खरेतर लंडनमधील ब्रिटिश पार्लमेंटची इमारत ही मुळात राजवाडा म्हणूनच बांधली गेली. कालांतराने त्याचेच रूपांतर पार्लमेंटमध्ये झाले. अकराव्या शतकात टेम्स नदीजवळ हा राजवाडा बांधण्यास प्रारंभ झाला होता. १०९९ साली हे काम पूर्ण झाले. हा राजवाडा प्रथम केवळ हॉल म्हणून ओळखला जाऊ लागला. तेराव्या शतकापासून हा हॉल सरकारचे मुख्यालय म्हणून वापरला जाऊ लागला. त्याचेच नाव ‘वेस्टमिन्स्टर पॅलेस’ असे झाले.
वेस्टमिन्स्टर मध्ये न्यायालयही भरत असे. १६९७ साली रशियाच्या झारने इंग्लंडला भेट दिली. त्याचा किस्सा मजेदार आहे. काळ्या पोशाखातल्या अनेक लोकांची वेस्टमिन्स्टर मध्ये चाललेली ये-जा पाहून झारने राजाला विचारले की हे लोक कोण आहेत? हे वकील आहेत हे कळल्यावर तो म्हणाला: इतके सारे वकील? माझ्याकडे तर फक्त दोनच वकील आहेत!
चार्ल्स प्रथम या राजाची जुलमी राजवट उलथवून ऑलिव्हर क्रॉम्वेल या कडक शिस्तीच्या, राजघराण्यातील नसलेल्या माणसाची राजकीय कारकीर्द झाली आणि त्याच्या मृत्युनंतर संपली. पहिल्या चार्ल्सचा मुलगा चार्ल्स द्वितीय राजेपदावर आला. आपल्या वडिलांच्या खुनाचा सूड उगवीत त्याने क्रॉम्वेलची कबर उकरून काढण्याचा हुकूम दिला. कबर उकरून क्रॉम्वेलचे शीर धडावेगळे करून राजाने ते वेस्टमिन्स्टर हॉलच्या छतावरील लोखंडी दांडय़ाला टांगले. कावळे आणि गिधाडांनी खाण्यासाठी! पुढची अनेक वष्रे ती कवटी त्या छतावर टांगलेली होती.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

वनस्पतीं वर्गीकरणाचा विकास-३
चार्लस डार्वनिचा ‘उत्क्राती सिद्धांत’ प्रसिद्ध झाल्यानंतर वनस्पतींच्या वर्गीकरणालाही एक नवीन दिशा प्राप्त झाली. शास्त्रज्ञ उत्क्रांतीचा आधार घेऊन नवीन पद्धतीने विचार करू लागले दोन जर्मन वैज्ञानिकांनी सर्वप्रथम या धर्तीवर वनस्पतींच्या उत्क्रांतीवर काम सुरु केले. एस एॅडलिशर (१८०५- १८४९) आणि पुढे ए. डब्लू. आइश्लर (१८३९- १८८७) या दोघांनी वनस्पतींतील वंश-उत्क्रांतीच्या आधारे वर्गीकरण सादर केले. कालांतराने याच कामाची सुधारित पुर्नमांडणी आणखी दोघा जर्मन शास्त्रज्ञांनी केली. ए. अँग्लर (१८४०-१९३०) आणि के. प्रांट्ल ( १८८७- १९९५) यांनी त्यांचे काम अनेक खंडांत प्रसिद्ध केले. वनस्पतींमधील साधी सोपी पुष्परचना ते जटील पुष्परचना हा प्रवास त्यांच्या कामाचा गाभा होता.
याच सुमारास अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ सी. ई. बॅसे (१८४५-१९१५) यांनी वनस्पतींमधील आदिम आणि प्रगत गुणांचा आधार वर्गीकरणासाठी वापरला. ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन हचिन्सन (१८८४-१९७२) यांनीही उत्क्रांतीवर आधारित वर्गीकरणांवर पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी वनस्पतींमधील चोविस सिद्धांतांवर (‘डिक्टा’) भर दिला.
नंतरच्या काळात अनेक वनस्पतीशास्त्रज्ञांनी वनस्पतींचे वर्गीकरण या विषयावर काम करून आपले विचार मांडले; पण हे सर्व काम प्रामुख्याने सपुष्प वनस्पतींपर्यंत मर्यादित राहिले. उल्लेखनीय रशियन शास्त्रज्ञ आम्रेन तख्तजान, तसेच रॉल्फ डाल्ग्रेन (डेनमार्क) आर्थर क्रोन्क्विस्ट आणि रॉबर्ट थॉर्न (अमेरिका) या सर्व शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीवर आधरित वर्गीकरण करणाऱ्या सर्वच पूर्वसूरींच्या कामाचा आधार घेऊन आपले सुधारित प्रबंध मांडले. या नवीन कामास विज्ञानात झालेल्या प्रगतीची जोड मिळाल्याने या सर्वाचे काम अतिशय महत्त्वाचे मानले जाते. नवीन शोध आणि पुराव्यांच्या आधारे वर्गीकरणाच्या क्षेत्रात क्रांती घडून आली, ती या शास्त्रज्ञांच्या सुधारित वर्गीकरणामुळे.

वनस्पतींचे विश्व हे खूप भव्य आहे. विविधतेने परिपूर्ण आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नांती असे लक्षात येते की, जे काही सादर झाले त्यास परिपूर्ण म्हणता येणार नाही, ते अंतीम नाही. नवनवीन शोध त्यात अनेक बदल सुचवितात आणि पुढील कामात प्रोत्साहन देतात. वनस्पतींच्या वर्गीकरणाचा इतिहास आणि विकास यांची मार्गक्रमणा याच प्रकारे चालू राहिली आहे.
– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ ऋऋ्रूी
office@mavipamumbai.org
(( ज्येष्ठ वनस्पती-वर्गीकरणकार जॉन हचिन्सन ))