प्रतीक्षिप्त क्रियेविषयींचे मूलभूत संशोधन करणारे रशियन शास्त्रज्ञ अशी ओळख आहे सेंट पीटर्सबर्गच्या इव्हान पावलोव्ह यांची. एका चर्च व्यवस्थापकाच्या अकरा मुलांमधील सर्वात ज्येष्ठ असलेल्या इव्हानला लहानपणी मोठी दुखापत झाल्यामुळे त्याचे शिक्षण उशिरा सुरू झाले. पुढे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ नॅचरल सायन्सेस’मध्ये शिकत असताना त्यांना शरीरशास्त्राविषयी आवड निर्माण होऊन त्यांनी पुढे वैद्यकीय शास्त्रातच पारंगत व्हायचा निश्चय केला. १८७९ साली इव्हाननी सेंट पीटर्सबर्गमधील मिलिटरी अ‍ॅकॅडमीत वैद्यकीय शिक्षण घेऊन शरीरशास्त्राविषयी अधिक संशोधन करण्यासाठी सेंट पीटर्सबर्ग शहरात स्वत:ची प्रयोगशाळा सुरू केली. पाव्हलाव यांचे प्रमुख संशोधन शरीरातील पचनसंस्थेसंबंधी आणि त्या अनुषंगाने त्यांनी पचनसंस्था आणि चेतासंस्था यातील संबंध स्पष्ट केला. त्यांनी आधुनिक मनोविज्ञान आणि मानसिक विकारांचं निदान या क्षेत्रात मोलाची भर टाकली. संशोधन करताना त्यांनी काही अभिनव प्रयोग केले. कुत्र्याच्या पचनसंस्थेत कोणत्याही प्रकारे अडथळा न आणता निरीक्षण करण्यासाठी त्यांनी कुत्र्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करून ‘खिडकी’ तयार केली! या खिडकीतून कुत्र्याच्या पचनसंस्थेचे निरीक्षण करून त्यांनी काही निष्कर्ष काढले. या निष्कर्षांमधून त्यांनी मज्जातंतू, जाठररस आणि इतर पाचकरसांचा पाझर यांचा परस्परसंबंध प्रस्थापित केला. मेंदूने संदेश न देता ज्या क्रिया घडून येतात त्यांना प्रतीक्षिप्त क्रिया असे नाव आहे. कुत्र्यावर प्रयोग करून इव्हान पावलोव्हनी, या प्रतीक्षिप्त क्रिया काही प्रमाणात मानसिक परिस्थिती आणि पूर्वानुभव यावर अवलंबून असतात असे सिद्ध केले. हा निष्कर्ष मानवी शरीराबाबतही तंतोतंत लागू पडला. मनोविज्ञानशास्त्रातील अनेक गोष्टींची उकल या संशोधनामुळे झाली. या संशोधनास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळून १९०४ साली इव्हान पावलोव्हना नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा बहुमान करण्यात आला. ‘निरीक्षण, निरीक्षण, निरीक्षण’ हे त्यांच्या संशोधनामागचे सूत्र होते. त्यांचा मृत्यू १९३६ साली सेंट पीटर्सबर्ग येथे झाला.

– सुनीत पोतनीस

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Loksatta kutuhal artificial intelligence Peter Norvig
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता : दोन उत्कृष्ट मार्गदर्शक

sunitpotnis@rediffmail.com

 

 

वनस्पतींची कर्ब बांधणी

हरित वनस्पती प्रकाश-संश्लेषणाद्वारे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून कबरेदके तयार करतात आणि मुळे, बुंधा, फांद्या, पाने, यात साठवतात. जेवढा कार्बन वनस्पतीत साठलेला असतो तेवढा हवेतून शोषलेला असतो. या गोष्टीला वसुंधरेचे तापमान मर्यादेत राखण्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. कारण, पृथ्वीवरील हवेत जेवढा कार्बन (डायऑक्साइड) जास्त, तेवढे पृथ्वीचे तापमान जास्त. वाढणाऱ्या तापमानामुळे हवामान बदलाची भीती वाढते. जागतिक संस्थांनी सुचवले आहे की, सर्व देशांनी औद्योगिकीकरणामुळे होणारे कार्बन डायऑक्साइडचे प्रदूषण कमी करण्यासाठी मोठय़ा क्षेत्रावर वने लावावी, जोपासावी, जेणेकरून कार्बन वनस्पतीमध्ये बंदिस्त राहील.

प्रत्यक्षात एखाद्या वृक्षाने किती कार्बन साठवलेला आहे, हे कळण्यासाठी वृक्षाचा ‘बायोमास’ – जलरहित वजन – माहीत असणे गरजेचे आहे. गवत किंवा लहान झुडूप मुळापासून उपटून, ओव्हनमध्ये कोरडे करून त्याचे वजन, म्हणजेच बायोमास मोजणे शक्य आहे. सहसा कार्बन या बायोमासच्या/ जैवभराच्या ५० टक्के असतो. संबंध वृक्ष मुळापासून शेंडय़ापर्यंत मिळवून, स्वच्छ धुवून, कोरडा करून त्याचे वजन कसे करणार? शिवाय, यासाठी वृक्ष तोडणे योग्यही नाही. म्हणून जिवंत, उभ्या वृक्षाचा जैवभार मापण्यासाठी बरीच मेहेनत घ्यावी लागते.

वृक्षाचा सर्वात जड भाग बुंधा. जमिनीपासून सुमारे १.३० मीटर उंचीवर बुंध्याचा परीघ आणि बुंध्याची एकूण उंची मापून घनफळ मिळते. फांद्यांचा पसारा मोजतात, प्रयोगाने घनता ठरवतात. (खैर- ०.९८ ग्रॅम प्रति सेंटिमीटर, पांगारा- ०.२८ ग्रॅम प्रति सेंटिमीटर  इ.) वृक्षांचा बायोमास त्यांच्या घनफळाच्या ७२.५ टक्के असल्याचे अनेक प्रयोगांवरून आढळले आहे. मुळाचे वजन त्या वृक्षाच्या जमिनीवरील वजनाच्या २७ टक्के धरले जाते. जमिनीवरील आणि जमिनीखालील कोरडे वजन एकत्र केल्यावर वृक्षाचा बायोमास मिळतो,

त्याच्या ५० टक्के कार्बन असतो. (१५ वष्रे वयाच्या खैर वृक्षातील कार्बन – ३०.८१ किलोग्राम, त्याच वयाच्या पांगारा वृक्षातील कार्बन – २५.४६ किलोग्राम. (मुंबईतील एका प्रकल्प अहवालातून उपलब्ध.)

ही सर्व आकडेवारी अनेक जातींच्या आणि वयाच्या वृक्षांवर प्रत्यक्ष प्रयोग करून ठरवण्यात आलेली असली तरी स्थानिक हवामान, जमिनीचा पोत, वनरक्षणाची पद्धत यांमुळे त्यात फरक पडतात. म्हणून जिवंत वृक्षातील कार्बनसाठा हा नेहमीच ‘अंदाज’ समजतात. अनेक जातीची कोटय़वधी झाडे लावून सुमारे १० वर्षांत किती कार्बन बांधला जाईल. याचे गणित मांडणे अशा अभ्यासाने शक्य होईल.

– प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org