दक्षिण अमेरिकेतील व्हेनिझुएलाच्या इशान्येला दीडशे कि.मी.वर आणि त्रिनिदाद बेटाच्या वायव्येला कॅरिबियन समुद्रातले ग्रेनाडा हे बेट समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तयार झाले आहे. १६५४ साली या बेटावर फ्रेंचांनी त्यांची वसाहत स्थापन करून मोठय़ा प्रमाणात ऊसाची लागवड केली, ऊसमळ्यांवर मजुरी करण्यासाठी हजारोंनी आफ्रिकन गुलाम त्यांनी येथे आणले.

फ्रेंचांची ही वसाहत घेण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला परंतु पुढे ग्रेट ब्रिटन आणि प्रशियाच्या फ्रान्स आणि स्पेनबरोबर झालेल्या युद्धानंतर त्यांच्यात १७६३ मध्ये पॅरिस येथे तह करण्यात आला. या तहान्वये फ्रान्सने त्यांची ग्रेनाडाची वसाहत ब्रिटिशांना दिली. ब्रिटिशांनी तिथे ऊसमळे आणि साखर उत्पादन वाढविले आणि त्याबरोबरच आफ्रिकन गुलाम ग्रेनाडामध्ये आणण्याचे प्रमाणही वाढले. ब्रिटिश साम्राज्यात १८३४ साली गुलामगिरीची प्रथा कायद्याने बंद झाली. मुक्त गुलामांपैकी बहुतेकांनी मळ्यांवर काम करण्यास नकार दिल्यामुळे ब्रिटिश वसाहतवाल्यांनी ब्रिटिश भारतातून करारावर मजुरीसाठी भारतीय लोकांना आणणे सुरू केले. १८५७ नंतर अशा भारतीय मजुरांची ग्रेनाडातील आयात बरीच वाढली. १८४३ साली पूर्वेकडून आलेले एक व्यापारी मालवाहू जहाज ग्रेनाडाच्या सेंट जॉर्जेसच्या बंदरात थांबले. पुढे इंग्लंडकडे जाणारे हे जहाज ग्रेनाडात काही माल उतरविण्यासाठी थांबले. या जहाजातल्या मालाबरोबर काही जायफळाच्या झाडाची रोपे आणि फांद्या चुकून ग्रेनाडाच्या बंदरात उतरविल्या गेल्या. एका ब्रिटिश मळेवाल्याने ती रोपे शेतात लावून वाढविली. त्यातून उत्तम दर्जाची जायफळे मिळाल्यावर त्या शेतकऱ्याने जायफळाच्या पिकावर लक्ष केंद्रित केले. ब्रिटिश वसाहत सरकारने मग जायफळाच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. सध्या जगातील एकूण जायफळ उत्पादनापैकी ४० टक्के उत्पादन ग्रेनाडा करते! ब्रिटिश मळेवाल्यांनी त्या जोडीला कापूस आणि कोकोचीही लागवड सुरू  केली. समृद्धी आल्यामुळे ग्रेनाडा ही ब्रिटिश साम्राज्याची महत्त्वाची वसाहत म्हणजे ‘क्राऊन कॉलनी’ बनली आणि त्यापाठोपाठ  आफ्रिकन व आशियाई सामान्यांत राजकीय जागृती निर्माण होऊन त्यांचे राजकीय नेते ब्रिटिश वसाहत सरकार विरोधी वातावरणनिर्मिती करू लागले.

सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com