वातावरणातील वायुप्रदूषणापेक्षा कदाचित जास्त घातक असू शकते ते घरातील हवेचे प्रदूषण. परंतु याकडे फार गांभीर्याने पाहिले जात नाही. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, विकसनशील जगात घरगुती वायुप्रदूषण हे रोग आणि अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे. घरातील हवेचे प्रदूषण म्हणजे घरातील अभिसरीत हवेचे प्रदूषण. घरातील तंबाखूचा धूर, थंड हवामानात वापरली जाणारी ‘फायरप्लेस’, गॅस-स्टोव्ह, अकार्यक्षमतेने कार्बनयुक्त इंधनाचे जाळण आदींमुळे कणिक द्रव्य (पीएम- पार्टिक्युलेट मॅटर), मिथेन, कार्बन मोनोऑक्साइड, पॉलीसायक्लिक एरोमेटिक हायड्रोकार्बन्स (पीएएच) आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे (व्हीओसी- व्होलाटाइल ऑरगॅनिक कम्पाऊंड) यांची निर्मिती होते. हे घटक घरातील हवा प्रदूषित करतात. यातील प्राणघातक, रंगहीन, गंधहीन, विषारी वायू कार्बन मोनोऑक्साइडचा शोध घेणे कठीण असते. कार्बन मोनोऑक्साइडचा प्रमुख संभाव्य स्रोत म्हणजे शेण्या, कोळसा, चारकोल, लाकूड, केरोसीन वगैरे कार्बनयुक्त इंधनाचे अपूर्ण ज्वलन; जे सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात दिसून येते. शहरी भागात पाणी आदी गरम करण्याची प्रक्रिया, स्वयंपाक करण्याची क्रिया वगैरेंतून निर्माण होणारा धूर, तंबाखू ओढणे अगर जाळणे, इमारती अगदी जवळजवळ असल्यामुळे आणि बंदिस्त असलेल्या घरांमध्ये हवा खेळती न राहणे, घरांमधील कृत्रिम आणि रासायनिक बाबींचा, कीटकनाशकांचा वाढता वापर.. यामुळेसुद्धा घरातील हवेचे प्रदूषण नकळत वाढत असते.

फर्निचरमध्ये वापरले जाणारे प्लायवूड पॅनेलिंग, फायबर बोर्ड, पाइप आणि फर्नेस पृथक करण्यासाठीचे (इन्सुलेशन) साहित्य, एस्बेस्टोसचा वापर, रंग आदी सामग्री आणि किरणोत्सर्गी रेडॉन यांतून उत्सर्जित होणारी रसायने यांमुळे घरातील हवा प्रदूषित होत असते. घरातील रेडॉनचा सर्वसामान्य स्रोत म्हणजे ज्या माती किंवा खडकांद्वारे घरे बांधली जातात, त्यांत असणारे युरेनियम आणि रेडियम-२२६ ही किरणोत्सारी मूलद्रव्ये. जसेजसे या मूलद्रव्यांचे नैसर्गिकरीत्या विखंडन होते, तसतसे रेडॉन हा किरणोत्सर्गी वायू निर्माण होतो आणि सहजपणे घरात प्रवेश करतो. जैविक प्रदूषकांमध्ये जीवाणू, झुरळे, घरातील धूळ, बुरशी, परागकण आणि विषाणू यांचाही समावेश करता येईल.

Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
loksatta analysis measures to prevent river water from pollution in maharashtra
विश्लेषण : राज्यातील नद्या केव्हा स्वच्छ होणार?

यंदा कोविड-१९ या साथरोगामुळे जगभरातील जास्तीत जास्त लोक घरातच अडकून पडले. त्यामुळे बऱ्याच शहरांमध्ये आणि देशांमध्ये बाहेरील हवेची गुणवत्ता काही काळ अनपेक्षितपणे सुधारली हे खरे; परंतु लोकांनी घरात जास्त वेळ घालविण्यामुळे घरासाठीचे बांधकाम साहित्य, टेबल-खुर्ची यांसारखे सामान, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि इतर रोजच्या वापरातील उत्पादनांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या रसायनांमुळे घरातील हवेचे प्रदूषण वाढले, हेसुद्धा तितकेच खरे!

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org