विडय़ाची पद्धत पार पूर्वापारपासून चालत आलेली आहे. आजही समाजात अनेक रीतीरिवाजांत विडय़ाचं स्थान अबाधित आहे.  
पानाचा विडा तयार करण्यासाठी नागवेलीचं पान वापरलं जातं. या पानावर चुना आणि काथ लावला जातो. त्यावर सुपारी ठेवून पानाची पुडी केली जाते. यात आवडीनुसार लवंग, वेलची, गुंजेची पानं, गुलकंद, तंबाखू इत्यादी पदार्थ टाकतात. पण विडय़ात नागवेलीच्या पानाबरोबर काथ, चुना आणि सुपारी हे पदार्थ मात्र हवेतच. पानात जे इतर पदार्थ टाकले जातात, तसंच पान कोणत्या प्रदेशातलं आहे, त्यावरून त्या विडय़ाला नाव दिलं जातं. उदा. मघई, बनारसी, कलकत्ता, पूना इत्यादी.
नागवेली ही वनस्पती पायपरेसी म्हणजे मिरीच्या कुलातील आहे. नागवेलीच्या पानांतील बाष्पनशील तेल उत्तेजक व कृमिनाशक आहे. बाष्पनशील तेलामुळे विडय़ाला त्याचा तिखट-तुरटपणा आणि सुवास आलेला असतो. यामुळेच विडा खाल्ल्यावर तोंडाची दरुगधी जाते. प्रदेशानुसार, जातीनुसार पानातील रसायनांचे प्रमाण कमी-अधिक असते. पानांतील बाष्पनशील तेल, शर्करा व चोथ्याचं प्रमाण यांच्या प्रमाणावरून पानाची प्रत ठरते.
पानात व्यसन लागेल असं कोणतंही रसायन नाही. पण पानाचं व्यसन लागतं ते सुपारी आणि तंबाखूमुळे. जेव्हा सुपारी कच्ची असते तेव्हा सुपारीमध्ये अल्कलॉइड्स जास्त असतात. त्यामुळे ओली ताजी सुपारी खाल्ल्याने गरगरू लागतं. सुपारी वाळत जाते तसतसे सुपारीच्या आतल्या पांढऱ्या गाभ्यात अल्कलॉइड्स जमा होत जातात. या गाभ्याप्रमाणे सुपारीची प्रतवारी ठरवली जाते. पांढरा गाभा जेवढा जास्त तेवढी सुपारीची प्रत वरची समजली जाते. प्रथमच सुपारी-चुन्यासह पान खाणाऱ्या व्यक्तीला मळमळू, गरगरू लागते. सुपारीत क्रियाशील अल्कॉइडस् उदा. अर्कोलिन, अरेकाइडाइन, गावासाइन, गावाकोसाइन असतात. त्यांच्यामुळे सौम्य नशा येते. यात चुना मिसळला की त्यांची परिणामकारकता वाढते. विशेषत: अर्कोलिन मृदू स्नायूंवर परिणाम करते. जसजसं चावत जावं, तसतसं पानातून बाहेर पडणाऱ्या बाष्पनशील तेलामुळे व निर्माण होणाऱ्या रसायनांमुळे उत्साही वाटू लागतं. सततच्या खाण्यामुळे त्याची सवय लागते. नागवेलीच्या पानामुळे नव्हे तर तंबाखू आणि सुपारीच्या सततच्या खाण्यामुळे गालाचा-जिभेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
चारुशीला जुईकर (मुंबई)-office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा-  मौज ही वाटे भारी..
आता विश्वास बसणार नाही पण एक काळ असा होता! खरंच ‘होता’. कोणाला पटणार नाही, पण ‘पडू आजारी.. मौज हीच वाटे भारी’ यातला शब्दन्शब्द कोणीतरी कधीतरी जगलं!!
आपल्या मित्रांपैकी वयोवृद्ध वाचकांनी ही कविता बालपणी शाळेतल्या पाठय़पुस्तकात वाचली असेल, एखाद्या गुरुजींनी हे गाणं पाठही करून घेतलं असेल.. खरं पाहता, त्या काळी आजारपण म्हणजे ‘कळवण्यास अत्यंत दुख होते की बालके .. याचे अल्पशा..’  कारण  फ्लूसारख्या फुटकळ आजारानेही त्या बालकळय़ा कोमेजून जायच्या. त्या काळात कोण्या एका (कोणी बरं? ‘आठवणीतल्या कविता’ या पाच खंडांच्या पुस्तकात तरी आहे का तसा उल्लेख?) कविने आजारी पडण्यातल्या मौजेवर गाणं रचलं.  कवितेचे शब्द वाचले नि वाटलं हा शुद्ध निरागसपणा आहे. जगण्यातला शुद्ध पंचम.
त्या शाळकरी मुलाला खोडकर भावंडं असावी, या मुलांना घारात केरवारे करायचे नसले तरी कामंधामं करावी लागत असावीत.. घरात दारिद्रय़ असेल असं नाही, पण रोजच्या भातभाजीऐवजी पौष्टिक अन्न ही अप्रूपाची गोष्ट असावी.. मुख्य म्हणजे मिणमिणत्या डोळय़ांची, नऊवारीचे ओचे सांभाळणारी आणि पुराणातल्या गोष्टी सांगणारी आजी असावी!
हरवलाय तो निष्पापपणा, आजारपणाच्याही फायद्यांचं कौतुक वाटण्याचा काळ.. घरात एकटा राहणारा अथर्व/ सुमेध/ प्रथमेश आता मायक्रोवेव्हमध्ये सकाळच्या नूडल रीहीट करून टीव्हीवरचे चॅनल सर्फ करत असेल किंवा चॅट करत असेल.. आजी कदाचित स्काइपवर भेटत असेलही!
एकच वास्तव अजूनही बदललेलं नाहीये.. ‘नकोस जाणे मग शाळेला..’ बाकी सारं म्हणजे केवळ नॉल्टाल्जिया.
पडू आजारी..
मौज हीच वाटे भारी ॥
नकोच जाणे मग शाळेला,
काम कुणी सांगे न मजला
मऊमऊ गादी निजावयाला
चैनच हो सारी..
मौज हीच वाटे भारी
मिळेल सांजा, साबूदाणा,
खडिसाखर मनुका बेदाणा
संत्री, साखर, लिंबू आणा..
जा हो बाजारी..
मौज हीच वाटे भारी
भवती भावंडांचा मेळा,
दंगा थोडा कुणि जर केला
कावुनि मी सांगेन तयाला..
‘जा बाहेरी..’
मौज हीच वाटे भारी
कामे करतिल सारे माझी,
झटतिल ठेवाया मज राजी
बसेल सांगत गोष्टी आजी
माझे शेजारी..
मौज हीच वाटे भारी
असले आजारीपण गोड,
असून कण्हती का जन मूढ
हे मजला उकलेना गूढ
म्हणुनी विचारी..
मौज हीच वाटे भारी
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – मुखात मोठे शब्द, कृतीत शून्याकार
‘‘आपल्याकडे जुना पुरुषार्थ शब्द ज्या अर्थाने वापरीत त्याच अर्थाने श्ं’४ी२- मूल्ये हा शब्द वापरला जातो. जीवनाला ज्याने अर्थ प्राप्त होतो, मोल चढते, त्यांना आपण मूल्ये म्हणतो. ही मूल्ये जीवनात दाखल झाली तर जीवन निस्सार वाटते. जीवनाला सफलता यायला हवी असेल तर त्या शब्दाची आंतरिक अनुभूती हवी. आपण आपली मूल्ये आज तपासून पाहू या. मी नवी मूल्ये असे म्हटले. जुनी मूल्ये समाजाला उपयोगी पडणार नाहीत. मूल्यांचाही विकास होऊ शकतो. जुन्या कवींनी, संतांनी, विचारवंतांनी मांडलेल्या आदर्शापेक्षाही महान आदर्श आज निश्चितपणे उभे आहेत.. समाजधारणा ही वास्तविक सर्वमान्य वास्तू आहे. युरोपात समाजास महत्त्व की व्यक्तीस असे वाद आहेत. मी दोहोंना सत्य मानतो. समाजाने व्यक्तीचा बळी देऊ नये. व्यक्तीनेही समाज विध्वंसू नये. व्यक्ती आणि समाज – दोघांना मूल्य एकच असले पाहिजे. व्यक्ती मरते. समाज त्या मानाने चिरंजीवी असतो. व्यक्तीची यशस्वी साधना त्या समाजात चालू राहते. मानवी हृदयात अज्ञात शक्तीची प्रतििबबे पडत असतात. ती जीवनातून प्रकट होतात. मानवी कृतीतून ती संशोधली जातात. पुढील पिढीला त्यांचा वारसा मिळतो. मानव जातीला व्यक्तीच्या साधनेचा वारसा मिळतो आणि व्यक्तीही त्या वारशात भर घालते.’’
आचार्य स. ज. भागवत पुढे विचार आणि आचार यात नेमके कुठे अंतर पडून विसंगती कशी निर्माण होते त्याविषयी म्हणतात- सर्व भुतांशी एकरूप होणे दूर राहो. आपण मानवांशी तरी एकरूप झालो का? आपण जळीस्थळी, काष्ठीपाषाणी देव पाहावा, असे तोंडाने म्हटले, परंतु प्रत्यक्षात शेजारधर्मही पाळला नाही. मुखात मोठे शब्द, कृतीत शून्याकार. बुद्धीला न पेलणारी वाक्ये उच्चारायची आणि भिकारडय़ाप्रमाणे वागायचे.. विवेकी मनुष्य जे निश्चित आहे त्यावर जीवन उभारतो. दुसऱ्याच्या सांगण्यावर न उभारता आत्मसाक्षात्कारावर उभारतो.’’