व्यापार करून स्थायिक झाले. हे ‘बगदादी ज्यू’ म्हणून ओळखले जातात. यातलेही बरेचसे, इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले. ईशान्येकडील मणिपूर आणि मिझोराम या राज्यांमधील काही वन्यटोळ्यांमध्ये राहणारे, कुकी, झोमी, चीन आणि मिझो या जमातींचे लोकही ज्यू धर्मीय आहेत; ते ‘ब्नेई मेनाश’ या नावाने ओळखले जातात. हे ज्यू भारतात येण्यापूर्वी ब्रह्मदेशात राहत होते. यातीलही अनेकांनी इस्रायलमध्ये स्थलांतर केले आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये स्थायिक झालेल्या ज्यूंना ‘बेने इफ्रेम’ असे नाव आहे. ‘तेलगू ज्यू’ म्हणूनही ओळखला जाणारा हा समाज चीनमाग्रे एक हजार वर्षांपूर्वी दक्षिण भारतात येऊन स्थायिक झाला. तेलगू भाषा बोलणारे हे लोक आंध्र जीवनशैलीशी पूर्णपणे समरस झाले आहेत.

हॉलंड, इंग्लंड आणि पोर्तुगालमधून आलेल्या ज्यूंचा एक गट चेन्नई आणि आसपासच्या परिसरात स्थायिक झाला ते स्वतला ‘मद्रास ज्यू’ म्हणवून घेतात. याचप्रमाणे ‘गोवा ज्यू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्यूंचाही एक गट आहे.

सध्या भारतात स्थायिक असलेल्या ज्यू समाजापैकी मुंबई, ठाणे, अलिबाग वगरे महाराष्ट्रातील शहरांमध्ये राहणारे ‘बेने इस्रायल’ (शनवारतेली) या समाजाचे ज्यू संख्येने अधिक आहेत.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com