News Flash

जे आले ते रमले.. : अजमेरचे गरीब नवाज चिश्ती

लाहोरात ४० दिवस कुराणाचे अनुष्ठान करून त्यांनी दाता गंजबक्षच्या दग्र्याला भेट दिली.

सूफी पंथात अनेक संप्रदाय असले तरी भारतीय उपखंडात प्रमुख चार संप्रदाय प्रचलित होते. त्यापैकी चिश्ती संप्रदाय, ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांनी हिंदुस्थानात आणला. हजरत महम्मद पगंबरांचा मोईनुद्दीनना हिंदुस्थानात जाऊन कार्य करण्याचा आदेश मिळाल्यावर ते शेख जिलानी, ख्वाजा किरमानी, शेख सोहरवर्दी इत्यादी सुफी संतांच्या भेटी घेत लाहोरात पोहोचले. लाहोरात ४० दिवस कुराणाचे अनुष्ठान करून त्यांनी दाता गंजबक्षच्या दग्र्याला भेट दिली. पुढे मुलतान येथे मोईनुद्दीननी पाच वर्षे राहून हिंदी आणि त्या काळी नव्यानेच घडू लागलेल्या उर्दू भाषेचा अभ्यास केला. तेथून पुढे दिल्लीच्या मार्गाने अजमेर येथे इ.स. ११६२ मध्ये येऊन तिथे स्थायिक झाले.

हजरत मोईनुद्दीन चिश्ती यांची राहणी साधी होती. ते प्रामुख्याने कव्वालीसारख्या गायन प्रकाराने आणि समाखानी (परमेश्वराचे भजन) आणि कथेकरी पद्धतीने सुफींचा ईश्वरी संदेश लोकांपुढे ठेवीत, मुक्ती मार्ग कथन करीत. हिंदुस्थानातील लोकांना उपजतच अध्यात्माचे आकर्षण असल्याने त्यांचा मुरीद म्हणजे शिष्यगणही भराभर वाढले. ख्वाजा मोईनुद्दीनचे अजमेरला आगमन झाले त्या काळात तेथे पृथ्वीराज चौहान यांचा अंमल होता. काही कारणाने मोईनोद्दीनचे पृथ्वीराजशी वितुष्ट निर्माण झाले. नेमके याच दिवसांमध्ये शहाबुद्दीन घोरीने दिल्लीवर आक्रमण करून पृथ्वीराजचा पूर्ण पाडाव केला आणि दिल्ली आणि अजमेर ही शहरे मुस्लीम राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेली. ख्वाजा मोईनुद्दीनच्या दुआ मागण्यामुळेच आपल्याला हा विजय मिळाला अशा श्रद्धेने शहाबुद्दीनने अजमेर येथे जाऊन या सूफी संताची भेट घेतली, अजमेरमध्ये एक मोठी मशीद बांधली. या मशिदीस ‘अढाई दिन का झोपडा’ असे म्हणतात. या सूफी संताचा मृत्यू अजमेरात इ.स. १२३६ मध्ये झाला. हजरत मोईनुद्दीन चिश्ती यांच्या शिष्यांनी म्हणजे बख्तियार काकी, फरिदोद्दीन गंजेशक्कर, निझामोद्दीन औलिया यांनी हिंदुस्थानात ठिकठिकाणी गुरुकुल स्थापन करून तसव्वूफ म्हणजे सुफी तत्त्वज्ञानाचा प्रसार केला.        (उत्तरार्ध)

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:01 am

Web Title: information about khwaja garib nawaz
Next Stories
1 कल्हऽऽईय्य..
2 जे आले ते रमले.. : हजरत मोईनुद्दीन चिश्ती
3 सूफी संप्रदायाचा भारतातील प्रवेश
Just Now!
X