05 March 2021

News Flash

सुशोभित पॅरिस

पॅरिसमधील मध्ययुगीन कालखंडातील सध्या सुस्थितीत असलेल्या, पॅरिसच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या धार्मिक

पॅरिसमधील मध्ययुगीन कालखंडातील सध्या सुस्थितीत असलेल्या, पॅरिसच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या धार्मिक वास्तूंपकी ‘सेंट चॅपेल’ ही वास्तू आहे. ‘सेंट लुई’ या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेल्या लुई नववा याने ही वास्तू इ.स. १२४१ ते १२४८ या काळात बांधली. नोत्र दाम ऑफ पॅरिसप्रमाणेच पॅरिसची स्वतंत्र ओळख सांगणाऱ्या सेंट चॅपेलमध्ये येशू ख्रिस्ताला अखेरीस घातलेल्या काटेरी मुकुटाचे अवशेष ठेवलेले आहेत. १८ मीटर उंचीच्या भव्य रंगीत काचांच्या तावदानांमुळे संपूर्ण चर्च रंगीत प्रकाशाने उजळून निघते. फिलीप द्वितीय ऑगस्टस या राजाने प्रथम पॅरिस शहर सुशोभित करण्यास सुरुवात केली. १६ व्या शतकात फ्रान्स्वा या राजाने नवीन वास्तू बांधताना त्यात आधुनिक तंत्राचा आणि शैलीचा वापर केला. त्याने केलेल्या स्थापत्यामध्ये लुव्र पॅलेसचे नूतनीकरण, हॉटेल द व्हीली, नॅचरल हिस्ट्री म्युझियम, लक्झेम्बर्ग पॅलेस यांचा समावेश आहे.
चौथ्या हेन्रीच्या काळात सोळाव्या शतकाच्या अखेरीस पॅरिसच्या भूतपूर्व सम्राटांच्या नावाने मोठे, शोभिवंत चौक उभारण्याची पद्धत सुरू झाली. या चौकांपकी लुई पंधराव्याच्या स्मरणार्थ प्लेस डी काँकार्ड, लुई तेराव्याच्या नावाने प्लेस व्होगास, हेन्री चतुर्थच्या नावाने बांधलेला प्लेस डाऊफिन हे विशाल आणि सुशोभित चौक आहेत. शानदार इमारतींचे, सुंदर आणि विशाल चौकांचे, सुंदर बागबगिच्यांचे आणि रुंद योजनाबद्ध आखीव रस्त्यांचे शहर अशी पॅरिसची प्रतिमा आहे. अशा पॅरिसच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे तिथल्या राज्यकर्त्यांचे.
प्रसिद्ध नेपोलियन प्रथमचा पुतण्या लुई नेपोलियन ऊर्फ नेपोलियन तृतीय हा फ्रान्सचा अखेरचा राज्यकर्ता. मध्ययुगीन राजांपासून पॅरिसला सुशोभित राखण्याची परंपरा यानेही चालवली. इ.स. १८५२ ते १८७० अशा आपल्या कारकीर्दीत त्याने रुंद रस्ते, जागोजागी बगिचे, चौक आणि योजनाबद्ध वस्तीची निर्मिती केली.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

मोह
मोह हा वृक्ष लालसर, किरमिजी, कुसुंबी अशा वेगवेगळ्या मोहक रंगछटांनी सजलेला मूलत: भारतीय आहे. याच्या कुळातले वृक्ष ‘सॅपोटॅसी’ म्हणजेच ‘मोह’ कुळातले वृक्ष म्हणूनच ओळखले जातात. याचे शास्त्रीय नाव ‘मधुका इंडिका’ असे आहे. भारतातल्या जंगलांत आढळणाऱ्या या झाडाचा प्रत्येक भाग आदिवासींसाठी उपयोगाचा; त्यामुळे त्यांच्या जीवनात मोहाला अनन्यसाधारण महत्त्व. त्याचे आíथक मोल ओळखून इतर प्रदेशांतही याची लागवड केली जाते.
मोह १०-१५ मीटपर्यंत वाढतो. भरपूर फांद्यांवरील घनदाट पर्णसंभार पेलून धरलेले खोड काहीसे बुटके दिसते. लंबगोलाकार, चिवट पाने फांद्यांच्या टोकाशी एकवटलेली असतात. कोवळ्या पानांवर लव असते. पाने १०-२० सें.मी.लांबीची आणि ५-१३ सें.मी. रुंदीची असतात.
पानगळ झाली की फेब्रुवारी-एप्रिलच्या दरम्यान फुले यायला सुरुवात होते. फांद्यांच्या टोकाशी, लोंबत्या फुलांचे घोस येतात. फुलाच्या मांसल पाकळ्या पिवळसर, किंचित वळलेल्या असतात. मोहाची फुले रात्री उमलतात. सकाळी झाडाखाली त्यांचा सडा पडतो. बहर असताना या झाडाजवळून जरी गेले तरी फुलांच्या गोड-धुंद वासाने डोके गरगरते इतका त्याच्या फळांना-फुलांना मधुर वास येतो. यावरूनच ‘मधुका’ हे नाव पडले. फळाफुलांत सर्व अन्नघटक आहेतच; पण साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण लक्षणीय आहे. आदिवासी लोक फुले कच्ची खातात, त्यांची भाजी करतात. फुलांपासून दारूही करतात. हीच ती ‘मोहाची दारू.’
जून-जुलमध्ये ४-५ सें.मी. व्यासाची रसदार, गरयुक्त, लंबगोलाकार फळे येतात. फळे सुरुवातीला हिरवी नंतर पिवळी-नािरगी होतात. फळात चकचकीत काळ्या बिया असतात. आदिवासी लोक बियांपासून तेल काढून हे तेल स्वयपांकात, साबण बनविण्यासाठी वापरतात. याची पेंड जंतुनाशक आहे. ती खतामध्ये वापरतात. पेंडीच्या धुरामुळे कीड, मुंगी येत नाही. मोहाची पाने पाळीव प्राण्यांसाठी उत्तम खाद्य आहे.
मोहाच्या प्रत्येक भागाचा औषधांत उपयोग होतो. सालीचा काढा शरीराचा दाह, खाज व कृमी कमी करण्यासाठी होतो. मूच्र्छा उतरवण्यासाठी बियांचे नस्य वापरतात. मोहाच्या सालीत टॅनीन असते म्हणून सालीचा उपयोग रंगासाठी करतात. आंतरसालीचा उपयोग वीर्यवाढीसाठी करतात.असा हा बहुगुणी वृक्ष आदिवासींचा ‘देव’ आहे.

अनिता कुलकर्णी (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2016 4:11 am

Web Title: information about paris
Next Stories
1 त्र्यंबक शंकर महाबळे
2 पॅरिसला रूप येऊ लागले..
3 कुतूहल – मिर्मिकोफिली
Just Now!
X