News Flash

आंतरराष्ट्रीय एककांचे मापदंड

कोणतेही मोजमाप करायचे झाले, की एकके अपरिहार्य असतात.

कोणतेही मोजमाप करायचे झाले, की एकके अपरिहार्य असतात. मग ती पूर्वीची कालमापनासाठी वापरली जाणारी घटका-पळे-प्रहर-दिवस असोत, की आजची सेकंद-मिनिट-तास.. लांबीरुंदीसाठी वापरली जाणारी वीत-हात-योजने असोत, की सेंटिमीटर-मीटर-किलोमीटर.. तसेच वजनासाठी वापरली जाणारी रत्तल-तोळा-शेर असोत, की ग्रॅम-किलो-िक्वंटल! या मोजमापांचे ज्ञान जर अचूकपणे दुसऱ्याला कळायला हवे असेल, तर दोघे वापरत असलेली एकके ही एकमेकांबरोबर अचूकपणे जुळणे आवश्यक आहे. म्हणूनच आपण आज आंतरराष्ट्रीय एककांचे मापदंड वापरतो.

इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स (रक) या स्वीकृत आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार एकूण सात मूलभूत एकके निश्चित केली गेलेली आहेत- मीटर (लांबी), सेकंद (वेळ), किलोग्रॅम (वस्तुमान), केल्विन (तापमान), अँपिअर (विद्युतप्रवाह), मोल (कणसंख्या) आणि कँडेला (प्रकाशदीप्ती). या एककांवर आंतरराष्ट्रीय सर्वसहमती आहे. थोडक्यात, एक मीटर लांबी किंवा एक किलोग्रॅम वस्तुमान हे सर्व जगभर एकसमानच भरते. या मापदंडांच्या बळावरच आज आवश्यक असलेल्या माहितीची अचूक देवाणघेवाण शक्य आहे. इतर साऱ्या मोजमापांची एकके – उदाहरणार्थ, वेग (मीटर प्रति सेकंद), घनता (किलोग्रॅम प्रति घनमीटर), इत्यादी – ही या वरील सात मूलभूत एककांच्या संदर्भाद्वारे निश्चित करता येतात.

पण ही सारी एकके तर केवळ मानवनिर्मित आहेत. मग एक मीटर किंवा एक सेकंद म्हणजे नक्की किती, हे कसे ठरवायचे? हे वरवर वाटते तेवढे सोपे नाही. ही एककनिश्चिती अशी असली पाहिजे की, जगात सर्वत्र ही एकके अगदी समान असतील, ती कधीही सहजरीत्या पडताळून पाहता येतील. वर्षांनुवर्षांनंतरही त्यांच्यामध्ये तसूभरही फरक पडणार नाही.

यासंबंधी संशोधन व शिफारस करण्याचे काम फ्रान्समधील ‘आंतरराष्ट्रीय वजन व मोजमाप संस्थे’त केले जाते. आता या संदर्भात २०१८चे वर्ष ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे, कारण अधिक अचूकतेसाठी काही एककांच्या व्याख्या बदलण्याच्या प्रस्तावावर सध्या संशोधन व विचारमंथन सुरू आहे.

सात मूलभूत एककांपैकी बदल होणे अपेक्षित असलेली एकके ही किलोग्रॅम, अँपिअर, केल्विन आणि मोल ही आहेत. हे क्रांतिकारक बदल व त्यांची कारणे जाणून घेण्याच्या दृष्टीने, या सर्वच एककांचा परामर्श घेऊ.

– डॉ. अमोल दिघे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

डॉ. भालचंद्र नेमाडे – साहित्य

भालचंद्र नेमाडे यांच्या लेखनाची सुरुवात कवितेने झाली. १९५६ मध्ये त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. पण त्यांना १९६३ पासून ओळख मिळाली ती ‘कोसला’ या कादंबरीमुळे आणि नंतरच्या त्यांच्या समीक्षालेखनामुळे.‘मेलडी’, ‘देखणी’ या काव्यसंग्रहांतील त्यांची कविता प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वत:च्या आयुष्याबद्दल बोलत राहते. महाविद्यालयीन तरुणांचे भावविश्व, प्रेमाकर्षण, तरुणपण, बेकारी, सर्वत्र आढळणारा मूल्यऱ्हास, नोकरीतील, शिक्षण क्षेत्रातील कमालीची बकाली, समाजातील आणि नात्यातील गुंतागुंत, या साऱ्या वास्तवाला तोंड देणारा ‘झूल’ कादंबरीतील नायक चांगदेव पाटील, चांगदेवाचा सहप्रवासी- नामदेव भोळे, ‘कोसला’चा नायक पांडुरंग सांगवीकर, हे सारे आपल्यातलेच वाटत असल्याने आपल्याच आयुष्याचे प्रतिबिंब असल्याने त्यांच्या ‘कोसला’, ‘बिढार’, ‘जरिला’ ते ‘हिंदू’पर्यंतच्या या साऱ्याच कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या.

नेमाडे जसे समर्थ कादंबरीकार आहेत तसेच ते समर्थ, परखड समीक्षकही आहेत. अनेक दिग्गज लेखकांवर टीकास्र सोडले.  मराठीतील अनेक लेखकांच्या ननैतिक वाङ्मयीन व्यवहारावर त्यांनी ‘हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का?’ या समीक्षालेखात टीका केली आहे. त्यांच्या मते मराठीत समीक्षाही नाही आणि सौंदर्यशास्त्रही नाही. मराठीतील लघुकथा हा केवळ वर्तमानपत्रांचे आणि मासिकांचे रकाने भरणारा एक क्षुद्र वाङ्मय प्रकार आहे.  पुढे ते म्हणतात, ‘साहित्यसंमेलने कधी बंद होतात, त्याची मी वाट पाहतो आहे. जिथे लेखक आणि वाचकांचा कोणताही डायलॉग होत नाही अशी संमेलने हवीतच कशाला? ज्ञानपीठ मिळाल्याबद्दल साहित्य संमेलनात माझा सत्कार आयोजित केला तरी तो स्वीकारणार नाही आणि संमेलनाला तर कधीच जाणार नाही.’ ‘टीकास्वयंवर’, ‘साहित्याची भाषा’ या दोन्ही समीक्षाग्रंथाच्या लेखनात त्यांनी भाषेचे स्वरूप, लेखकाचा पेशा, साहित्यातील सांस्कृतिक देशीयता, नवनैतिकवाद या संकल्पनांचे  परखड विवेचन केले आहे. ‘तुकाराम’ या साहित्य अकादमीसाठी लिहिलेल्या पुस्तकात नेमाडे यांनी आधुनिकतेची परंपरेशी सांगड घातलेली आहे. तुकारामांनी ऐहिक, पारलौकिक सीमारेषा पुसून कालातीत जीवन व्यतित केले हे तुकारामांच्या कार्यकर्तृत्वाचे थोरपण त्यांनी उलगडून दाखवले आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 2:58 am

Web Title: international system of units
Next Stories
1 ज्यूलचे प्रयोग
2 उष्णतेचे स्वरूप
3 डेसिबल
Just Now!
X