जेम्स मोल्सवर्थ या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश कर्मचाऱ्याने मोठय़ा आकाराचा पहिला मराठी इंग्रजी शब्दकोश इ.स. १८३१ मध्ये तयार केला. हा शब्दकोश तयार करण्यासाठी मोल्सवर्थने आपले संपूर्ण आयुष्य तर वाहिलेच, पण या प्रचंड कामासाठी अनेक विद्वानांना प्रेरित करून या कार्यात सहभागीही करून घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लंडनमध्ये १७९५ साली जन्मलेल्या जेम्सचे शिक्षण एक्सेटर येथे झाल्यावर तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी खात्यात नोकरीस लागला. या नोकरीत जेम्स त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षी भारतात आला. त्याची नेमणूक सन्यातल्या एनसाइन या कनिष्ठ पदावर झाली. त्या काळी ब्रिटिश अधिकाऱ्यांना स्थानिक भारतीय भाषा आणि हिंदी शिकण्याची सक्ती होती. या भाषा शिकून त्यांच्या परीक्षाही द्याव्या लागत. त्याची नेमणूक मुंबई इलाख्यात झाल्यामुळे हिंदीच्या जोडीला तो मराठी शिकला. पुढे त्याची नेमणूक ९ व्या रेजिमेंटमध्ये भाषाभिज्ञ म्हणजे िलग्विस्ट म्हणून झाली. या रेजिमेंटमध्ये तो दुभाषाचे काम करीत असे. १८१६ साली त्याला लेफ्टनंटपदी बढती मिळून असिस्टंट कॉमिसरी म्हणून नेमणूक झाली.

१८१८ मध्ये मोल्सवर्थची नियुक्ती सोलापूरला झाली आणि तिथे त्याचा साहाय्यक भाषांतरकार असलेल्या थॉमस कँडीशी त्याचे चांगले सूत जमले. दोघेही मराठीच्या अभ्यासाने झपाटलेले! दोघांनी मराठी भाषेतल्या शब्दांचा एक संग्रह करण्याचे काम सुरू केले. हा शब्दसंग्रह त्यांच्या भाषांतराच्या कामास उपयोगी पडावा हा त्यांचा त्यामागचा हेतू. हे करताना त्याला यातून एक सुसूत्र, समग्र मराठी-इंग्रजी शब्दकोश (डिक्शनरी) तयार करण्याची कल्पना सुचली. त्याने थॉमस कँडीबरोबर असा शब्दकोश तयार करण्याच्या आवश्यकतेविषयी चर्चा केल्यावर इतर सहकाऱ्यांच्या साहाय्याने तसा शब्दकोश तयार करण्याची योजना आखून ब्रिटिश सरकारपुढे मान्यतेसाठी ठेवली. याच काळात, १८२५ साली मोल्सवर्थला कॅप्टनपदी बढती मिळून प्रथम बडोदा आणि पुढे त्याची मुंबईत नियुक्ती झाली. मोल्सवर्थच्या शब्दकोशनिर्मितीच्या योजनेला ब्रिटिश सरकार सुरुवातीस विशेष उत्सुक नव्हते; पण हो-नाही करत त्याला सरकारने मुंबईत राहून ते करण्यास परवानगी दिली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: James molesworth dictionary
First published on: 27-08-2018 at 00:23 IST