News Flash

कुतूहल : जस्त (झिंक)

ग्रीक आणि रोमन लोकांना जस्त हे मूलद्रव्य माहिती होतं, पण त्यांनी त्याचा कधी उपयोग केला नाही.

(संग्रहित छायाचित्र)

अणुक्रमांक ३० असलेले आवर्तसारणीच्या बाराव्या गणातील जस्त हे पहिले मूलद्रव्य. लोखंडापेक्षा हलका! कठीण पण ठिसूळ असणारा हा निळसर-पांढरा, चकाकणारा हा चुंबकरोधी धातू विजेचा सुमार वाहक! १००-१५० अंश सेल्सिअस तापमानाला तो मऊ होतो, सुमारे २१० अंश सेल्सिअस तापमानाला तो पुन्हा ठिसूळ बनतो आणि त्याला ठोकून पावडर करता येते. पॅरासेल्सस या किमयागाराने टोकदार रचनेवरून या मूलद्रव्याला ‘झिंके’ हे नाव दिले. जर्मन भाषेतील ‘झिंके’ या शब्दाचा अर्थ ‘दातेरी’, ‘टोकेरी’ किंवा ‘दगडासारखा’.

भारतात सु. २००० वर्षांपूर्वी जावर, राजस्थान येथे जस्ताच्या खाणी कार्यरत होत्या. इ.स.पू. सहाव्या शतकात जस्त धातूचे उत्पादन होत असल्याचे पुरावे या खाणींवरून मिळतात. १६६८ मध्ये बेल्जियममधील पी. एम्. द रेस्पॉ या किमयागाराने जस्ताच्या ऑक्साइडपासून जस्त मिळविल्याचे लिहिले आहे. १८व्या शतकाच्या सुरुवातीला एटिन फ्रँकॉइस जॉफ्रॉय ह्य़ाने जस्ताचे विगालन (smelting) करताना लोखंडाच्या सळईवर जस्ताच्या ऑक्साइडचे पिवळे स्फटिक जमा झाल्याचे वर्णन केले आहे. १७३८ मध्ये इंग्लंडमधील विल्यम चँपियन याने जस्ताच्या काबरेनेटपासून जस्त मिळविण्याचे पेटंट घेतले.

ग्रीक आणि रोमन लोकांना जस्त हे मूलद्रव्य माहिती होतं, पण त्यांनी त्याचा कधी उपयोग केला नाही. धातू म्हणून जस्ताची खरी ओळख भारतीयांनाच पटली. इ.स. ११०० ते १५०० या काळात भारतात जस्त शुद्धीकरण केले जात असे. इ.स. १५०० मध्ये चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर जस्त शुद्ध केले जात असे. १७४५ मध्ये स्वीडनच्या किनाऱ्यावर बुडालेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजामध्ये चीनमधील शुद्ध जस्त होते. असं असलं तरी शुद्ध स्वरूपात जस्त मिळविण्याचे श्रेय जर्मन रसायनतज्ज्ञ अँड्रिज मारग्राफ याला देतात. १७४६ मध्ये एक नवीन धातू म्हणून अँड्रिज मारग्राफने जस्ताचा शोध लावला.

जस्त हा क्रियाशील धातू असून तीव्र क्षपणक  आहे. शुद्ध जस्त हवेत ठेवल्यास हवेतील कार्बन डायऑक्साइडबरोबर अभिक्रिया होऊन त्यावर जस्त काबरेनेटचा थर जमा होतो. या थरामुळे हवा आणि पाणी यांचा जस्त धातूवर परिणाम होत नाही.

 विजय ज्ञा. लाळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 4:29 am

Web Title: information about zinc
Next Stories
1 जे आले ते रमले.. : पाटण्याचे पठाण
2 कुतूहल : विद्युत सुवाहक.. तांबे
3 जे आले ते रमले.. : सुरी साम्राज्य
Just Now!
X