संक्रमण मूलद्रव्यांच्या रंग दर्शवण्याच्या गुणधर्मानुसार तांबेदेखील नािरगी-लाल रंग दर्शवते. पाण्याची त्यावर अजिबातच अभिक्रिया होत नाही. परंतु हवेमध्ये मात्र त्याचे हळुहळू ऑक्सिडीकरण होते आणि ऑक्साइडचा काळसर संरक्षक थर तयार होतो आणि बराच काळ आद्र्र हवेशी संपर्क आल्यास कॉपर सल्फेटचा अतिशय आकर्षक असा हिरवा थर पृष्ठभागी तयार होतो. न्यूयॉर्कमधील हिरवा भासणारा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा २८ टन तांब्यापासून बनवला आहे.

तांब्याच्या खाणीतून वाहणाऱ्या पाण्यात लोखंड घातल्यास त्यावर तांब्याचा थर बसत असे. यालाच लोखंडाचे तांब्यात रूपांतर झाले, असे समजतं. खरं तरं खाणीतील पाण्यात तांब्याचे संयुग असते, हे १६४४ मध्ये व्हॅन हेल्माँट यांनी सिद्ध केले. १६७५ मध्ये रॉबर्ट बॉईल यांनी, लोखंडाचे तांब्यात होणारे रूपांतर हे विस्थापन अभिक्रियेने होते असे सिद्ध केले. विस्थापन अभिक्रियेत संयुगातील अतिक्रियाशील असणारे मूलद्रव्य कमी क्रियाशील मूलद्रव्यांचे अभिक्रियेतून विस्थापन करते. लोखंड तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील असते म्हणून लोखंडावर तांब्याचा थर चढतो.

निसर्गात तांबे शुद्ध स्वरूपात सापडत असले तरी त्याचे प्रमाण फार कमी आहे. तांब्याची संयुगे खनिजाच्या स्वरूपात मात्र मोठय़ा प्रमाणात आढळतात. त्याचे उत्पादन चिली, पेरू आणि चीन या देशात मोठय़ा प्रमाणात केले जाते. तांब्याची एकूण २९ समस्थानिके असून त्यातील उ४-63 व उ४-65 ही स्थिर असून नैसर्गिक स्थितीत आढळतात. इतर सर्व समस्थानिके मात्र किरणोत्सारी आहेत. वनस्पती, प्राणी तसेच मानवी आरोग्यासाठी तांबे हा अत्यावश्यक असा सूक्ष्मपोषक घटक आहे.

मृदुकाय प्राण्यांमध्ये तांबे हे श्वसन-प्रथिनाचे केंद्रक व संधिपाद प्राण्यांमध्ये ते हिमोसायनीनच्या केंद्रकात आढळते. सस्तन प्राण्यांमध्ये लोहयुक्त हिमोग्लोबिन जे कार्य करते तेच कार्य मृदुकाय प्राण्यांमध्ये व संधिपाद प्राण्यांमध्ये श्वसन-प्रथिन व हिमोसायनीन करते.

शरीरात तांब्याची कमतरता फार क्वचित आढळणारा आजार असला तरी यामुळे शरीरातील लाल पेशी कमी होतात म्हणूनच रक्तक्षय या आजाराच्या उपचारात तांबे वापरले जाते. शरीरातील चयापचय व अवयवांची विविध कार्ये सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. तांब्याच्या कमतरतेमुळे मेनकाझ सिन्ड्रोम हा जनुकीय आजार आढळतो.

– ज्योत्स्ना ठाकूर मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org