News Flash

कुतूहल : टिनपाट

प्राचीन काळापासून कथिलाचा उपयोग ब्रॉन्झ हा मिश्र धातू बनवण्यासाठी केला जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘टिनपाट!’ हा  हेटाळणीवजाच  शब्द. काहीही कमकुवत, दुबळं, कशाच्याही खिजगणतीत नसणारं, काहीही किंमत नसणारं असं काही असलं- मग ती वस्तू असेल नाहीतर व्यक्ती- तिला उद्देशून हाच शब्द आपण वापरतो. का? तर ‘टिन’ म्हणजे कथिल असाच लेचापेचा, कुठंही, कधीही वाकणारा, ताठ उभं न राहू शकणारा, सहजासहजी वितळणारा धातू आहे म्हणून. जणू धातू या शब्दाला कलंकच. पण त्याच्या अंगी असलेल्या एका गुणामुळं तो भल्याभक्कम धातूंनाही संरक्षण देतो. इतर धातू, अगदी ताकदवान लोहसुद्धा गंजतं, सडतं, हवेतल्या ऑक्सिजनबरोबर संग करून अंगाला भोकं पाडून घेतं. म्हणून तर त्याच लोखंडाच्या पत्र्याला या कथिलाचं लिंपण करतात. ज्या डब्यांमध्ये पॅकबंद अन्नपदार्थ ठेवायचे त्यांना दोन्ही बाजूंनी कथिलाचा लेप लावायला विसरत नाहीत. त्यापायी त्या पत्र्याला चांदीसारखी झळाळीही येते. तो बोनस. पण मुख्य काम तो पत्रा सडू द्यायचा नाही. आतल्या पॅकबंद पदार्थाला बाहेरच्या हवेचा स्पर्शही होऊ द्यायचा नाही. पूर्वी तर सँडविचसारखे खाद्यपदार्थ याच कथिलाच्या मुलायम पत्र्यात गुंडाळून दिले जात. आता त्याची जागा अ‍ॅल्युमिनिअमच्या पत्र्यांनी घेतल्यापासून कथिलाचा वापर कमी झालाय. पण डब्यांच्या अस्तरासाठी आजही कथिलच कामी येतं.

कमी तापमानाला वितळणं हा त्याचा दोष मानायचा तर त्याच गुणधर्माचा वापर करून इलेक्ट्रॉनिक सर्किटमधले दोन ट्रान्झिस्टर एकमेकांना जोडताना त्याचाच वापर करून सोल्डिरगची प्रक्रिया पार पाडली जाते. शिसं आणि कथिल यांच्या मिश्र धातूचा उपयोग ही जोडणी करण्यासाठी केला जातो. त्यात कथिलाचं प्रमाण सत्तर टक्क्यांपर्यंतही असू शकतं. कथिल जसं लवकर वितळतं तसंच त्याच्यापासून उष्णतेचा स्रोत दूर केला की ते लवकर घनीभूतही होतं. टिकून राहतं.

प्राचीन काळापासून कथिलाचा उपयोग ब्रॉन्झ हा मिश्र धातू बनवण्यासाठी केला जात आहे. एका कालखंडात तर ब्रॉन्झचा उपयोग इतक्या मोठय़ा प्रमाणावर होत होता की आता त्याला ब्रॉन्झ-युग असंच म्हटलं जातं. त्याच काळातले नाही तर त्यानंतरचे, अगदी आजचेही, पुतळे बनवण्यासाठी पहिला विचार केला जातो तो ब्रॉन्झचाच. उन्हापावसाला तोंड देत टिकून राहणं या त्याच्या गुणधर्माचाच हा परिपाक.

म्हणाल आता कोणालाही ‘टिनपाट’?

– डॉ. बाळ फोंडके, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:02 am

Web Title: information about tinpot
Next Stories
1 जे आले ते रमले.. : अजमेरचे गरीब नवाज चिश्ती
2 कल्हऽऽईय्य..
3 जे आले ते रमले.. : हजरत मोईनुद्दीन चिश्ती
Just Now!
X