18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

मनमोराचा पिसारा.. मनातली रांगोळी

दिवाळी हा संपूर्ण सेंद्रिय सोहळा आहे. पंचेंद्रियांना स्पर्श करणाऱ्या सगळ्या सुख संवेदना त्यात सामावलेल्या

सुनीत पोतनीस-sunitpotnis@rediffmail.com | Updated: November 12, 2012 12:14 PM

दिवाळी हा संपूर्ण सेंद्रिय सोहळा आहे. पंचेंद्रियांना स्पर्श करणाऱ्या सगळ्या सुख संवेदना त्यात सामावलेल्या आहेत (अपवाद फटाक्यांचे भीषण आवाज, धूर, वास इ.). यापैकी द्रष्टा दिवाळी, खास मन लुभावन. कारण फराळ सदासर्वकाळ असतो, सुगंधी उटणं बारा महिने मिळतं, फटाके वाजवायला तर कारणं लागत नाहीत. पण आकाशकंदील, झगमगते आकाशदिवे, घराघरातल्या दिव्यांच्या खास रंगीत माळा आणि रांगोळ्या ही अगदी फक्त आणि फक्त दिवाळीसाठी.
रांगोळी म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं घेतलेला (ती चित्रकार, रचनाकार असो वा नसो) दिवाळीचा द्रष्टा अनुभव असतो. स्वहस्ते रांगोळी काढणं, त्यात रंग भरणे, त्यावर किंचित चकचकी उधळणे, केंद्रभागी पणती ठेवणे. या गोष्टी करून बालपणातली दिवाळी सजलीय. आतादेखील रांगोळ्या बघून मन हरखून जातं. दहा आडवे, दहा उभे का होईना, रांगोळीचे ठिपके जमिनीवर काढून रांगोळी काढून पाहावीच.
बालपण संपलं तरी मनातलं रांगोळीचं आकर्षण मात्र कधी ओसरलं नाही. मानवी मनामध्ये रांगोळीचं इतकं आकर्षण का असावं, असा प्रश्न बालपणी निर्माण झाला. तो विचारल्यामुळे शिक्षकांच्या हातच्या आगाऊ प्रश्न विचारल्याबद्दल चापटय़ा खाल्ल्या. तरी, ती जिज्ञासा काही ओसरली नाही. मानसशास्त्रानं हे कोडं नंतर सोडवून दिलं.
रांगोळीबद्दल आकर्षण वाटतं केवळ ती फक्त सुंदर असते, रंगीबेरंगी असते म्हणून नाही, तर रांगोळी ‘इज पर्फेक्ट सीमेट्री’. सीमेट्री म्हणजे सममिती, रूपबंधातील सगळ्या रेषा, आकार आणि एकूण आकृती यांचं परस्परांशी पर्फेक्ट नातं. त्यांचं परस्परांशी असलेलं प्रपोर्शन अचूक असतं. त्या अचूकतेबद्दल, सममितीबद्दल मनाला आकर्षण वाटतं, त्या आकारात एक प्रकारचा सुरक्षितपणा असतो. ओबडधोबड, वेडेवाकडेपणा यांमधून नकळत सूचित होणारी अव्यवस्था आपल्या असंज्ञ मनाला अस्वस्थ करते. जणू काही अशा असुंदर एसिमिट्रीकल रचनेमध्ये काही तरी गूढ, भीतिदायक असू शकतं. अशी भावना आपल्या मनातल्या नेणिवेत आपोआप निर्माण होते आणि ती नकोशी वाटते.
एकुणात सममिती, अचूकता आणि आखीव-रेखीव असण्यामध्ये समग्रता असते. काही लपवून ठेवलेलं नसतं. त्यामुळे अशा बांधीव संरचना आपल्याला आकर्षित करतात. आश्वस्त करतात. कोणी तरी विचारपूर्वक, कष्टानं काढलेल्या रांगोळ्या मनात सुरक्षितता निर्माण करतात. त्या रंगसंगतीमुळे मन आनंदित होतं, रांगोळ्या घातलेल्या पाहिल्या की, आपोआप मनात दिवाळी साजरी होते.
मित्रा, तू म्हणशील दिवाळीच्या दिवसांत ही कशाला ‘सायकॉलॉजीगिरी’ लावलीय. मनापासून सांगतो. रांगोळीचं कोडं उलगडून दाखवून मनमोरानं दिवाळी साजरी केली. आता हे जाणीव, नेणीव, संज्ञ, असंज्ञ, सममिती विसरून जा. मस्तपैकी फराळ कर. कडबोळ्यांबरोबर ताजं ताजं लोणी आणि चकलीबरोबर साईचं दही इतकं मस्त लागतं! बायकोला पाडव्याची नि बहिणीला बीजेची छानशी भेट दे. बहिणीकडून रिटर्न गिफ्ट मागून घे आणि बायकोकडून काय मागशील? ते इथे सांगता येण्यासारखं नाही. समझे ना?
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

कुतूहल : ट्रक वाहनापासून सुरक्षितता
ट्रक या एका जेनेरिक नावाखाली ट्रक, ट्रेलर, ट्रकमध्ये ठेवलेला टँकर अशा नाना गोष्टी येऊ शकतात. प्रत्येक प्रकारचा ट्रक किती टन मालाची वाहतूक सुरक्षितपणे करू शकतो हे त्याच्या निर्मात्याने (मॅन्युफॅक्चररने) ठरवून दिलेले असते. कारण ट्रक बनविण्यासाठी वापरलेले सगळे सामान (पार्ट्स) तेवढे वजन पेलण्याच्या हिशेबाने वापरलेले असते. २-३ टनी ट्रकपासून २०-२० टनापर्यंतचे वजन पेलण्याची क्षमता असलेले ट्रक्स बाजारात विकत मिळतात. ट्रकच्या क्षमतेएवढेच वजन त्यात भरणे हे गरजेचेच नव्हे तर सुरक्षित असते, पण जास्त पैसे मिळविण्याच्या हव्यासातून ट्रक मालक आणि ड्रायव्हर्स १० टनांच्या ट्रकमध्ये सर्रास १३-१४ टन माल घेऊन जातात. यामुळे ट्रकमध्ये भरलेल्या मालामुळे उंची वाढते. काही ठिकाणच्या रस्त्यांना उंचीचे बंधन असते. अशा रस्त्यांवर लोखंडी चौकटी लावलेल्या असतात. अमुक एका उंचीपेक्षा अशा चौकटीतून जास्त उंचीचे ट्रक जाऊ शकत नाहीत. तेथून अशा ट्रकना एकतर जाता येणार नाही, अथवा असे ट्रक पुरेसा अंदाज न आल्याने त्यातून गेले तर चौकटींना धक्के मारण्याची शक्यता असते.
जास्त माल भरल्याने ट्रक नादुरुस्त होण्याची शक्यता असते. घाटात, टोकदार वळणावर गाडी वळविताना अडचण येण्याची शक्यता असते. गाडीच्या स्प्रिंग्ज यामुळे लवकर बिघडतात. टायर फाटतात वगैरे.
काही ट्रकमधून लांब सळ्या नेल्या जातात, त्या वेळी या सळ्यांची मीटर-मीटर लांब टोके ट्रकबाहेर येतात. अशा वेळी ट्रकच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाचा वेग जास्त असेल व तो वेळीच नियंत्रित केला नाही तर अपघात घडू शकतो. असे अपघात होऊ नयेत म्हणून अशा ट्रकमधून बाहेर येणाऱ्या सळ्यांच्या टोकाला दिवसा लाल पाटी आणि रात्री लाल काच लावलेला पेटता कंदील अडकविण्याचे बंधन आरटीओने घातलेले असते. शिवाय रस्त्यावरून जाताना अशा ट्रक्सनी एकदम डावीकडच्या मार्गिकेतून जायला हवे.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

इतिहासात आज दिनांक.. १२ नोव्हेंबर
१८६५ इंग्लिश कादंबरीकार एलिझाबेथ क्लेगहान गॅस्केल यांचे निधन. ‘मेरी बार्टन अ टेल ऑफ मँचेस्टर लाइफ’ ही त्यांची कादंबरी लोकप्रिय झाली.
१८७९ आधुनिक भारताच्या इतिहासातील श्रेष्ठ पुढारी सर सी. पी. रामस्वामी अय्यर यांचा जन्म.
१८८० सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा अहमदनगर जिल्हय़ातील पारनेर येथे जन्म. ते कुशाग्र बुद्धीचे व जबरदस्त स्मरणशक्ती असणारे विद्यार्थी होते. पुढे ते ‘न्यू इंग्लिश स्कूल’ या पुण्यातील शाळेत शिकायला आले. येथे महर्षी कर्वे यांचे शिष्यत्व त्यांना लाभले. तर र. धों. कर्वे सहाध्यायी लाभले. १८९९च्या मॅट्रिक्युलेशन परीक्षेत त्यांचा पाचवा क्रमांक व संस्कृत नैपुण्याची ‘जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती’ त्यांना मिळाली. १९०२ मध्ये त्यांनी ‘मातृभूमी स्वतंत्र करण्यासाठी सारे आयुष्य अर्पण करीन’ अशी शपथ त्यांनी घेतली. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी ते स्कॉटलंड येथील एडिंबर्ग येथे गेले. सेनापती बापट यांच्या चरित्रकार वासंती फडके त्यांच्याबद्दल लिहितात, ‘‘धरणग्रस्त शेतकऱ्यांचा भारतातील पहिला लढा म्हणून ज्या मुळशी सत्याग्रहाचे यथार्थ वर्णन केले जाते, त्या आंदोलनातील नेतृत्वामुळे ‘सेनापती’ हे बिरुद त्यांना लाभले. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात सुरू झालेल्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळीपासून ते गोवा मुक्ती आंदोलनापर्यंतच्या प्रत्येक संघर्षशील लढय़ात सेनापती आघाडीवर राहिले. कुशाग्र बुद्धी, अलौकिक साहस व निर्भयता, विक्षिप्त वाटावी इतकी कृतिप्रवणता व विलक्षण चिंतनशील पिंड असलेल्या सेनापतींचे राजकीय तत्त्वचिंतन मात्र आजपर्यंत उपेक्षितच राहिले आहे.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची : कृष्णदेव रायाची वैभवशाली कारकीर्द
इ.स. १५०९ ते १५२९ या काळात कृष्णदेव रायाची विजयनगरच्या राजेपदाची कारकीर्द ही अत्यंत वैभवशाली होऊन गेली. त्याच्या राजवटीत राज्याचा विस्तार कटकपासून कारवापर्यंत तर दक्षिणेस कन्याकुमारीपासून उत्तरेस गुलबर्गापर्यंत झाला होता. कृष्णदेव राया स्वत: संस्कृत, कन्नड, तामीळ भाषांत पारंगत होता. त्याने स्वत: ‘जांबवती कल्याण’ ही संस्कृत रचना केली होती. दक्षिणेतील सर्व मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर अनेक मजली गोपुरे बांधण्याची कल्पना त्याचीच. त्याने ही गोपुरे बांधली म्हणून त्यांना रायगोपुरे म्हणतात. त्याच्या कारकीर्दीत राजधानी हंपी येथे कृष्ण मंदिर, विठ्ठलस्वामी मंदिर व अनंत शयनगुड्डी मंदिर ही तीन भव्य मंदिरे बांधली गेली.
   कृष्णदेव रायाने लष्करी व सैनिकी तयारी पूर्ण करून प्रथम ओरिसाचा रुद्रप्रताप याचा समाचार घेतला. बहामनी राज्याची शकले होऊन त्याच्या पाच सुलतानशाह्य़ा झाल्या होत्या. या शाह्य़ांपैकी निजामशहा, आदीलशहा व कुतूबशहा यांनी एकी करून कृष्णदेव रायावर चढाई केली. कृष्णा नदीच्या खोऱ्यात झालेल्या लढाईत विजयनगर सैन्याचा सेनापती रामलिंग नायक याने त्या सर्वाचा पराभव केला. आदिलशहा या लढाईत मारला गेला. पाठोपाठ कृष्णदेव रायाने तुमकूर, म्हैसूर, बंगळूर, पेनकोंडा येथल्या बंडखोर सामंतांना ताळ्यावर आणले. कृष्णदेव राया स्वत: एक कसलेला सेनापती होता. कृष्ण देवरायाच्या तीन पत्नी होत्या. त्यातील एक पत्नी ओरिसाच्या राजाची मुलगी होती. आखणी दोन पत्नी श्रीरंगपट्टणमच्या मांडलिक राजाच्या दोन मुली होत्या. त्याशिवाय एक पत्नी पूर्वी गणिका होती. तिच्या प्रेमाखातर त्याने एक शहर वसविले होते. प्रत्येक पत्नीसाठी एक महाल होता. सर्व नोकर-चाकर स्त्रियाच असत. पहारेकरी म्हणून त्या महालांवर हिजडे असत. या राण्या पालखीतून बाहेर जात. पालखीच्या मागेपुढे शे-दोनशे हिजडे चालत असत. अंत:पुरात दासी धरून एक हजार स्त्रिया होत्या. कृष्णदेवरायाचा मृत्यू इ. स. १५२९ मध्ये झाला.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

First Published on November 12, 2012 12:14 pm

Web Title: itahas kutuhal manmoracha pisara navneet safar kal parvachi