पॅरिसचे सर्वमान्य प्रतीक ठरलेल्या आयफेल टॉवरवर दुसऱ्या विश्वयुद्धात नष्ट होण्याचे काळे सावट आले होते. नाझी जर्मन अधिकाऱ्यांनी आयफेल टॉवर तोडून त्याच्या लोखंडाचा उपयोग जर्मन लष्करी वाहने, शस्त्रास्त्रे बनविण्यासाठी करण्याचा घाट घातला होता. पण हा बेत प्रत्यक्षात उतरला नाही. सप्टेंबर १९३९ मध्ये नाझी जर्मनीने पोलंड घेऊन दुसऱ्या विश्वयुद्धाला सुरुवात केली. १० मे १९४० रोजी जर्मनीने फ्रेंच लष्कराचा धुव्वा उडवून १४ जून रोजी पॅरिसवर कब्जा केला. २६ ऑगस्ट १९४४ रोजी शार्ल्स डी गॉलने शाम्स एलिसी या रस्त्यावरून विजयी मिरवणुकीने येऊन पॅरिस आणि फ्रान्समध्ये आपले फ्रेंच सरकार बनविले. ही चार वष्रे पॅरिसवर नाझी जर्मनांचा अंमल होता. या काळात पॅरिसचे प्रशासन जर्मन लष्करी अधिकारी आणि त्यांना फितूर आणि अनुकूल अशा दहा हजार फ्रेंच अधिकाऱ्यांनी पाहिले. या ‘जर्मन पॅरिस’ काळात रोज रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत शहरात कर्फ्यू ऑर्डर होती, फ्रेंच रेडिओवर सतत नाझी सरकारच्या प्रचाराचे प्रक्षेपण होई. फ्रेंच कारखान्यांमध्ये तयार झालेल्या वस्तू आणि शेती उत्पादन प्राधान्याने जर्मनीत पाठविले जाई. कमावलेले सर्व चामडे जर्मन सनिकांचे बूट बनविण्यासाठी वापरले जाई. कारखाने आणि शेती उत्पादन, जे शिल्लक राहात असे तेवढे फ्रेंच नागरिकांना वाटले जाई. त्यामुळे तुटवडा येऊन अन्नधान्य, तंबाखू, कोळसा, कापड या जीवनावश्यक वस्तूंचे रेशिनग होई. काही व्यापारी त्यांचा काळाबाजार करीत. इंधनाच्या तुटवडय़ामुळे पॅरिसमधील वाहनसंख्या साडेतीन लाखांवरून साडेचार हजारांवर आली. या चार वर्षांत जर्मन सरकारविरुद्ध विद्यार्थी आंदोलने झाली, पण ती दडपली गेली. पुढे २५ ऑगस्ट १९४४ रोजी अमेरिकन आणि फ्रेंच लष्कराने पॅरिस घेतल्यावर तिथे गॉल यांचे फ्रेंच सरकार आले. या सरकारने ज्या फ्रेंच लोकांनी जर्मनांना फ्रान्स घेण्यासाठी मदत केली अशा १०००० फंदफितुरांवर खटले भरले. त्यापकी ११६ लोकांना मृत्युदंड तर बाकीच्यांच्या मालमत्ता जप्त होऊन काही महिन्यांचा तुरुंगवास घडला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

उपयुक्त बुरशी : किण्व

खाद्यजन्य पदार्थातील ग्लुकोजच्या किण्वासारख्या (यीस्ट) कवकांच्या साहाय्याने विघटन केल्यावर इथाईल अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतात. इथाईल अल्कोहोलमुळे किण्वन प्रकिया करून बनविलेल्या पदार्थाची चव स्वादिष्ट बनते आणि पदार्थ टिकाऊ बनतो. कार्बन डायऑक्साइड वायूच्या बुडबुडय़ांनी पदार्थ सच्छिद्र व हलके बनतात आणि अल्कोहोलमुळे एक वेगळीच चव आणि ऊर्जासंवर्धनाचा अनुभव देतात. ही पेये ‘नशा’ देणारी पेये म्हणून ओळखली जातात.

मानवास किण्वन प्रक्रिया तशी नवीन नाही, ऋषीमुनींनी किण्वनाद्वारे तयार केलेल्या आसवांचा उल्लेख वेदात पाहावयास मिळतो. आज बाजारात उपलब्ध असलेली बीअर, वाइन, पोर्टर, अल्कोहोल ही सर्व पेये किण्वन प्रक्रियेतून तयार केली जातात. प्रत्येक पेयाचे वेगळेपण हे त्यासाठी वापरलेल्या कवकावर आणि खाद्यजन्य पदार्थावर अवलंबून असते. साधारणपणे तांदूळ, गहू, माल्ट, बार्ली यांसारखी तृणधान्ये तसेच वेगवेगळी फळे किण्वन प्रक्रियेत खाद्यजन्य पदार्थ म्हणून वापरतात. कवकामधील यीस्टच्या वेगवेगळ्या प्रकारांचा सहभाग किण्वन प्रक्रियेत असतो.

उडीद डाळ आणि तांदूळ एकत्र भिजवून ठेवल्यावर वातावरणातील यीस्टचा त्याच्यावर परिणाम होऊन किण्वन प्रक्रिया होते. प्रत्यक्षात बाहेरून कुठलीही जास्तीची कवके मिसळावी लागत नाही. अशाच प्रकारे जिलबीच्या पिठातही किण्वनाची क्रिया घडून येते. पाव किंवा ब्रेड तयार करताना पावाच्या पिठात बेकर्स यीस्ट या कवकाचा वापर केला जातो. पावाप्रमाणे नित्याच्या वापरातील अनेक पदार्थ या किण्वन प्रक्रियेतून तयार केले जातात. अ‍ॅसपॅरजीलस ओरायझी या कवकाद्वारे जपानमध्ये सोयाबीनपासून सोया सॉस बनवतात. जपानमधील कोजी व हिमॅनाटो हे पदार्थ तयार करण्यासाठी किण्वन प्रक्रियेत अनुक्रमे तांदूळ आणि सोयाबीन या खाद्यपदार्थाना प्राधान्य दिले जाते. इंडोनेशियातील याच अ‍ॅसपॅरजीलसच्या साहाय्याने ‘केट-जॅप’ तयार करतात आणि किण्वन प्रक्रियेसाठी रायझोपस ऑलिगोस्पोरस वापरून ‘टेमपेथ’ या पदार्थाची निर्मिती करतात. म्यूकर आणि अ‍ॅक्टिनोम्युकर या कवकांचा वापर चीनमध्ये सोफू तयार करण्यास केला जातो. अशा प्रकारे यीस्टप्रमाणे आणखीही कवके किण्वन प्रक्रियेत वापरात येतात. खाद्यपदार्थात बदल करून किण्वनाने वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

प्रा. सुरेखा सारंगधर (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org