अठराव्या शतकाच्या अखेपर्यंत, डोळ्यांना दिसणाऱ्या जांभळा ते तांबडा या सप्तरंगांपलीकडेही प्रकाश अस्तित्वात असल्याची पुसटशी कल्पनाही नव्हती. याच अठराव्या शतकाच्या अखेरच्या काळात इंग्लिश संशोधक विल्यम हर्शेल हा सूर्याची निरीक्षणे करत होता. ही निरीक्षणे करताना डोळ्यांच्या संरक्षणासाठी तो वेगवेगळ्या गडद रंगांच्या काचा (फिल्टर) वापरत असे. या काचा वापरताना त्याच्या लक्षात आले, की काही रंगांच्या काचांतून प्रकाश कमी प्रमाणात पार होत असला, तरी निरीक्षण करताना डोळ्यांना सूर्याची उष्णता त्यातून अधिक प्रमाणात जाणवते. हर्शेलने प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वेगवेगळ्या रंगांची वस्तू तापवण्याची क्षमता तपासण्याचे ठरवले. यासाठी त्याने साधे परंतु अत्यंत काळजीपूर्वक काही प्रयोग केले. या प्रयोगांत त्याने खोलीच्या खिडकीजवळ एक लोलक बसवला. या लोलकातून सूर्यप्रकाश जाऊ  दिला व त्याचा सप्तरंगी वर्णपट मिळवला. प्रत्येक रंगाच्या प्रकाशाशी तापमापक ठेवून क्रमाक्रमाने त्याने तिथले तापमान मोजले. त्यानंतर खोलीतील सर्वसाधारण तापमानाच्या तुलनेत प्रत्येक रंगाच्या प्रकाशातील तापमान किती वाढले आहे याची तुलना केली.

हर्शलला या प्रयोगात, जांभळ्या रंगाच्या बाबतीतली तापमानाची वाढ ढोबळ मानाने एक अंश सेल्सियस, हिरव्या रंगाच्या बाबतीत पावणेदोन अंश सेल्सियस, तर तांबडय़ा रंगाच्या बाबतीत पावणेचार अंश सेल्सियस असल्याची आढळले. तापमानाचा हा क्रम पाहता, तांबडय़ा रंगाच्या पलीकडे एखादा उष्णता निर्माण करणारा ‘अदृश्य प्रकाश’ असल्याची शक्यता दिसून येत होती. इतर रंगांच्या प्रकाश किरणांप्रमाणेच या अदृश्य प्रकाश किरणांचेही लोलकाद्वारे अपवर्तन (रिफॅ्रक्शन) झाले असल्याची शक्यताही हर्शेलला वाटली. यानंतरच्या आपल्या प्रयोगांत हर्शेलने वर्णपटाच्या दोन्ही बाजूंच्या पलीकडे तापमापक ठेवून तेथील तापमान वाढींची नोंद केली. जांभळ्या रंगापलीकडे ठेवलेल्या तापमापकाने फक्त पाव अंश सेल्सियसची वाढ नोंदवली. परंतु तांबडय़ा रंगापलीकडील तापमानातील वाढ तब्बल पाच अंश सेल्सियस इतकी होती. या प्रयोगाद्वारे प्रथमच दृश्य वर्णपटाच्या पलीकडील किरणांचे अस्तित्व सिद्ध केले गेले. दृश्य किरणांप्रमाणेच परावर्तन किंवा अपवर्तनासारखे गुणधर्म असणाऱ्या या अदृश्य किरणांना, कालांतराने ‘इन्फ्रारेड’ किरण म्हणजेच अवरक्त किरण असे नाव दिले गेले. हर्शेलच्या या सर्व प्रयोगांचे निष्कर्ष लंडनच्या रॉयल सोसायटीच्या ‘फिलॉसॉफिकल ट्रान्झ्ॉक्शन्स’ या शोधपत्रिकेत दिनांक १ जानेवारी १८०० रोजी प्रसिद्ध झाले.

– डॉ. वर्षां चिटणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org