News Flash

कुतूहल – आयोडीनयुक्त मीठ

घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर मोठय़ा अक्षरांत ‘आयोडीनयुक्त मीठ’, असे लिहिलेले दिसेल. मिठात आयोडीइन का मिसळतात? हा प्रश्न नेहमी पडतो.

| August 18, 2014 01:42 am

घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर मोठय़ा अक्षरांत ‘आयोडीनयुक्त मीठ’, असे लिहिलेले दिसेल. मिठात आयोडीइन का मिसळतात?  हा प्रश्न नेहमी पडतो. आयोडीन खूप अल्प प्रमाणात जरी शरीरास आवश्यक असते, परंतु तरी आयोडीन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉइड ग्रंथीमध्ये या आयोडीनपासून थायरॉक्सीन नावाचा अंत:स्राव तयार केला जातो. या स्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते, त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भातील अर्भके व लहान मुलांच्या वाढीवर, बुद्धिमत्तेवर याचा विपरीत परिणाम होतो व ती मतिमंद वा मुकबधिर होतात. मोठय़ा माणसांत लठ्ठपणा येतो. हालचाली मंदावतात, बौद्धिक क्षमता कमी होते, वाढ खुंटते. स्रियांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढते. आयोडीन मुख्यत: समुद्री मासे, मीठ व कॉर्ड माशाच्या यकृताचे तेल इत्यादींपासून मिळते. कमी प्रमाणात दूध, मांस, पालेभाज्या व तृणधान्यातही ते काही प्रमाणात सापडते. पिण्याच्या पाण्यातही थोडय़ा प्रमाणात आयोडीन सापडते. जमिनीमध्ये आयोडीनचे प्रमाण जेथे कमी असेल त्या भौगोलिक प्रदेशात आयोडीनच्या कमतरतेमुळे लोकांना मोठय़ा प्रमाणात या व्याधीला बळी पडावे लागते.
त्यामुळे आयोडीनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ वा खाद्य तेल यांचा वापर करता येतो. गरीब, श्रीमंत असे सर्वच लोक जेवणात मिठाचा समावेश करत असल्याने मिठात आयोडीन मिसळल्याने सर्व देशातील या समस्येचा नायनाट करता येईल. त्यामुळे १ किलो मिठात १५ ते ३० मि. ग्रॅ. या प्रमाणात  आयोडीन मिसळणे योग्य ठरते.  
मिठात आयोडीन टाकण्यासाठी चार असेंद्रिय पदार्थाचा वापर केला जातो. यात पोटॅशिअम आयोडेट, पोटॅशिअम आयोडाइट, सोडिअम आयोडेट व सोडिअम आयोडाइड यांचा समावेश होतो. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही मिठात आयोडीन मिसळल्याचा फायदा होतो. ज्या मिठाच्या आयोडायझेशनसाठी आयोडाइड वापरले आहे, ते जास्त काळ हवेच्या संपर्कात आले तर त्यातील आयोडीनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे घरात मीठ वापरताना ते झाकून ठेवणे चांगले.
डॉ. जगन्नाथ दीक्षित, (औरंगाबाद) मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,चुनाभट्टी,मुंबई २२ office@mavipamumbai.org

प्रबोधन पर्व – नरहर कुरुंदकर – सव्यसाची विचारवंत
नरहर कुरुंदकर (१९३२ ते १९८२) अध्यापन, साहित्य समीक्षा, सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान, चित्रपट-नाटक-संगीत आदी कला, समाजवादी चळवळ, राष्ट्र सेवा दल अशा विविध विषयांशी निगडित असलेले आणि त्याविषयी अधिकारवाणीने बोलणारे आधुनिक महाराष्ट्रातले नाव म्हणजे नरहर कुरुंदकर. कुरुंदकरांच्या प्रतिभेची चुणूक तशी अल्पकाळातच जाणवू लागली आणि तिला उजागर करणाऱ्या संधीही मिळाल्या. वयाच्या पंधराव्या वर्षी कम्युनिस्ट असल्याच्या आरोपावरून स्वातंत्र्याची पहाट जवळ आलेली असताना कुरुंदकर यांना तुरुंगात जावे लागले. वयाच्या तेविसाव्या वर्षी सौंदर्यशास्त्र या विषयावर व्याख्यानासाठी कुरुंदकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाने बोलावले होते. एकही पुस्तक नावावर नसताना वयाच्या बत्तिसाव्या वर्षी कुरुंदकर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. कुरुंदकर यांना इंटर पास व्हायला वयाची तिशी गाठावी लागली असली तरी त्यांनी पुढे शिक्षक, प्राध्यापक आणि प्राचार्य या अध्यापनाशी निगडित क्षेत्रात अतिशय तन्मयतेने काम केले.
आदर्श शिक्षक -प्राध्यापक-प्राचार्य असा त्यांचा केवळ मराठवाडय़ातच उल्लेख केला जातो असे नाही तो महाराष्ट्रभर केला जातो. त्यांच्याविषयी राम शेवाळकर म्हणतात – ‘‘नरहर कुरुंदकर यांनी आपल्या बुद्धिमत्तेने, व्यासंगाने, मूलगामी चिंतनाने व आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादनाने अवघ्या मराठवाडय़ाचे वैचारिक, वाङ्मयीन व सांस्कृतिक नेतृत्व आपल्याकडे घेतले. मराठवाडय़ातील राजकीय कार्यकत्रे एवढेच नव्हे तर राज्यकत्रेसुद्धा कुरुंदकरांच्या या वाढत्या प्रभावाची दखल घेऊ लागले. उर्वरित महाराष्ट्रालाही मराठवाडय़ातील विवेकाचा प्रवक्ता म्हणून कुरुंदकरांना मान्यता द्यावी लागली.’’ कुरुंदकर यांनी केवळ मराठवाडय़ातीलच राजकारण-समाजकारण ढवळून काढले नाही तर महाराष्ट्राचेही लोकशिक्षण केले. विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेले कुरुंदकर तितकेच प्रभावी वक्तेही होते. लेखक आणि वक्ता ही दोनच कुरुंदकर यांची खरी रूपे. कुरुंदकर यांनी महाराष्ट्राला नवा विचार दिला नाही, पण विचार कसा करावा हे मात्र शिकवले.

मनमोराचा पिसारा – पावती मत फाडो
प्रत्येक काळातल्या तरुणाईची स्वतंत्र भाषा असते. उदा. ती बोलीभाषा असते, त्या भाषेचे स्वतंत्र वाक्प्रचार आणि विशेषणं असतात. कधी जुन्या परिचित शब्दांना वेगळा अर्थ दिलेला असतो. कट्टय़ावरच्या गप्पांत त्या शब्दाचा कोणी वापर केला तर हास्याची कारंजी फुटतात. नवख्याला सर्वसामान्य शब्दांवर इतकं हसू का फुटावं? याचा संभ्रम पडतो. पुढे तो त्या कटात सामील झाला, की त्यालाही हास्याचे फवारे फुटतात.
पुणेरी शब्दांचा शब्दकोश व्हॉट्स अ‍ॅपवर सदैव इकडून तिकडे फिरत असतो. या स्वतंत्र शब्दांना भाषेचं वावडं नसतं. म्हणजे हा इंग्रजी, हिंदी म्हणून परका असली भानगड नसते. भाषा मस्तपैकी सजीव राहते आणि हृदयाची धडधड व्यक्त करते ती अशा प्रकारे.
आता मानसशास्त्र म्हटलं, की ते ज्यात त्यात आपलं मनरूपी नाक खुपसणार, त्याला नाइलाज आहे. यातल्या काही शब्दप्रयोगांची भुरळ पडते. आपण आता सर्वसामान्यपणे ते शब्दप्रयोग करतो त्यामागची मानसिकता समजून घ्यायलाही मजा येते. आता उदाहरणार्थ (हा उत्तर ५० च्या दशकातला नेमाडपंथीय ‘कोसले’ला शब्द) माझ्या नावानं पावती फाडू नको किंवा मेरे नाम पे पावती मत फाडो अथवा बिल मत फाडो.
या शब्दप्रयोगातली मानसिकता किंवा अ‍ॅटिटय़ूड बिनधास्त आहे. तू करायचं नि मी भरायचं? तुझ्या चुकांची जबाबदारी मी स्वीकारणार नाही. तूच केलंयस, तूच निस्तर. तुझ्याबरोबर असलो तरी ‘तसल्या’ कामात/ भानगडीत माझी भागीदारी नाही. उगीचच्या उगीच मला तुझ्या ‘लफडय़ात’ गुंतवू नकोस.
मस्तपैकी सडेतोड बाणा आहे. त्या दोघांची किंवा त्यांची दोस्ती आहे, याराना आहे, पण जबाबदारीच्या सीमारेषा किंवा मर्यादा आखलेल्या आहेत.
कटिंग चाय प्यायली किंवा अर्धा वडापाव खाल्ला (किंवा आणखी काही इथे न सांगता येण्यासारखी मस्ती केली) तरी हिसाब किताब एकदम किलिअर. तेरा आधा, मेरा आधा अशा मैत्रीतच चारचौघात बिनधास्तपणे सब के सामने, मित्राला सांगता येतं, मेरे नाम पे पावती मत फाड, तेरा तू देख ले. असं ऐकून मित्र खजील वगैरे होत नाही किंवा आपसे ये उम्मीद नहीं थी असलंही काही बोलत नाही. तोही तितक्याच बिनधास्तपणे xxx पैले क्यों नही बोला.. असं तिथल्या तिथे विचारतो. ‘तेरे को क्या है, होऊ दे खर्च’ किंवा ‘पैशाला नाही तोटा, भाऊ आहे मोठा’. असं म्हणतो.. पुन्हा हास्याची मशीनगन धडधडते.
मामला खत्तम.. कोणाला इथे तरुण व्हायचंय, यारों की यारी, दोस्तों की दोस्ती जाणून घ्यायचीय, तर कोपऱ्यावरच्या चायवाल्याकडे जाऊन मित्रांबरोबर गप्पा मारताना एकदा बोलून बघा.. आता तुमच्या मित्राला यातली गंमत कळली नाही तर उगीच xx ला मनमोर के नामपर पावती मत फाडो.
हां. पैलेच बोल के रखता है.. हां! कृपया सासीडी, बरिस्ता असल्या गुळगुळीत ठिकाणी बसलात तर आधीच पावती फाडावी लागते, बादमें नय बोलने का!
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2014 1:42 am

Web Title: iodised salt
टॅग : Navneet,Navnit
Next Stories
1 सायनाइडमुळे विषबाधा
2 पिरॅमिडमध्ये मृतदेह कुजत नाही!
3 कुतूहल – नॅनो उत्प्रेरक
Just Now!
X