लाहोरचे महाराजा रणजीतसिंग यांनी त्यांच्या सन्याचे नियोजन अत्यंत पद्धतशीरपणे केले होते. त्यांच्या प्रबळ सनिकी शक्तीमुळे ईस्ट इंडिया कंपनीचे सरकारही त्यांच्या हयातीत त्यांच्या शीख साम्राज्याला हात लावण्याची हिंमत करू शकले नाही. स्वत युद्धकुशल असलेल्या रणजीतसिंगांची ख्याती युरोपात ‘पूर्वेकडचे नेपोलियन’ म्हणून झाली होती. वाटर्लुतील पराभवानंतर नेपोलियनचा फ्रान्सवरील अंमल संपला आणि त्याच्याकडचे अनेक सेनाधिकारी, सैनिक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी बेकार झाले. त्यातल्या काहींनी युरोपीय राज्यांमध्ये नोकरी धरली तर काहीजण पौर्वात्य देशांमध्ये आले. रणजीतसिंगाची ख्याती ऐकून प्रथम अलार्ड हा फ्रेंच आणि व्हेंचुरा हा इटालियन हे दोघे नेपोलियनच्या लष्करातले सेनाधिकारी लाहोरला नोकरीच्या शोधात आले. त्यांना नोकरीत घेतल्यावर रणजीतसिंगांना त्यांचा चांगला अनुभव आल्यावर त्यांनी अनेक युरोपीय लोकांना मोठमोठय़ा पदांवर नियुक्त करून आपले लष्करी प्रशासन आणि सरकारमध्ये सुधारणा करवून घेतल्या.

जीन व्हेंचुरा हा एका ज्यू दाम्पत्याचा इटलीत १७९४ साली जन्मलेला मुलगा. रुबीनो बेन तोरा असे मूळ नाव असलेल्या जीनचे नाव इटालियन पद्धतीने जिओवानी बॅप्टिस्ट असे केले गेले, पण त्यात पुढे आणखी बदल करून त्याने जीन बॅप्टिस्ट व्हेंचुरा करून घेतले. १७ व्या वर्षी इटलीच्या साम्राज्यात सामान्य सैनिक म्हणून नोकरीस लागलेला जीन पुढे नेपोलियनच्या फ्रेंच शाही लष्करात नोकरीस लागला. या लष्करात पायदळाच्या कर्नलपदावर जीन पोहोचला. पुढे वाटर्लुतील नेपोलियनच्या पराभवामुळे बेकार झालेल्या जीनने परत इटलीतील आपले घर गाठले! तिथे त्याला कळले की पर्शियाच्या शहाला त्याच्या लष्करासाठी युरोपीय सैनिक आणि सेनाधिकारी हवे आहेत. फ्रेंच सन्यातला चांगला अनुभव असलेल्या जीनला पर्शियाच्या राजाने त्याच्या लष्करात कर्नलपदावर नियुक्त केले. जीनने पर्शियन सन्याला युरोपीय पद्धतीचे लष्करी शिक्षण देऊन त्याचे आधुनिकीकरण केले. पुढे १८२२ मध्ये शहाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अब्बास हा पुढचा शहा म्हणून गादीवर आला. परंतु त्याचा भरवसा ब्रिटिश सेनाधिकाऱ्यांवर अधिक असल्याने परत एकदा जीन व्हेंचुरा बेकार होऊन नोकरीच्या शोधात हिंडायला लागला.        (पूर्वार्ध)

सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com