म्यानमार, लायबेरिया, आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे जगातले तीनच देश फक्त इम्पिरियल मापनपद्धत वापरतात. इम्पिरियल मापनपद्धतीत फूट, पाऊंड, गॅलन, ही एककं वापरली जातात, तर मेट्रिक पद्धतीत मीटर, किलोग्राम, लिटर, यांचा वापर होतो. पण या दोन्ही पद्धती एकाच वेळी वापरल्या तर मात्र भयंकर अनर्थ होऊ शकतात.

१९९९ मध्ये मंगळावर सोडलेलं ‘मार्स ऑर्बटिर’ हे यान त्याचं काम सुरू होण्याअगोदरच मंगळाच्या वातावरणात जाळून खाक झालं! सव्वाशे दशलक्ष डॉलर्स खर्चून आखलेली ही मोहीम वाया जाण्यामागचं कारण होतं, एककांतला घोळ! एक सॉफ्टवेअर बल मोजण्यासाठी ‘पाऊंड’ हे इम्पिरियल एकक वापरत होतं, तर दुसरं सॉफ्टवेअर ‘न्यूटन’ हे मेट्रिक एकक वापरत होतं!

असंच उदाहरण आहे कॅनडामधलं. २३ जुलै १९८३. एडमंटनकडे निघलेल्या एअर कॅनडाच्या फ्लाइटची इंधनटाकी अर्ध्या वाटेवरच पूर्ण रिकामी झाली. इंधनमापकही दुर्दैवाने बंद पडलं होतं. इंधन संपल्यामुळं विमान पुढं जाणंही अशक्य आणि विमानातली इतर यंत्रणाही ठप्प! तेव्हा वैमानिकांनी कसंबसं ग्लाइड करून हे विमान जिमली या आर्मी बेसवर उतरवलं.

पुढे चौकशीत निष्पन्न झालं की मॉन्ट्रियलला इंधन भरून घेताना वैमानिकांना हवं होतं २२,३०० किलो, तर विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांनी भरून दिलं होतं २२,३०० पाऊंड! म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी, कारण एक पाऊंड म्हणजे फक्त ४५४ ग्रॅम.  मग विमान अर्ध्या वाटेत बंद नाही पडणार तर काय होणार?

अलीकडे २००४ मध्ये टोकियोच्या डिस्नेलॅण्डमधली गोष्ट. एका रोलरकोस्टरची एक फेरी संपता संपता त्याचा अ‍ॅक्सल अचानक तुटला. डिस्लेलॅण्ड तर सुरक्षेसाठी नेहमी अतिशय जागरूक असतं. तरी असं का झालं? शोधाशोध केल्यावर कळलं की, २००२ मध्ये नवे अ‍ॅक्सल मागवताना जुन्या नोंदींतली इम्पिरियल मोजमापं मेट्रिकमध्ये रूपांतरित करून घेतली होती. पण रोलरकोस्टरचे बाकीचे भाग मात्र मुळातच मेट्रिक मापांचे होते. या तफावतीमुळे अ‍ॅक्सलवर अतिरिक्त ताण आला होता.

सुदैवाने या मेट्रिक-इम्पिरियल घोटाळ्यांमध्ये कुठेही जीवितहानी झालेली नाही. पण पुढे असं होऊ नये; याची काळजी मात्र घ्यावी लागेल.

मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

कुर्रतुल ऐन हैदर यांची  आग का दरिया

‘आग का दरिया’ (१९५९) – ही कुर्रतुल ऐन हैदर यांची एक महत्त्वाची साहित्यकृती. साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कारविजेती ही उर्दू कादंबरी मुळात ७८४ पानांची असून १०१ प्रकरणे यात आहेत. श्रीपाद जोशी यांनी या कादंबरीचा ‘आगीचा दर्या’ हा मराठी अनुवाद नेटकेपणाने केला आहे. इंग्रजी अनुवाद स्वत: लेखिकेनेच केला असून, १४ भारतीय भाषा तसेच  फ्रेंच, रशियन भाषेतही अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.

या कादंबरीचे वेगळेपण असे की नायक, खलनायक, कथानक – असे रूढार्थाने या कादंबरीचे कथानक नाही, तर ‘काळ’ हाच या कादंबरीचा नायक आहे. ही कादंबरी म्हणजे युद्धाची निर्थकता, मानवी मनाची होरपळ, मानवी जीवनातील, दु:ख, निराशा, वैफल्य, अगतिकता – यांची अडीच हजार वर्षांच्या महाप्रवाहाची ऐतिहासिक कहाणी आहे.

‘आग का दरिया’ने इतिहासातील आणि इतरही महत्त्वपूर्ण प्रश्नांना जन्म दिला . उदा. इतिहास म्हणजे काय? त्याकडे आम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवे – त्यावर कसा विचार करावा?

महाभारतीय युद्धापासून ते स्वातंत्र्यचळवळीतील तरुणांचा सहभाग, उत्साह, राजकारण्यांचेडावपेच, फाळणी, फाळणीमुळे दुभंगलेली मनं – माणसं – या उलथापालथींचा मागोवा घेणारी ही कादंबरी आहे.

कमाल हा एक भारतीय मुसलमान. स्वातंत्र्य चळवळीतील उत्साही कार्यकर्ता. कमाल, हरिशंकर, गौतम नीलांबर दत्त, स्त्रिल, चंपा अहमद, निर्मला, लाजवंती – या साऱ्यांचा, मनांमध्ये कणभरही धर्मभेदाचा किंतु नसलेला, निखळ मैत्रीचे भावबंध असलेला एक छान ग्रुप होता; पण एका फाळणीमुळे सारं सारं बदलून गेलं. चंपा अहमद म्हणते, ‘‘मी बसंत कॉलेजात तिरंगी झेंडय़ासमोर उभं राहून ‘जन गण मन’ म्हटलं आहे. तरीपण मला तिथे नेहमी असं वाटायचं की, तिरंगी झेंडय़ाखाली मला परकं समजण्यात येतंय. मी याच देशाची रहिवासी आहे. आता स्वत:साठी दुसरा देश कुठून आणू?..’’

पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध सत्तेच्या लोभाने सुरूच राहिली. शेरखान व दिल्लीचा हुमायून बादशहा दोघेही काव्ये वाचणारे, तरी ते एकमेकांविरुद्ध सत्तेसाठी लढले. याचा अर्थ लढाया, युद्ध ही दोन धर्मामध्ये नाही तर दोन राजकीय शक्तींमध्ये होताना दिसतात, असे लेखिका सांगते.  विचारांच्या या लाटांनी, अनुत्तरित प्रश्नांच्या कल्लोळात गरगरत वाचकाचाही ‘अर्जुन’ होतो.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com