आशिया आणि आफ्रिका खंडांत गेल्या शतकात नव्याने अस्तित्वात आलेले बहुतेक देश हे त्यापूर्वी अनेक शतके युरोपातील विविध साम्राज्यांच्या वसाहतींच्या अमलाखाली होते. या नवदेशांच्या जनतेवर अंमल करणाऱ्या युरोपियन लोकांचा मोठा प्रभाव पडला. या वसाहतींपासून मुक्ती मिळाल्याला साठ-सत्तर वर्षांचा कालावधी लोटला तरीही या नवदेशांच्या लोकांच्या जीवनशैलीवर, भाषेवर या युरोपियनांचा पगडा बसलेला आजही दिसून येतो. बराच मोठा काळ फ्रेंचांची वसाहत असलेल्या पश्चिम आफ्रिकेतल्या माली या देशाच्या बाबतीत हे  जाणवते. मालीमधील राजभाषा, प्रचलित भाषा आहे फ्रेंच.

माली या नावापेक्षा या देशातल्या ‘टिंबक्टू’ शहराचे नाव आपण हिंदी चित्रपटांमधून अधिक वेळा ऐकले आहे! पश्चिम आफ्रिकेतल्या या देशाचा उत्तरेतला निम्मा प्रदेश सहारा वाळवंटीय असून मध्ययुगीन काळापर्यंत सहारातून चालणाऱ्या व्यापारावर आफ्रिकेतल्या माली साम्राज्य, घाना साम्राज्य आणि सोनघाई साम्राज्य या प्रबळ सत्तांचे नियंत्रण होते. ही तिन्ही साम्राज्ये त्या काळात मालीचा हिस्सा होती.

एकोणिसाव्या शतकात युरोपातील अनेक देश आफ्रिकेतल्या प्रदेशांमध्ये व्यापार वाढवून सत्ता स्थापण्याच्या प्रयत्नात होते. फ्रेंच राजवटीने १८९२ साली मालीच्या काही प्रदेशात आपली वसाहत स्थापली. फ्रेंचांच्या सुदानमधील वसाहतीला मालीची वसाहत जोडली आणि त्यामुळे मालीतली फ्रेंच वसाहतही फ्रेंच सुदान नावाने ओळखली जाऊ लागली. पुढे फ्रेंचांनी १९५९ साली या फ्रेंच सुदानमध्ये सेनेगल हा देशही समाविष्ट केला आणि १९६० ला फ्रेंच सुदानच्या स्वातंत्र्याची घोषणा करून त्या नवीन देशाचे नाव ‘माली फेडरेशन’ केले. त्यानंतर दोनच महिन्यांमध्ये सेनेगल हे या माली राष्ट्रसंघातून बाहेर पडले आणि मालीच्या नेत्यांनी २२ सप्टेंबर १९६० रोजी मालीमध्ये प्रजासत्ताक सरकार स्थापन करून माली हा सार्वभौम देश अस्तित्वात आल्याची घोषणा केली. सुरुवातीचे हे प्रजासत्ताक एकपक्षीय होते.

१९६० साली तिथल्या लोकांचे सरकार जरी सत्तेवर आले तरी पुढची ३० वर्षे या प्रदेशात दुष्काळ, लष्करी दडपशाही, सरकार आणि लष्कराविरोधात होणारे उठाव, बंड यामुळे मालीत अनागोंदी माजली होती.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com