अणुक्रमांक ७७ आणि १९२ एएमयू एवढा अणुभार असलेल्या ‘इरिडिअम’ (Ir)चा वितळणिबदू २००० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे तर उत्कलनिबदू ४००० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक! पटकन कोणाशीही रासायनिक अभिक्रिया करण्याचा गुणधर्म नसलेलं इरिडिअम तसं दुर्मीळ आहे. लोहाच्या अडीचपट घनता असल्यामुळे, हे मूलद्रव्य पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळण्यापेक्षा पृथ्वीच्या गाभ्यात मिळण्याची शक्यता अधिक. पण तरीही काही दशकांपूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागावरही हे मूलद्रव्य ठिकठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत सापडलं. हे पृष्ठभागावर आढळलेलं इरिडिअम, पृथ्वीबाहेरून आलं असावं आणि त्याचा संबंध, साडेसहा कोटी वर्षांपूर्वी डायनासोर नष्ट होण्याला कारणीभूत झालेल्या उल्कावर्षांवाशी असावा; असाही कयास काही वैज्ञानिकांनी मांडला आहे.

अनेक वैज्ञानिक, आम्लराज म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल यांच्या मिश्रणात, प्लॅटिनम विरघळवून त्याचा अभ्यास करण्यात गुंग झाले होते. यातल्या प्रत्येकाला या विरघळवण्याच्या प्रक्रियेच्या शेवटी, काळ्या रंगाचा साका किंवा अवक्षेप मिळत होता. बऱ्याच जणांना हा अवक्षेप म्हणजे ‘ग्राफाइट’ असावं असं वाटलं.  काही फ्रेंच वैज्ञानिकांना मात्र या अवक्षेपात एखादं नवीन मूलद्रव्य दडलं असण्याची शंका आली. त्यांनी तो अवक्षेप अभ्यासायचा ठरवला. पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांना अभ्यास करण्याएवढय़ा प्रमाणात अवक्षेप मिळाला नाही.

त्याच सुमारास, म्हणजे १८०३ साली, स्मिथसन टेनंट नावाचा एक ब्रिटिश वैज्ञानिकही तेच काम करत होता आणि त्याला खूप जास्त प्रमाणात हा काळा अवक्षेप मिळाला. मग त्याने त्याचा पुढे बारकाईने अभ्यास केला. तेव्हा त्याला या अवक्षेपातून ‘इरिडिअम’ आणि ‘ऑस्मिअम’, ही दोन नवीन मूलद्रव्ये मिळाली. या मूलद्रव्याचे ‘इरिडिअम’ हे नावही त्यानेच ठेवले. ग्रीक भाषेमध्ये, ‘इरिस’ म्हणजे इंद्रधनुष्याची पंख असलेली देवता! स्मिथसनला, इरिडिअमचे इंद्रधनुष्यासारख्या वेगवेगळ्या सुंदर रंगांचे क्षार आढळले. म्हणून त्याने या मूलद्रव्याचं नाव ‘इरिस’ या देवतेच्या नावावरून ठेवलं.

इरिडिअम निसर्गत: कमी प्रमाणात आढळत असलं तरी, तांबं आणि निकेल यांच्या खाणीतून ते थोडय़ाफार प्रमाणात आढळतं. ब्राझील, अमेरिका, साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी इरिडिअमचे साठे आहेत. इरिडिअमची दोनच समस्थानिकं आहेत. इरिडिअम-१९१ आणि इरिडिअम- १९३ ! त्यातलं इरिडिअम- १९३ हे जरा जास्त प्रमणात आढळतं, पण ही दोन्ही समस्थानिकं स्थिर आहेत.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org