रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशके इत्यादी रसायनांचा शेतीत अर्निबध वापर होत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडून त्या नापीक होत आहेत. भूजलही दूषित होत आहे. युरिया खतातील नाइट्रेटचे अंश भूजलातून पेयजलात पोहोचतात. नाइट्रेटमुळे मानवी रक्ताची प्राणवायूची वहनक्षमता घटते. हृदयविकाराचे हेसुद्धा एक कारण आहे.
प्रत्येक पिकाचा एक विशिष्ट हंगाम असतो. इतर हंगामात ती पिकविल्यास रोग आणि किडींचा प्रभाव वाढतो. त्यामुळे कीटकनाशकांचा वापरही वाढतो. म्हणजे, बिगरहंगामी पिके घेणे व त्यांचे सेवन करणे आरोग्यदृष्टय़ा अपायकारकच. केळी, आंबा आणि इतर फळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर सर्वत्र आणि सर्रास होत आहे. अर्धी-कच्ची, अपक्व फळे कृत्रिमरीत्या पिकवून बाजारात आणली जातात. यामुळे केळीसारख्या सर्वाना सहज उपलब्ध असणाऱ्या फळाबाबतही आरोग्याच्या दृष्टीने शंका वाटत आहे. आंब्याची कथाही काही वेगळी नाही.
गूळ देखणा दिसावा म्हणून घातक रसायने वापरली जातात. ती न वापरता गूळ केल्यास तो काळपट, लालसर असेल, चमकदार नसेल. असा गूळ ग्राहक पसंत करणार नाहीत, ही उत्पादकाची समजूत असते. ग्राहकांना यातले काहीच माहीत नसते. अमेरिकेत बंदी असलेले (कर्करोगकारक) भेंडीपावडर नावाने शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले रसायन आता वापरात आलेय. धान्य साठविताना गोदामांमध्ये कीटकनाशकांचा वापर केला जातो. योग्य ती काळजी न घेतल्यास तेथेही प्रदूषण संभवते.
कर्करोग, हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात हे आजार ग्रामीण भागात श्रमजीवींमध्येसुद्धा वाढत आहेत. हे आजार जंतुसंसर्गाचे नव्हे, तर आपल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आहेत. निरोगी जीवनासाठी पर्यावरणस्नेही शेती आणि जीवनशैलीच माणसाला तारेल. आरोग्यदायी सेंद्रिय शेती त्यासाठीचे एक पाऊल आहे. मात्र आज त्याही क्षेत्राचे बाजारीकरण व्हायला लागले आहे, ही चिंतेची बाब आहे. सेंद्रिय शेतीची लोकचळवळ करण्यास शहरी ग्राहकांनी हातभार लावावा. शेतकरी कुटुंबांच्या थेट संपर्कात ते यावेत. शेतकऱ्यांचे ते मित्र बनावेत. भरमसाट नफा आकारणारी मधली कडी बाद व्हावी. शहरी जागृत ग्राहकांनी याकामी पुढाकार घेतल्यास चित्र नक्कीच बदलेल.

जे देखे रवी..   – राजे एडवर्ड रुग्णालय
माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे संक्रमण १९६५ साली झाले. KEM रुग्णालयात MS  पास झालेल्यांसाठी तीन महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे निर्माण करण्यात आली होती. त्यातल्या एकावर माझी वर्णी लागली आणि माझ्या आयुष्यातल्या एका अतिमहत्त्वाच्या पर्वाला सुरुवात झाली. त्याकाळचे  KEM  मधले वातावरण बघून मी दिपून गेलो. इतके हुशार विद्यार्थी आणि सहकारी मी क्वचितच पाहिले होते. सगळ्यात विलक्षण होती सर्व स्तरांतल्या विद्यार्थ्यांमधली शिकण्याची जबरदस्त इच्छा आणि शिक्षकांची शिकवण्याची जबाबदारी घेण्याची वृत्ती. कोणी काहीतरी शिकवतो आहे असे कळले तर विद्यार्थ्यांचा थवा जमत असे. त्या काळात मुंबईतले सर्वात हुशार विद्यार्थी ङएट मध्ये प्रवेश घेत असत आणि तिथल्या प्राध्यापकांचा व्यावसायिक स्तर अत्युच्च होता. स्त्री-रोगतज्ज्ञ पुरंदरे, हृदयरोगतज्ज्ञ दाते, अस्थिव्यंग विभागातले तळवळकर आणि धोलकिया. हृदयावर शस्त्रक्रिया करणारे सेन, सर्वसाधारण वैद्यकीय शास्त्राचे राघवन आणि क्ष-किरण तज्ज्ञ आठले (माझे सासरे) म्हणजे त्यांच्या विषयातले आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेले दिग्गज होते. माझे टिळक रुग्णालयातले गुरू डॉ. डायस, सेन यांचे विद्यार्थी तेव्हा मीही त्या परंपरेतला असे वाटून हायसे झाले, परंतु ज्याला इंग्रजीत down sizing  म्हणतात तसे माझे झाले. टिळक रुग्णालयाच्या छोटय़ा तलावातला मी एक छोटासा मासा आहे हे त्या वेळेला जाणवले आणि सुदैवाने मला न्यूनगंडाने घेरले नाही. मुंबईत मी आलो तेव्हा बावचळलो होतो, परंतु सावरलो. तसेच इथे घडले. मोठय़ा लोकांना त्या काळात मी जवळून पाहिले. त्यांच्या कर्मकर्तृत्वाची ओळख झाली, त्या वेळचे माझे अनेक समकालीन पुढे खूप मोठे होणार होते, त्यांच्या ओळखी झाल्या आणि काहींशी मैत्री झाली. ती पुढे खूप उपयोगी पडली. मी बुजून बिळात शिरून वागलो असतो तर हा लोकसंग्रह झाला नसता. ज्ञानेश्वरांची प्रांजळपणाबद्दल ओवी आहे, त्यात ते म्हणतात, ‘एखादे मूल जसे आपल्या आईला मोकळ्या मनाने बिलगते तसे या जगाशी वागावे.’  मी त्या वेळेला ज्ञानेश्वरी वाचली नव्हती, परंतु त्याच भावनेने मी या नव्या संस्थेला बिलगलो. शेवटी वर उल्लेख केलेल्या बाळाचे वागणे जैविक स्वार्थावरही अवलंबून असते. इथे काहीतरी विलक्षण आहे, याच्यातले काहीतरी आत्मसात करायला हवे या विचाराने मी मंत्रमुग्ध झालो होतो. इथेच मी खऱ्या अर्थाने पहिल्यांदा प्लास्टिक सर्जरी बघितली आणि आपणही हे असले काहीतरी करायचे याची खूणगाठ बांधली. तो विषय मला अनेक मानमरातब मिळवून देणार आह, हे त्या वेळी स्वप्नातही नव्हते.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  – फुप्फुसाचे विकार : पथ्यापथ्य
फुप्फुसाच्या विकारात एकदा ‘फा फू’ सुरू झाली, धाप लागू लागली, जिने चढउतार बंद झाले, नोकरी व्यवसायावर दांडी मारायला लागली की रुग्णाचे व घरातल्यांचे धाबे धणाणतात. ईसीजी, लिपीड प्रोफाईल अ‍ॅन्जीओग्राफी, एमआरआय तपासण्यांनी फाईल भरते. अ‍ॅन्जीओप्लास्टीचा सल्ला दिला जातो. ‘लाखांचा’ चुराडा होतो. पण रुग्ण व घरची मंडळी साध्यासोप्या पथ्यापथ्याकडे लक्ष देत नाहीत अशी शहरातच नव्हे, खेडोपाडीही वाढती समस्या आहे. बऱ्याच वेळा केवळ पथ्यावर राहून औषधे टाळता येतात, असे अनेकानेक रुग्णांचे अनुभव आहेत. पथ्य पाळले नाही तर कितीही महागडी औषधे घेऊनही रुग्णांचे काडीमात्र कल्याण होत नाही. पुढील प्रमाणे पथ्य पाळा, रोग वाढणार नाही, नियंत्रणात येईल असा थोर शास्त्रकारांचा सांगावा आहे.
पथ्यापथ्य – वेळेवर, पुरेसा आहार, जेवण सावकाश चावून खावे. पुरेशी वेळेवर विश्रांती घ्यावी. फुफ्फुसांची ताकद वाढविण्याकरिता किमान व्यायाम करावा. अकारण बोलणे, जागरण, वातानुकूलित जागेत दीर्घकाळ बसणे. गर्दी, धूळ टाळावी. उशिरा जेवण, शिळे अन्न, फ्रिजमधील पदार्थ, कफवर्धक थंड आहार, मेवामिठाई, आईस्क्रिम थंड दूध कटाक्षाने टाळावे. आहार समतोल असावा. पुदीना, आले, लसूण, ओली हळद अशी चटणी, तुळशीची दहा पाने, दोन मिरी असे मिश्रण काही काळ घ्यावे, दूध, तूप, आवळा, अमसूल, जिरे, गहू, हातसडीचा तांदूळ, चवळी, राजमा असा सर्वरसात्मक आहार असावा. किमान ६ सूर्यनमस्कार सुरू करावे. रोज एक वाढवावा. १५ दिवसांत १२ नमस्कारापर्यंत वाढवावे. सकाळी दीर्घश्वसन, प्राणायाम, भस्त्रिका यांचा कटाक्षाने अभ्यास करावा. बोलण्याचा व्यवसाय असणाऱ्यांनी खालच्या पट्टीत बोलावे. वजन उचलायचीच गरज असल्यास दोन्ही हातांनी तारतम्याने वजन उचलावे. अतिरेकीपणा महागात पडतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी पोहण्याचा ‘ब्रेस्ट स्ट्रोक’ किमान दहा मिनिटे व्यायाम करावा. व्यायामानंतर काही काळ उशीशिवाय ‘शवासन’ करावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १९ एप्रिल
१९२५ > इतिहास संशोधक प्रा. अनंत रामचंद्र कुळकर्णी यांचा जन्म. लंडन विद्यापीठात ते रीसर्च स्कॉलर म्हणून गेले असता तेथील मराठी कागदपत्रांचा अभ्यास करून त्यांनी शिवकालीन महाराष्टािवर ‘महाराष्ट्र इन द एज ऑफ शिवाजी’ हा प्रबंध इंग्रजीत लिहिला. पुढे शिवाजी विद्यापीठाने त्यांचा अनुवाद ‘शिवकालीन महाराष्ट्र’ नावाने प्रकाशित केला. त्यांच्या इतिहासविषयक लेखनापैकी ‘आंतरराष्ट्रीय संस्था’ व ‘जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ यांचे चरित्र’ तसेच या डफने लिहिलेल्या मराठेशाहीच्या इतिहासाचा मराठी अनुवाद प्रकाशित  झाले. ‘भारतीय संस्कृतीदर्शन’ आणि ‘इंग्लंडच्या राज्यघटनेचा इतिहास’ या पुस्तकांचे सहसंपादन त्यांनी केले होते.
१९६६ > योगविषयक पुस्तके लिहिणारे लेखक, कवी आणि ‘कैवल्यधाम’ योग संस्थेचे संस्थापक, योगगुरू जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचे निधन. ‘योगमीमांसा’ हे मराठी मासिक त्यांनी १९२४ मध्ये सुरू केले. योगासनांवर इंग्रजीत पुस्तक लिहून (१९३१) योगविद्येला अद्भुताच्या वलयाऐवजी वैज्ञानिक बैठक दिली. ‘सुदामदेवचरित्र’, कुवलयानंदांची गाणी ही त्यांची मराठी पुस्तके, तर ‘प्राणायाम’ इंग्रजी.  याज्ञवल्क्यस्मृतीचे संपादनही (१९२९) त्यांनी केले.