21 February 2019

News Flash

जे आले ते रमले.. : लोकहितैषी जमसेटजी जीजीभाय

पारशी व्यक्तींनी स्थापन केलेल्या धर्मदाय संस्था आणि लोककल्याणकारी योजना अनेक आहेत.

 

आपल्या व्यापारकुशलता आणि उद्यमशीलता यांच्या जोरावर भारतातील पारशी समाज आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाला. पारशी व्यक्तींनी स्थापन केलेल्या धर्मदाय संस्था आणि लोककल्याणकारी योजना अनेक आहेत. आपल्या दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले पारशी उद्योगपती जमसेटजी जीजीभाय यांचीही लोककल्याणकारी कामे अनेक आहेत..

माहीम बेट वांद्रय़ाला जोडणारा ‘माहीम कॉजवे’ जमसेटजींच्या पत्नी अवाबाई यांनी दीड कोटी रुपयांची मदत केली म्हणून १८४५ साली बांधून झाला. जमसेटजींच्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे मुंबईचे ‘जे. जे. हॉस्पिटल’ उभे राहिले. राणीबागेतील ‘डॉ.भाऊ दाजी लाड म्युझियम’ची इमारत जमसेटजी जीजीभाय यांच्या उदार देणगीतून उभी राहिली. जमसेटजींनी दिलेल्या दीड लाख रुपयांच्या देणगीतून १८३१ साली उभी राहिलेली बेलासिस रोड येथील धर्मशाळा आजही कार्यरत आहे. जमसेटजींच्या मोठमोठय़ा देणग्यांमधून उभ्या राहिलेल्या सार्वजनिक आणि धर्मादाय संस्थांची संख्या १२६ हून अधिक आहे. त्यामध्ये सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स, सर जे.जे.स्कूल ऑफ आर्किटेक्चर, सर जे.जे. स्कूल ऑफ कमíशयल आर्ट यांचाही समावेश होतो. ‘जे.जे.’च्या आवारातील जमसेटजींचा पुतळा आजही वंद्य मानला जातो. जीजीभायनी सुरत, नवसारी, मुंबई आणि पुण्यात रुग्णालये, शाळा, अग्यारी स्थापन करून विहिरी तसेच तलाव खोदले. त्यांनी पांजरापोळ या संस्थेस गुरांच्या पदाशीसाठी ८०,००० रुपयांची देणगी दिली. मुंबईतल्या ठाकुरद्वार येथे जमसेटजींनी गुरांच्या मोफत चरणीसाठी २०,००० रुपये देऊन समुद्रकाठाजवळ जमीन घेतली. पुढे याच ठिकाणी ‘चरनी रोड’ हे रेल्वे स्थानक झाले.

मुंबईच्या या महान दानशूर पुत्राने त्यांच्या आयुष्यात दिलेल्या देणग्यांची बेरीज आजच्या चलनाच्या प्रमाणात १०० कोटी रुपये एवढी होते! जमसेटजींच्या या समाजहितकारी कार्याची पावती म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना ‘नाइटहूड’ व ‘बॅरोनेट’चा बहुमान दिला.. हा मान मिळालेले जमसेटजी हे  पहिले भारतीय!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on February 7, 2018 5:01 am

Web Title: jamsetji