19 October 2019

News Flash

कुतूहल : बदलते जग

पृष्ठभाग घट्ट होताना झालेल्या आकुंचनामुळे पर्वतरांगा निर्माण झाल्या.

जगाच्या नकाशावर वेगवेगळे भूखंड आज जिथे दिसतात, पूर्वी ते तिथे नव्हते. आज जिथे आल्प्स आणि हिमालय पर्वतांच्या रांगा आहेत, तिथे एके काळी टेथिस नावाचा महासागर होता. त्याच्या उत्तरेला लॉरेशिया, तर दक्षिणेला गोंडवनालँड असे दोन प्रचंड भूखंड होते. ऑस्ट्रियन भूशास्त्रतज्ज्ञ एडुआर्ड सुएस याने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व्यक्त केलेल्या मतानुसार, पृथ्वीचा सुरुवातीचा द्रवरूपातला पृष्ठभाग थंड होऊन घट्ट होऊ लागल्यावर जड पदार्थ खाली गेले व हलके पदार्थ पृष्ठभागाच्या स्वरूपात वर राहिले. पृष्ठभाग घट्ट होताना झालेल्या आकुंचनामुळे पर्वतरांगा निर्माण झाल्या. आफ्रिका आणि भारतीय उपखंड या सर्वाचा मिळून पूर्वी गोंडवनालँड नावाचा एकच भूभाग अस्तित्वात असल्याची शक्यता त्याने व्यक्त केली. सुएसने आपले हे मत या सर्व प्रदेशांत आढळणाऱ्या जीवाश्मांतील आणि खडकांतील साधम्र्यावरून वर्तवले.

जर्मन वैज्ञानिक आल्फ्रेड वेग्नेर यानेही १९१२ साली, आफ्रिकेत आणि दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या काही वनस्पती आणि प्राण्यांच्या जीवाश्मांतील, तसेच खडकांतील साधम्र्यावरून दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंड पूर्वी एकमेकांशी जोडले असण्याची शक्यता मांडली. मात्र वेग्नर हा सुएस याच्या जड पदार्थ खाली जाण्याच्या मताशी सहमत झाला नाही. वेग्नरच्या मते भूपृष्ठाच्या आकुंचनामुळे पर्वत निर्माण झाले असते, तर पृथ्वीवर सर्वत्र सारख्याच प्रकारचे पर्वत दिसायला हवे होते. वेग्नरच्या मते पर्वतांची निर्मिती भूपृष्ठाच्या विविध भागांच्या हालचालीतून होत असावी. भूपृष्ठाच्या विविध भागांच्या एकमेकांवर आदळण्यातूनच, त्यांच्या सीमेवर घडय़ा पडून पर्वत निर्माण झाले असावेत. पर्वतांची अशी निर्मिती ही वेगवेगळ्या वेळी घडत असल्याने, वेग्नरचा हा सिद्धांत पर्वतांच्या वयांतील फरकाचे स्पष्टीकरण देऊ  शकला. सुरुवातीला काहीसा आक्षेपार्ह ठरलेला वेग्नरचा सिद्धांत, १९६० सालानंतर मिळालेल्या पुराव्यांमुळे स्वीकारला गेला.

वेग्नरच्या सिद्धांताच्या आजच्या स्वरूपानुसार पृथ्वीचे संपूर्ण कवच हे सात मोठय़ा आणि काही लहान तुकडय़ांमध्ये विभागले गेले आहे. या ‘भूपट्टां’ची सतत हालचाल चालू असते. सुमारे अठरा कोटी वर्षांपूर्वी सर्व भूखंड हे पँजिआ नावाच्या एका मोठय़ा भूखंडाचे भाग होते. भूपट्टांच्या हालचालीमुळे यातून प्रथम गोंडवनालँड, लॉरेशिया हे भूखंड वेगळे झाले. त्यानंतर या दोन भूखंडांपासून हळूहळू आणखी भूखंड वेगळे होत होत, आजचे जग निर्माण झाले.

 डॉ. विद्याधर बोरकर

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

First Published on May 17, 2019 12:11 am

Web Title: interesting facts about planet earth