News Flash

नवदेशांचा उदयास्त : महासागरांची संयोगभूमी पनामा

पनामाने कोलंबिया देशाचे स्वामित्व कबूल करणे, पनामाच्या अनेक नेत्यांना पसंत पडणारे नव्हतेच.

स्पॅनिशकाळातील पनामाचा नकाशा

सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

अ‍ॅटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांच्या मधला, जमिनीचा चिंचोळा- जवळचा पट्टा मध्य अमेरिकेतील पनामात सापडल्याने स्पॅनिश साम्राज्यात पनामाचे महत्त्व वाढले. १५३८ साली स्पॅनिश साम्राज्याने पनामात ठिकठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्या काळात दक्षिण अमेरिकेत, स्पॅनिश साम्राज्याच्या अनेक देशांमध्ये वसाहती होत्या. पेरू देशातील स्पॅनिश वसाहत त्यांची प्रमुख वसाहत असल्यामुळे या वसाहतीच्या गव्हर्नरकडेच पनामा वसाहतीचे प्रशासन सोपविले गेले. पनामावरचा स्पॅनिश अंमल १५३८ ते १८२१ अशी जवळपास तीनशे वर्षे टिकला. वसाहत स्थापन करताना पनामाच्या मूळच्या रेड इंडियन लोकांनी स्पॅनिशांना मोठा विरोध केला परंतु पुढे साथरोगांचा प्रादुर्भाव होऊन त्यातले अर्धेअधिक आदिवासी पळून कोलंबिया वगैरे प्रदेशात गेले. स्पॅनिश लोकांनी त्यामुळे आफ्रिकेतून गुलाम आणून त्यांच्याकडून कामे करवून घेतली. अत्यंत क्रूर असा स्पॅनिश गव्हर्नर दाविला याने पनामा सिटी हे प्रशासकीय राजधानीचे शहर वसविले. ही जुनी पनामा सिटी सोन्याचांदीने खचाखच भरलेली आणि तटबंदीने सुरक्षित होती. १६७१ मध्ये हेन्री मॉर्गन या इंग्लिश लुटारू चाच्याने पनामा सिटीवर हल्ला करून लूट तर केलीच, पण सर्व शहर बेचिराख करून मॉर्गन परत गेला. दोन वर्षांत, स्पॅनिशांनी जुन्या पनामा सिटीपासून पाच कि.मी. वर सध्याचे नवे पनामा सिटी बांधले. साधारणत: १८०० साली स्पॅनिश साम्राज्य अस्ताला गेले आणि त्यांच्या दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील सर्व वसाहती स्वतंत्र होऊ लागल्या. न्यू ग्रॅनडा ही स्पॅनिश वसाहत १८१९ मध्ये स्वतंत्र होऊन त्याने आसपासच्या काही देशांसह मिळून ग्रॅन कोलंबिया हा राष्ट्रसंघ स्थापन केला. या राष्ट्रसंघात बोलिव्हिया, इक्वेडोर, कोलंबिया, पेरू, व्हेनेझुएला हे देश होते. १८२१ साली पनामा या ग्रॅन कोलंबिया राष्ट्रसंघात समाविष्ट झाला. या राष्ट्रसंघाचे कामकाज कोलंबियाच्या बोगोटा या शहरातून चालत असे. पुढे या संघातील देशांचे आपसातच खटके उडू लागले, एकेक देश संघातून बाहेर पडला. अखेरीस ग्रॅन कोलंबिया राष्ट्रसंघ बरखास्त होऊन पनामा हा कोलंबिया या देशाचा एक प्रांत बनून राहिला. पनामाने कोलंबिया देशाचे स्वामित्व कबूल करणे, पनामाच्या अनेक नेत्यांना पसंत पडणारे नव्हतेच.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:30 am

Web Title: information about panama country zws 70
Next Stories
1 कुतूहल : अवकाश व्यापणारी भूमिती
2 नवदेशांचा उदयास्त : पनामा
3 कुतूहल : बहुपयोगी बीजभूमिती
Just Now!
X