कॅरिबियन बेटांपैकी जमैका या बेटाने त्यांचे वैशिष्टय़पूर्ण संगीत, खाद्यसंस्कृती, तिथले सांस्कृतिक वैविध्य, क्रिकेटप्रेम यांनी जगात एक खास ओळख तयार करून ठेवली आहे. कॅरिबियन बेटांपैकी क्यूबा आणि हैती या बेटांनंतर क्षेत्रफळाने तिसऱ्या क्रमांकाचे बेट असलेल्या जमैकाची लांबी २३४ कि.मी. आणि सरासरीरुंदी आहे ८० कि.मी. १६५५ पासून एक ब्रिटिश वसाहत असलेल्या जमैकाला ६ ऑगस्ट १९६२ रोजी स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असलेला जमैका जरी स्वायत्त आणि स्वयंशासित असला तरी ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ द्वितीय ही औपचारीकरित्या जमैकाची राष्ट्रप्रमुख आहे. याचाच अर्थ, औपचारिकपणे तेथील सरकार प्रजासत्ताक नाही. किंग्स्टन हे जमैकाचे सर्वांत मोठे आणि राजधानीचे शहर. कॅरिबियन सागरात जमैका बेटाचे स्थान क्यूबाच्या दक्षिणेस १४५ कि.मी. तर हैतीच्या पश्चिमेस १९० कि.मी. आहे.तैनो जमातीचे लोक हे इथले मूळचे रहिवासी. हे लोक या प्रदेशाला झायमाका म्हणजे जंगल आणि पाण्याची भूमी असे म्हणतात. पुढे आलेल्या युरोपियन लोकांनी त्याचे जमैका केले. ख्रिस्तोफर कोलंबस त्याच्या दुसऱ्या अमेरिका मोहिमेत १४९४ साली या बेटावर प्रथम उतरला. कोलंबस हा या बेटावर आलेला पहिला युरोपियन. पुढे कोलंबस त्याच्या चौथ्या अमेरिका मोहिमेत १५०३ मध्ये समुद्री वादळात अडकून या जमैका बेटावर त्याच्या इतर खलाशांबरोबर साधारणत: एक वर्षभर राहिला होता. या काळात त्याने जमैका बेटाचा ताबा स्पेनच्या राजाच्या नावाने घेतला पण १५०४ मध्ये तो आणि त्याचे साथीदार जमैका सोडून परत गेले. पुढे १५०९ साली स्पॅनिश राजाने जमैकात ८० लोकांना पाठवून आपली वसाहत स्थापन केली आणि पुढे अनेक स्पॅनिश कुटुंबांनी जमैकात स्थलांतर केले.

या स्पॅनिश वसाहतवाल्यांची, जमैकन आदिवासींशी वागणूक अत्यंत क्रूरतेची होती. पूर्वी कोलंबस बरोबर आलेल्या स्पॅनिशांनी या तैनो आदिवासींची मोठय़ा प्रमाणात हत्या केलीच होती. आता आलेल्या स्पॅनिश लोकांनी तोच कित्ता गिरवला, त्यांचा छळ करून अनेकांना ठार मारले. उरले सुरले आदिवासी घाबरून दुसऱ्या बेटांवर पळून गेले. त्यानंतर स्पॅनिश लोकांनी आफ्रिकन गुलामांची आयात करणे सुरू केले.

– सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com