वाटर्लुतील पराभवानंतर नेपोलियनची फ्रान्समधील सत्ता नामशेष झाली त्या वेळी त्याच्या फौजेमधले सैनिक, सेनाधिकारी बेकार होऊन नोकरीच्या शोधात फिरू लागले. त्यापैकी जीन व्हेंचुरा हा इटालियन तरुण प्रथम इराणच्या शहाकडे तीन वर्षे नोकरी करून १८२२ साली लाहोरात महाराजा रणजीतसिंगांकडे नोकरीच्या शोधात आला. महाराजांनी व्हेंचुराचा लष्करातला अनुभव पाहून, पण त्याचा ब्रिटिशांशी काही संबंध नाही याची खातरजमा करूनच आपल्या नोकरीत ठेवले. कोणत्याही युरोपीय देशाशी युद्ध झाल्यास व्हेंचुरा महाराजांशीच निष्ठावंत राहील असा करारही त्याच्याकडून करून घेण्यात आला. महाराजांनी जीन व्हेंचुराकडे प्रथम पाचशे घोडदळाचे नेतृत्व देऊन त्याचा चांगला अनुभव आल्यावर आणखी मोठय़ा जबाबदाऱ्या त्याच्यावर टाकल्या.

रणजीतसिंगांशी वैमनस्य असलेल्या अफगाण राजांनी एकत्र येऊन त्यांच्या संयुक्त फौजांनी महाराजांच्या फौज ए खासवर हल्ला केला. नौशेरा येथे झालेल्या लढाईत महाराजांच्या सन्याचे नेतृत्व व्हेंचुराने केले. या लढाईत व्हेंचुराने विजय मिळवून देऊन पेशावरही घेतले. या लढाईनंतर अनेक वेळा अफगाणांनी बंडं केली ती सर्व व्हेंचुराने मोडून काढली. व्हेंचुराचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्याने रणजीतसिंगाच्या लष्कराचे आपल्या इतर फ्रेंच सहकाऱ्यांच्या साहाय्याने केलेले युरोपीय पद्धतीचे आधुनिकीकरण. विशेषत पायदळात सुधारणा करून त्यामध्ये गुरखा, पठाण, बिहारी सनिकांच्या तुकडय़ा त्याने तयार केल्या.

व्हेंचुराने एका पंजाबी स्त्रीशी विवाह करून त्यांना एक मुलगीही होती. लाहोरात त्याने एक भव्य घर बांधले. विशेष म्हणजे या घराच्या आवारातच मोगलकालीन प्रसिद्ध नर्तिका अनारकलीची कबर असल्यामुळे घराचे नाव अनारकली हाऊस झाले. व्हेंचुराला उत्खनन करून पुरातात्त्विक संशोधनाचा छंद होता. पेशावरातील बौद्ध स्तुपांच्या परिसरात उत्खनन करून त्याने ग्रीक आणि मगध राज्यांच्या नाण्यांचा संग्रह केला. हा संग्रह त्याने पुढे कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलला दिला. अखेपर्यंत रणजीतसिंगांना निष्ठावंत राहिलेल्या जीन व्हेंचुराचा मृत्यू १८५८ साली झाला.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com