उन्हाळ्यामध्ये जनावरांची भूक मंदावते. कोरडा चारा असेल तर त्यांचे  खाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जनावरांना प्रथिनांचा पुरवठा कमी होतो. प्रथिनांमुळे दुधाचे उत्पादन तसेच शरीराची वाढ होत असते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. म्हणून उन्हाळ्यामध्ये प्रथिनयुक्त अन्नघटक इतर माध्यमांतून दिले तर जनावरांचे पोषण चांगले होते.
धान्यातून प्रथिनांचा पुरवठा करण्यासाठी जास्त खर्च येतो. जनावरांच्या खाद्यात एझोलाचा वापर केल्यास खर्चात बचत होते. एझोला या निळे-हिरवे वर्गातील शेवाळामध्ये २५ ते ३५ टक्के प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह व इतर घटक मोठय़ा प्रमाणात असतात. जैविके आणि प्रतिजैविके यांचाही साठा असतो. एझोलामुळे पशुखाद्य किंवा पेंडीच्या वापरामध्ये २० ते २५ टक्के बचत होते. दूधउत्पादन वाढीबरोबरच उत्पादन खर्चातही बचत होते.
एझोला तयार करण्यासाठी चार फूट रुंद, नऊ ते दहा फूट लांब व सहा ते सात इंच खोल खड्डय़ामध्ये २००-३०० मायक्रॉन सिलपॉलिन (प्लास्टिक) कागदाचे आच्छादन करून पाणी साठविण्याचे छोटेसे तळे तयार करावे. यामध्ये १० ते १५ किलो चाळलेली सुपीक माती एकसारखी पसरावी. तसेच पाच किलो शेण १० लीटर पाण्यामध्ये भिजवून टाकावे किंवा १० किलो गांडूळखत टाकावे. यामध्ये ५० ग्रॅम सुपर फॉस्फेट टाकावे. पाण्याची उंची चार इंचापर्यंत ठेवावी. मग एक किलो एझोलाचे शुद्ध कल्चर या पाण्यावर सोडावे. एझोलाची वाढ झपाटय़ाने होऊन आठ ते दहा दिवसांमध्ये एझोला काढण्यासाठी तयार होते. अशा प्रकारच्या प्रत्येक तळ्यातून दोन दिवसांतून एझोलाची काढणी करावी.   
एका तळ्यातून एक ते दोन किलो एझोला तयार होते. एझोला स्वच्छ पाण्यात धुऊन प्रत्येक गाईला दररोज एक ते दोन किलो तर शेळ्यांना २०० ते ३०० ग्रॅम खाद्यातून द्यावे. एझोलाचे उत्पादन चांगले मिळण्यासाठी १० ते १५ दिवसांतून एकदा ५० ग्रॅम सुपरफॉस्फेट टाकावे. तसेच थोडय़ा प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्य टाकले तर त्याचा फायदा होतो. तीन महिन्यांतून एकदा हा ‘बेड’ बदलावा. एझोला हे जैविक खाद्य असल्यामुळे त्याचा पशुपक्ष्यांची उत्पादनवाढ तसेच आरोग्य यासाठी फायदा होतो.
-डॉ. भास्कर गायकवाड (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. :     परतीचे वेध आणि परतावा
मी परत गेल्यावर या इथे इतक्या प्रगत झालेल्या विज्ञानातले माझ्या टिळक रुग्णालयाच्या वातावरणात काही वापरता येईल असे मला कधीच वाटले नाही. सुदैवाने ही जाण झाली, नाहीतर परदेशातून परत आल्यावर जसे अनेकजण निराश होतात आणि परत जातात तसेच माझेही झाले असते. अमेरिकेत मोठय़ा आकर्षक नोकऱ्यांचे पर्याय माझ्या समोर उभे होते, पण त्याचे आकर्षणच कधी वाटलेच नव्हते.  ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’ हेच गाणे मनात वाजत असे.
 परदेशात मी थोडाफार उत्क्रांत मात्र झालो. ‘केल्याने देशाटन सभेत संचार’ माणूस बदलतो हे रामदासांचे म्हणणे इथे लागू पडले असणार. अमेरिकेत आम्ही चैन केली नाही.Yellow Stone National Park, कॅलिफोर्निया, Disney Land असले काही केले नाही. म्हणायला डिट्रॉइटमध्ये असताना मिशिगनच्या उत्तरेला टुलिप फुलांचे मळे आणि रामकृष्ण मिशनचा अरण्यातला एक निसर्गरम्य मठ बघितला आणि मोटारीने जाऊन एकदा नायगारा धबधबा बघितला एवढीच चैन केली. परत जाताना कोठलेही महाग Instrument  नेले नाही. असल्या अवजाराची देखभाल भारतात होणार नाही याची खात्री होती. आणि परत मुंबईत राहयला लागल्यावर माझा दिनक्रम पूर्णपणे बदलून टाकला. खासगी व्यावसाय संध्याकाळी एका तासापुरता मर्यादित केला. टिळक रुग्णालयात पाच तास राखून ठेवले, मानधन होते ५०० रुपये. दररोज पहाटे फिरणे सुरू केले. दवाखान्याच्या आधी मोजून एक तास BRIDGE खेळण्याचा रतीब सुरू केला आणि कामाच्या मागे पळायचे नाही जे खासगी थोडेफार काम येईल त्यात भागवायचे असे मोठे मर्यादित आयुष्य आखले. सुदैवाने थोडेफार काम चालू राहिले. आणि त्यापेक्षा सुदैव असे की बायकोने कधी तक्रार केली नाही. (स्त्रीसुलभ असते तेवढीच कुरकुर केली, पण ती आणखी पैसे मिळवले असते तरी झालीच असती – स्पष्ट बोलतो माफ करा)
संकट असे होते की टिळक रुग्णालयात अजून प्लास्टिक सर्जरीचा विभाग नव्हता तेव्हा माझी जगातली ओळख ना धड प्लास्टिक सर्जन ना धड जनरल सर्जन अशीच होती. पण मी निर्लज्ज आणि खंबीर दोन्ही होतो. जर विभाग झाला तर काय करायचे याचा विचार करत असे. माझे मुंबईतले समवयीन प्लास्टिक सर्जन्स या काळात चमकू लागले, समाजमान्य झाले. खासगी रुग्णालयात चार पैसे मिळवू लागले, परिषदांना जाऊ लागले, पण मला त्यामुळे ढिम्म झाले नाही. मी शर्यतीतून अकाली निवृत्ती होण्याचा मार्ग जाणूनबुजून सुखाने स्वीकारला होता. हे माझे सुदैव आणि मग हळूहळू तब्बल पाच वर्षांनी १९७८ साल उजाडले आणि माझे वैज्ञानिक क्षितिज एकदम झळाळून चमकू लागले.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : पोटदुखी- १
पोटदुखी या विकारात सर्वच वैद्य शंखवटी व प्रवाळपंचामृत ही दोन औषधे वापरतात. मी वापरू लागलो त्याच्यामागे थोडा वेगळा इतिहास आहे. आमचे एक मित्र डॉक्टर वडांबे हे आमच्याकडून प्रवाळपंचामृत मोठय़ा प्रमाणावर पूर्वी घेत असत. हे औषध एवढे तू का घेतोस, हे विचारता त्याने मुंबईत मी सरसहा वापरतो असे सांगितले. साहजिकच होते. मुंबईत आम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी, अल्सर याचे रोगीच फार. आमच्यापेक्षा वयाने लहान पण ज्ञानाने थोर असे वैद्य गो. शं. तांबे हे औषधांचे शास्त्र शिकविताना शंखवटीचे महत्त्व नेहमीकरिता नसून तात्कालिक अजीर्णावरच आहे, हे फार चांगल्या तऱ्हेने सांगत. नेहमीच अजीर्ण होऊ लागले की, मूलभूत वेगळा विचार हवा, असा त्यांचा मुद्दा असे.
एक दिवस दरक्षणी ढेकरा, पोट तुडुंब व जबरदस्त पोटदुखी असा रुग्ण आला. वरील जोडगोळी, जयविजय ३-३ गोळ्या दिल्या. मात्र जादूसारखी पोटदुखी थांबली. वायू मोकळा झाला. ढेकरा नाहीशा झाल्या. असो. मित्रवर्य डॉ. वडांबे, गुरुवर्य वै. गो. शं. तांबे व अनामिक रुग्णांना धन्यवाद!
‘पोट दुखले की माग ओवा’ ही म्हण आहे. वैद्यांना थोडे त्याच्या पलीकडे जाऊन बघावे लागते. व्यवहारात अनुभवास येणाऱ्या दहा प्रकारच्या पोटदुखीचा विचार आपण करणार आहोत. आमाशय, बेंबी, पच्यमानाशय, पक्वाशय, वृक्क (किडनी), अ‍ॅपेंडिक्सला सूज, रिकामे पोट, ओटीपोट अशा वेगवेगळ्या पोटाच्या अवयवांना, वायू, पित्त, कफ, जंत, मूतखडा, सूज, रिकामी जागा, पाळीची तक्रार या कारणांनी दु:ख उत्पन्न होते. तसेच काळालाही महत्त्व आहे. पोट केव्हा दुखते व केव्हा दुखत नाही? हा महत्त्वाचा विचार डोळ्यासमोर हवा. पोटदुखी हा विकार रोगी सांगत असला व डॉक्टर वैद्य तो तसा ‘ट्रीट’ करीत असले तरी प्रत्यक्षात तो रोग, अल्सर, आम्लपित्त, जंत, मूतखडा, आतडय़ाची सूज वा मासिक पाळी विकार असू शकतो. पोटदुखी हे त्या विकारातील एक चटकन् जाणवणारे लक्षण असते.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १७ मे
१८४६ > पहिले मराठी वृत्तपत्रकार, निबंधकार व भाषांतरकार, गणिताचे जाणकार आणि शिक्षणतज्ज्ञ बाळशास्त्री जांभेकर यांचे वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी निधन. या अल्पायुष्यात प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून त्यांनी कोकणातील शिलालेख व ताम्रपटांबद्दल निबंध लिहिले होते. विद्यार्थ्यांसाठी ‘नीतिकथा’, ‘भूगोलविद्या’, ‘बालव्याकरण’ ही पुस्तके त्यांनी लिहिलीच, परंतु शिक्षकांसाठी ‘शिक्षारीती’ हे पुस्तकही लिहिले. ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया रचणाऱ्या या विद्वानाने ‘हिंदुस्थानचा इतिहास’ आणि ‘मानसशक्तीविषयीचे लेख’ हे ग्रंथही लिहिले होते.
१८६५ >‘रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मुलाचे शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी काढलेल्या टिपणांतून ‘रियासतीं’चा जन्म झाला. ‘मुसलमानी रियासत’, ‘मराठी रियासत’ आणि ‘ब्रिटिश रियासत’ हा ८५० वर्षांचा काळ त्यांनी १३ खंडांत मांडला. ‘पेशवे दप्तर’ (४५ खंड) ‘पूना रेसिडेन्सी कॉरस्पाँडन्स’ (पाच खंड) असे एकंदर १०५ ग्रंथ व २७५ लेख त्यांनी आयुष्यभरात केले होते.
– संजय वझरेकर