02 March 2021

News Flash

जेम्स मोल्सरशास्त्री (२)

१८२५ साली मोल्सवर्थने सरकारला मराठी-इंग्रजी शब्दकोशाची योजना कळवून त्यासंबंधी परवानगी मिळवली.

ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी विभागात भाषांतरकार आणि दुभाषाचे काम करणारा मोल्सवर्थ भारतात आल्यावर हिंदी आणि मराठी भाषांतही पारंगत झाला. सोलापुरात असताना भाषांतरासाठी उपयोगी पडावा म्हणून त्याने मराठीचा एक शब्दसंग्रह तयार केला. १८२५ साली मोल्सवर्थने सरकारला मराठी-इंग्रजी शब्दकोशाची योजना कळवून त्यासंबंधी परवानगी मिळवली.

मोल्सवर्थने आपला हा मराठी-इंग्रजी शब्दकोश १८३१ मध्ये पूर्ण केला. मराठी-इंग्रजी शब्दकोशाचे काम सुरू करताना त्याच्याबरोबर ‘महाराष्ट्र भाषेचा शब्दकोश’ म्हणजेच मराठी-मराठी शब्दकोशाचेही काम सुरू केले होते. मराठी-मराठी शब्दकोशाचे काम प्रथम पूर्ण होऊन बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीने हा शब्दकोश १८२८ मध्ये छापून प्रसिद्ध केला. यात २५००० मराठी शब्दांचा समावेश आहे. मोल्सवर्थचा मराठी-इंग्रजी शब्दकोश ‘ए डिक्शनरी, मराठी अ‍ॅण्ड इंग्लिश’ या नावाने १८३१ साली प्रकाशित झाला. यात ४०००० मराठी शब्द आणि त्यांचे अर्थ इंग्रजीत नमूद केले आहेत. ९१९ पाने असलेला हा मराठी-इंग्रजी शब्दकोश, मराठी मातृभाषा असलेल्यांसाठी, तसेच कंपनी सरकारच्या ब्रिटिश कर्मचाऱ्यांसाठी उपयोगी ठरावा अशा हेतूने मोल्सवर्थने संपादित केलाय.

शब्दकोश संपादनासाठी मोल्सवर्थला जॉर्ज आणि थॉमस कँडी या दोन बंधूंची मदत झालीच, पण त्याशिवाय मराठी मुलखात त्याने अनेक भाषाविद्वानांना त्या त्या भागातून प्रचलित मराठी शब्द, म्हणी, वाक्प्रचार गोळा करण्यासाठी नोकरीस ठेवले होते. या शब्दांची शुद्धता तो स्वत: तपासून त्याला साजेसा इंग्रजी शब्द निवडून लिहीत असे. मोल्सवर्थ मराठीच्या प्रेमाने इतका झपाटला होता की, कामापुढे तब्येतीकडे दुर्लक्ष होऊन आजारी पडला आणि नोकरीचा राजीनामा देऊन लंडनला परत गेला. १८५१ साली तो परत मुंबईला येऊन त्याने मराठी-इंग्रजीची ६०००० शब्दसंख्या असलेला सुधारित शब्दकोश संपादित केला. पुढे १८७१ साली त्याचे निधन झाले. मोल्सवर्थ मराठी भाषेत इतका पारंगत होता की, त्याच्या ओळखीचे मराठी लोक त्याला ‘मोल्सरशास्त्री’ म्हणत! ७७ वर्षांच्या आयुष्यातली ६० वष्रे मराठीचा ध्यास घेतलेला हा ब्रिटिश शेवटपर्यंत अविवाहित राहिला!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 2:28 am

Web Title: james moller shastri
Next Stories
1 शब्दकोशकार जेम्स मोल्सवर्थ (१)
2 थुलिअम : दुर्मीळातील दुर्मीळ
3 अर्बिअम
Just Now!
X