आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीपासून सुमारे ४०० कि.मी. अंतरावरील मादागास्कर हे बेट जगातल्या आकारमानाने मोठय़ा बेटांपैकी चौथ्या क्रमांकावर आहे. सन १८१७ मध्ये स्थानिक इमेरिना राजवटीच्या राजाने ब्रिटिशांबरोबर संरक्षण आणि विकास करार केल्यावर ब्रिटिशांनी तिथे लहानसहान उद्योग सुरू केले. त्यांच्याबरोबर आलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी स्थानिक मालागासींचे धर्मातर केले.

ब्रिटिशांशी करार करणाऱ्या राजाचा मृत्यू झाल्यावर त्याची पत्नी रानावालोना-१ हिने इमेरिना राजवट हाकण्याची जबाबदारी तब्बल ३३ वर्षे (सन १८२८ ते १८६१) सांभाळली. या राणीचा ख्रिस्ती धर्मातराला आणि युरोपीय लोकांनी मादागास्करात येऊन सुरू केलेल्या राजकीय हस्तक्षेपाला, तसेच युरोपीयांचा मादागास्करी संस्कृतीवर पडत चाललेला प्रभाव या साऱ्यास विरोध होता. तिने धर्मातरांवर बंदी आणून सर्व परकीयांना तिच्या राज्याबाहेर काढले. २० हजारांचे खडे सैन्य ठेवणाऱ्या या राणीने तिच्या विरोधकांची सरसकट कत्तल केली. तिच्या आतंकी आणि विक्षिप्त कारभाराच्या अनेक स्मृती मादागास्करी मंडळींत आहेत. उदाहरणार्थ, अशुभ दिवशी जन्मलेल्या मुलांना ताबडतोब मारून टाकण्याचा या राणीचा कायदा, हा त्यांपैकी एक. मादागास्करमध्ये असलेल्या वनस्पतींपैकी ८० टक्के वनस्पती जगात अन्यत्र कुठेही आढळत नाहीत. तांजेना ही त्यांपैकी एक. या वनस्पतीच्या पानांच्या सेवनाने शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होतात. राणी रानावालोना गुन्ह्य़ाचा आरोप असलेल्यांना, गुन्हेगारांना, ख्रिस्ती धर्मप्रचारकांना या तांजेनाची पाने खायला लावून त्यांची कसोटी घेत असे (चित्र पाहा)! या राणीने तिच्या कारकीर्दीत या वनस्पतीची पाने खायला लावून एक लाखाहून अधिक माणसांना मारले, असे म्हटले जाते. राणीच्या ३३ वर्षांच्या अमानुष कारकीर्दीत आलेली रोगराई, युद्धे, खालावलेले जीवनमान यांमुळे मादागास्करची लोकसंख्या तेव्हा ५० लाखांवरून घटत ३० लाखांवर आली!

राणी रानावालोनाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेल्या वारसांपैकी एका राणीने मात्र ब्रिटिश सल्लागार नोकरीत ठेवून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे शैक्षणिक, लष्करी सुधारणा केल्या. बहुपत्नीत्व बेकायदा ठरवून १८६९ साली ख्रिस्ती धर्मास तिने राजमान्यता दिली. ‘ब्रिटिश कॉमन लॉ’प्रमाणे कायदे केले आणि तीन न्यायालयेही स्थापली.

सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com