सध्या गुजरातच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर असलेले जामनगर शहर स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिशराजमध्ये एक महत्त्वाचे आणि संपन्न संस्थान म्हणून ओळखले जात होते. जडेजा राजपुतांच्या वंशजांनी स्थापन केलेल्या या राज्याचे क्षेत्रफळ ९८०० चौ.कि.मी. होते आणि ब्रिटिश राजवटीने या संस्थानाला १३ तोफांच्या सलामींचा मान दिला. १९०१ साली या संस्थानाची लोकसंख्या ३,४०,००० होती.
जाम लाखाजीने गुजरातचा सुलतान बहादुरशाह याला पावागड घेण्यास मदत केल्यामुळे त्याला बारा गावे इनाम मिळाली. परंतु या गावांचा ताबा घेण्यास लाखाजी गेला असता त्याच्या दोन मावसभावांनी त्याला कैद करून हालहाल करून ठार मारले. त्यावेळी तिथून शिताफीने पळून गेलेला लाखाजीचा मुलगा जाम रावळ याने पुढे वडिलांच्या खुन्यांचा सूड उगवून त्यांनाही ठार मारले. जाम रावळ पुढे सौराष्ट्रात जाऊन त्याने आपले छोटे राज्य स्थापन केले. राज्याची राजधानी वसवून तिला नाव दिले नवानगर. नवानगरचे राज्यकत्रे आपल्या नावापूर्वी राजा या अर्थी ‘जाम’ हे विशेषण लावीत असत. त्यामुळे त्यांच्या राज्याचे व राजधानीचे नाव जामनगर झाले. समुद्रातून मोती काढणे आणि मच्छिमारी हा येथला परंपरागत व्यवसाय.
१५४० साली जामनगरचे राज्य स्थापन झाल्यापासून शेजारी राज्ये आणि मोगल सत्तेशी सततचा संघर्ष चालू राहिला. १८१२ साली तत्कालीन जामसाहिब जसजी याने ब्रिटिशांबरोबर संरक्षण करार करून त्यांची तनाती फौज राखली. संरक्षण करार झाल्यावर जामनगर शासकांनी राज्य प्रशासनात लक्ष घालून विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आणल्या.

कुतूहल: बांगडी साचा – भाग २
अमेरिकेतील यादवी युद्धाच्या काळापर्यंत (१८६१-६५) अमेरिकेमध्ये ११०८ गिरण्यांमध्ये ५२ लाख बांगडी चात्या कार्यरत झाल्या होत्या आणि त्यावर कापसाच्या ८ लाख गाठींवर प्रक्रिया करून सूत कातले जात होते. नाऊमकेयाग स्टीम कॉटन कंपनी ह्य़ा सर्वात मोठय़ा गिरणीमध्ये त्यावेळी ६५५८० बांगडी चात्या कार्यरत होत्या. सर्वसाधारण गिरण्यांमध्ये सरासरी ५००० ते १२००० चात्या बसविल्या गेल्या होत्या.
सुरुवातीला बांगडी चात्यांची फिरण्याची गती साधारणपणे ४००० ते ५००० वेढे प्रति मिनिट इतकी होती. ह्य़ा साच्यांवर प्रामुख्याने जाडय़ाभरडय़ा सुताचे उत्पादन घेतले जात असे व तलम सुतासाठी म्यूल साच्याचा वापर केला जात असे.
जेकब स्वायर या शास्त्रज्ञाने इ.स. १८७१मध्ये बांगडी चात्याच्या आखणीत मोठय़ा प्रमाणावर सुधारणा करून नवीन चाते विकसित केले. हे चाते ७५०० वेढे प्रति मिनिट इतक्या गतीने फिरू शकत असे. यामुळे बांगडी साच्याचे उत्पादन वाढले आणि त्याला कताईसाठी लागणारी ऊर्जाही कमी झाली.
पूर्वी एका अश्वशक्तीमध्ये १०० चात्या चालत असत, तर या नव्या चात्यामुळे एका अश्वशक्तीमध्ये १२५ चात्या चालू लागल्या. व यामुळे बांगडी साच्याचा वापर दिवसेंदिवस वाढू लागला. याच सुमारास रॅबेथ नावाच्या शास्त्रज्ञाने एक नवीन चाते विकसित केले. हे चाते स्वयंवंगणशील असून ७५०० वेढे प्रति मिनिटापेक्षाही अधिक गतीला विनाकंपन फिरू शकत असे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात रॅबेथ चाते अत्यंत लोकप्रिय होते.
भारतीय वस्त्रोद्योगात बांगडी साचे बसविण्याची सुरुवात विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात झाली. यावेळेपर्यंत जगभरातील वस्त्रोद्योगातील जवळ सर्व चात्या ह्य़ा बांगडी चात्या होत्या.
पुढील काळात बांगडी साचाच्या चात्यामध्ये आणि इतर भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर सुधारणा केल्या गेल्या. यामुळे चात्यांची गती आणि अनुषंगाने उत्पादन वाढले. या साच्यावर अती जाड सुतापासून अती तलम सुतापर्यंत सर्व जाडीच्या सुताचे उत्पादन करता येऊ लागले.
सुताचा दर्जाही मोठय़ा प्रमाणावर सुधारला. बांगडी साचावर कापूस लोकर, व सर्व प्रकारच्या मानव निर्मित तंतूंची कताई करणे शक्य झाले. या सर्वामुळे आज बांगडी साचा जगभरात सर्वात लोकप्रिय आहे. ओपन एंड एयर जेट यासारख्या सूतकताईच्या नवीन तंत्रज्ञानाच्या स्पध्रेमध्येसुद्धा बांगडी साचा अजून टिकून आहे. जगभरातील ६०% पेक्षा अधिक उत्पादन आजही बांगडी साचावर होते.
चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ –  office@mavipamumbai.org