केवळ सव्वाआठ लाख लोकवस्तीच्या जेरुसलेम शहरात वायव्येकडे ख्रिस्ती, पूर्वेस आणि ईशान्येस अरब मुस्लीम तसेच आग्नेय आणि पश्चिमेस ज्यू लोकांची वस्ती आहे. या लहानशा शहरात सगळे समाज कप्पेबंद जीवन जगतात. पूर्वी सोय म्हणून शहराची अशी धर्मवार विभागणी झाली. त्या काळात सर्व समाजांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध होते. आज त्यांच्यामध्ये संशयाच्या िभती उभ्या आहेत. ज्यूंच्या शब्बाथ प्रार्थनेच्या वेळी, तसेच शुक्रवारी नमाजाच्या वेळी वर आकाशात इस्रायली हेलिकॉप्टर्स टेहळणी करीत घिरटय़ा घालत असतात. जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असली तरी त्या देशाचे संरक्षण मंत्रालय तेल अविव येथे आहे तसेच स्वतंत्र इस्रायलला मान्यता दिलेल्या बहुतेक देशांचे दूतावास तेल अविव येथेच आहेत. जेरुसलेमचे नगर प्रशासन, निर्वाचित मेयर आणि ३१ नगरसेवकांच्या नियंत्रणाखाली चालते. मेयरला साहाय्य करण्यासाठी आठ कार्यकारी अधिकारी असतात. इथले वैशिष्टय़ म्हणजे मेयर आणि नगरसेवक कुठल्याही प्रकारचे वेतन, मोबदला न घेता हे काम करतात. चार वर्षांच्या कालावधीसाठी या लोकप्रतिनिधींची मुदत असते. जेरुसलेम शहरात अनेक प्राचीन धार्मिक इमारतींचे अवशेष आहेत. त्यामुळे संपूर्ण जुने शहर आणि त्याच्या सभोवतालची तटबंदीची िभत युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून नोंदवली आहे. या शहरात औद्योगिक उत्पादन नाममात्रच असल्यामुळे येथले अर्थकारण विविध सेवा आणि धार्मिक पर्यटन यातून येणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून आहे. इस्रायलमधील जाफा, तेल अविव, हैफा या मोठय़ा शहरांपेक्षा जेरुसलेमचे दरडोई उत्पन्न फारच कमी आहे. येथील ज्यू वस्तीत उच्च शिक्षितांचे प्रमाण ६०टक्के  आहे. १९२५ साली स्थापन झालेले हिब्रू विद्यापीठ आणि बेझालेल अकॅडमी या येथील प्रतिष्ठेच्या शिक्षण संस्था आहेत. अक्वाद्झ विद्यापीठ ही येथील अरेबिक पॅलेस्टिनियन शिक्षण संस्था. २५ लाखांची ग्रंथसंपदा असलेली ज्युईश नॅशनल लायब्ररी हे या शहराचे भूषण मानले जाते. जेरुसलेम सिम्फनी ऑर्केस्ट्रा हा येथील प्रमुख वाद्यवृंद. हेन्री क्राऊन थिएटर हे येथले प्रमुख नाटय़गृह. येथे संगीत, नाटय़ाचे जलसे नियमित चालू असतात.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

 

पेटंट आणि वनस्पती

तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या शोधाला दिलेले स्वामित्व अधिकार म्हणजेच पेटंट, असे स्वामित्व अधिकार निश्चित कालावधीत (२० वर्षांपर्यंत) दिले जातात आणि अशा अधिकारांचे नूतनीकरण करता येत नाही. पेटंट हे एखाद्या उत्पादनासाठी किंवा प्रक्रियेबद्दल दिले जाते. पेटंटच्या जागांसाठी एकच अशी काही संकल्पना नसते. प्रत्येक देशाचे याबाबतीत स्वत:चे कायदे असतात आणि त्या त्या देशातील कायद्यांप्रमाणे पेटंट दिले जाते.

भारतात अणू ऊर्जेशी संबंधित पेटंट फारच कमी संख्येने नोंदवली आहेत. सामाजिक हित जपण्यासाठी किंवा नतिकतेच्या विचारानेही पेटंट नोंदणीवर मर्यादा घातल्या जातात. शस्त्रक्रियेची पद्धत गणिती तत्त्वे इत्यादींना पेटंट मिळवण्यासाठी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिस- पेटंट रजिस्ट्रार यांच्या कार्यालयाने तयार केलेल्या मसुद्यानुसार अर्ज करावा लागतो. ह्य़ा अर्जामध्ये तुम्ही केलेल्या संशोधनाची वैशिष्टय़े आणि यापूर्वी केलेल्या संशोधनापेक्षा वेगळेपण नोंदवावे लागते, स्वामित्व मिळवण्यासाठी तुमचे संशोधन पूर्णत: जाहीर करणे आवश्यक असते. जर त्या प्रकारचे संशोधन पूर्वी झालेले असेल तर पेटंटचा अर्ज नाकारला जातो आणि दिलेले पेटंट रद्द केले जाते.

पेटंटला आव्हान देऊन रद्द झाल्याचे उदाहरण म्हणजे हळदीच्या औषधी उपयोगाबाबत दाखल केले गेलेले पेटंट हळदीच्या औषधी उपयोगाबाबत लिखित पुरावे सादर करून ‘हळद’ हे पारंपरिक औषध आहे हे सिद्ध करून त्याद्वारे हळदीच्या पेटंटला आव्हान दिले गेले आणि दिलेले पेटंट रद्द करण्यात आले.

रोझी पेरिव्हिकल ही एक मादागास्करमधील वनस्पती. या वनस्पतीमध्ये असलेल्या दोन औषधांमुळे कॅन्सरवर जालीम औषध समजले जाते. उदा. विनक्रिसलिन व विनब्ल्स्टिन ही द्रव्ये वरील वनस्पतीतून प्राप्त केली गेली. आणि नंतर एली लिली यांनी १९५४ साली बाजारात आणले. त्याद्वारे एल लिली यांनी खूप नफा कमावला. पण मादागास्कर देशाला याचा काहीही फायदा मिळाला नाही.

नरक्या (नोथोपोडायटिस फिटिडा) यापासून कॅपोथिसिन हे द्रव्य काही प्रक्रिया करून मिळवले जाते. काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च यांच्या अंतर्गत येणाऱ्या लखनऊ येथील संस्थेने या औषधाचे पेटंट नं. २२८२६४ तारीख १६.३.२००७ रोजी मिळवले आहे.

देवदत्त मालशे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org