21 October 2020

News Flash

कुतूहल : आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन

घरामध्ये आपण स्वच्छतेसाठी अनेक रासायनिक द्रवरूपी फवारे मारतो.

आज करोना प्रादुर्भावामुळे केलेल्या टाळेबंदीमुळे आपण सर्व आपापल्या घरात आहोत. ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणाऱ्यांची ‘हे घरचि माझे विश्व’ अशी परिस्थिती झाली आहे. अशा स्थितीत थोडा वेगळा विचार करून पाहू. जैवविविधता अनुभवण्यासाठी आपण अनेक वन्यजीव अभयारण्ये, पाणथळ भूमी, गवताळ प्रदेश, नद्यांना भेटी देतो. परंतु आपल्या आजूबाजूला, अगदी आपल्या घरातदेखील जैवविविधता आहे, हे सहसा आपल्या लक्षात येत नाही.

सर्वसाधारणपणे आपल्या घरात जिवाणू, बुरशी यांसारख्या अतिसूक्ष्म जीवांपासून ते माश्या, मुंग्या, झुरळ, डास, वाळवी यांसारखे कीटक आणि पाली, कोळी, उंदीर असे अनेक जीव येऊन-जाऊन असतात किंवा कायमचा मुक्कामही ठोकतात. ‘नेचर’ या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, सर्वसामान्यपणे तब्बल १०० विविध प्रजातींचे संधिपाद (ज्यांच्या पायांना सांधे आहेत असे अपृष्ठवंशी) प्राणी घरात राहतात. यातील बहुतांश प्राणी हे निरुपद्रवी असतात. घरामध्ये आपण स्वच्छतेसाठी अनेक रासायनिक द्रवरूपी फवारे मारतो. यामुळे मानवी आरोग्याला उपायकारक असणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंच्या काही प्रजाती नष्ट होतात. यामुळे काही वेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात. परंतु घरातील काही प्राणी अशा सूक्ष्म जिवाणूंचा घरात फैलाव करून त्या जिवाणूंची विविधता पुन्हा प्रस्थापित करण्यास हातभार लावतात, असेदेखील या संशोधनात आढळून आले आहे!

अशा या घरातील तसेच घराबाहेरील वैशिष्टय़पूर्ण जैवविविधतेचे व्यापक भान निर्माण करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन’ संयुक्त राष्ट्रांकडून २२ मे रोजी साजरा होतो आहे. ‘आपल्या पर्यावरणीय समस्यांचे उत्तर निसर्गातच आहे’ हे यंदा हा दिवस साजऱ्या करण्यामागील संकल्पना-सूत्र आहे. २०२० हे वर्ष अनेकांगांनी महत्त्वाचे आहे. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या ‘जैवविविधता दशका’ची यंदा सांगता होत आहे. तसेच सद्य करोना प्रादुर्भावाने पर्यावरण- जैवविविधता यांच्याविषयी नव्याने विचार करायला भाग पाडले आहे. मानवाने कितीही भौतिक प्रगती साधली, तरी त्याचे अवलंबित्व अखेर निसर्ग आणि जैवविविधतेवरच आहे, हेही यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे आजच्या आंतरराष्ट्रीय जैविक विविधतादिनी जैवविविधतेच्या संवर्धनाचा निश्चय करायला हवा. सुरुवात घरातील जैवविविधतेपासून करू.. ती अनुभवू!

– सुरभी वालावलकर     

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 3:04 am

Web Title: international biodiversity day zws 70
Next Stories
1 मनोवेध  : मंत्रचळ.. विचारांची गुलामी
2 मनोवेध : साचेबद्ध विचार
3 कुतूहल : मानवी आरोग्य आणि जैवविविधता
Just Now!
X