15 November 2019

News Flash

सुश्रुताच्या शल्यक्रिया

उपचारासाठी शल्यक्रियेचा वापर करण्याचे ज्ञान मानवाला अनेक शतकांपासून आहे.

उपचारासाठी शल्यक्रियेचा वापर करण्याचे ज्ञान मानवाला अनेक शतकांपासून आहे. भारतातल्या वाराणसी येथे, इ. स.पूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेला वैद्यकतज्ज्ञ सुश्रुत हा शल्यचिकित्सेचा जनक मानला जातो. शल्यचिकित्सा या शास्त्राबद्दलचे सखोल ज्ञानभांडार सुश्रुताने लिहिलेल्या ‘सुश्रुत संहिते’त उपलब्ध आहे. सुश्रुताने शल्यक्रियेचे तीन कार्यभागांत वर्णन केले आहे – प्रथम कर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म. प्रथम कर्मात त्याने रुग्ण, शल्यक्रियेची जागा आणि शल्यक्रियेसाठी वापरायच्या उपकरणांचे विवेचन केले आहे. प्रधान कर्मात प्रमुख आठ प्रकारच्या शल्यक्रियांचे वर्गीकरण आहे आणि पश्चात कर्मात जखमेची स्वच्छता व कोषबंधन (बँडेज) याचे विचेचन केले आहे. पश्चातकर्मात त्याने चौदा प्रकारची कोषबंधने वर्णिली आहेत. उत्तम शल्यचिकित्सक होण्यासाठी मानवी शरीराची सखोल माहिती हवी, त्यासाठी शवविच्छेदनाची प्रक्रियाही त्याने सांगितली आहे.

तीनशे प्रकारच्या वेगवेगळ्या शल्यक्रिया आणि एकशे वीस प्रकारच्या उपकरणांची विस्तृत माहिती सुश्रुताने आपल्या संहितेत नमूद केली आहे. मूळव्याधीच्या आजाराच्या तपासणीसाठी, आजच्या रेक्टल एन्डोस्कोपसारख्या उपकरणाचाही त्यात उल्लेख आहे. धातूपासून बनवलेल्या, एकशे एक प्रकारच्या धार नसणाऱ्या साधनांची ‘यंत्र’ या गटात आणि वीस प्रकारच्या धारदार साधनांची ‘शस्त्र’ या गटात त्याने विभागणी केलेली आहे. या उपकरणांना त्याने पक्षी व प्राण्यांची नावे दिली आहेत. यातील क्रोकोडाइल वा अ‍ॅलिगेटर फोस्रेप्स यांसारख्या साधनांचा उपयोग आजही केला जातो. छेदन, भेदन, शिवण अशा प्रकारे शल्यक्रियेच्या पद्धतीचे त्याने वर्णन केलेले आहे.

नाकावरील प्लास्टिक सर्जरीचे वर्णन सुश्रुताने केले आहे. नाक कापून टाकण्याची शिक्षा ही अनेकांना दिली जात असल्याने नाक जोडण्याच्या शल्यक्रियेची त्या काळातील गरज लक्षात येते. नाकाच्या आकाराची गालाची त्वचा आणि मांडीचा मांसल भाग वापरून, नाकाच्या जागेवर शिवून पुन्हा नाकाचा आकार तयार करायचा. त्यानंतर एरंडाच्या झाडापासून बनवलेल्या बारीक नळ्या नाकाच्या छिद्रात घालून श्वास घेण्यासाठी मार्ग मोकळा ठेवायचा. याशिवाय चंदन, दारू आणि तिळाच्या तेलापासून लेप बनवून तिथे लावायचा, असे या शल्यक्रियेचे वर्णन आढळते. कानाची शस्त्रक्रिया, हाडांचे वर्गीकरण आणि अस्थिभंगाचे बारा प्रकार व त्यावरील उपायांचेही सुश्रुताने वर्णन केले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात आणि पाश्चिमात्य जगात सुश्रुताला ‘प्लास्टिक सर्जरी’ या शल्यक्रियेचे जनक मानले जाते.

– डॉ. अंजली कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

First Published on May 27, 2019 12:05 am

Web Title: indian physician sushruta