21 April 2019

News Flash

जॉन माल्कम (१)

महाराष्ट्राला लाभलेले दोन मोठे समजूतदार प्रशासक होऊन गेले.

ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या प्रारंभीच्या काळात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि सर जॉन माल्कम हे महाराष्ट्राला लाभलेले दोन मोठे समजूतदार प्रशासक होऊन गेले. माल्कम सामान्य कुटुंबात जन्मलेला, पण उमदा, मनमोकळा, दांडगट आणि दिलखुलास वृत्तीचा होता. जॉन माल्कम हा दक्षिण स्कॉटलंडमधील एका शेतकऱ्याच्या सतरा अपत्यांपकी एक. त्याचा जन्म स्कॉटलंडमधील बर्नफूट परगण्यातला, १७६९ सालचा. जॉनला घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्या मामांनी लंडनला आणून वेस्टरकर्क शाळेत दाखल केले. वयाच्या बाराव्या वर्षी माल्कमने शाळा सोडली आणि मामाच्या ओळखीने तो ईस्ट इंडिया कंपनीत सामान्य सनिक म्हणून भरती झाला. सनिक म्हणून रुजू झालेल्या जॉनने पुढच्या पन्नास वर्षांत कंपनी सरकारमध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गव्हर्नरपदापर्यंत मजल मारली. आपल्या ६४ वर्षांच्या आयुष्यात जॉन माल्कमने एक योद्धा, युद्धकुशल लष्करी अधिकारी, चोख प्रशासक, राजकीय मुत्सद्दी आणि इतिहासकार अशी आपली ओळख करून ठेवली आहे.

१७८३ साली मद्रासमध्ये सनिक म्हणून आलेल्या जॉन माल्कमची नियुक्ती ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रासच्या एका रेजिमेंटमध्ये एनसाइन या सामान्य पदावर झाली. पुढे त्याने जनरल क्लार्कचा लष्करी साहाय्यक, १७९९ च्या अँग्लो-म्हैसूर युद्धात हैद्राबादमधील ब्रिटिश लष्कराचा सेनाधिकारी या नात्याने आणि या युद्धानंतर म्हैसूर सरकारच्या पुनर्रचनेच्या कामात एक राजकीय मुत्सद्दी म्हणून भाग घेतला.

आपल्या कार्यक्षमतेच्या पाठबळावर माल्कम कंपनी सरकारमधील एक एक वरचे पद चढत १८०१ साली गव्हर्नर जनरल वेलस्लीचा खासगी सचिव म्हणून कलकत्त्यात रुजू झाला. पुढच्या काळात माल्कमला मिळालेल्या महत्त्वाच्या कामगिऱ्यांपकी अँग्लो-मराठा युद्धात गव्हर्नर जनरलच्या राजनतिक प्रतिनिधी, म्हैसूरचा रेसिडेंट, इराणची मोहीम इत्यादी होत. ब्रिटनहून आलेल्या माल्कमला गेल्या २९ वर्षांत मायदेशी जायला मिळाले नव्हते म्हणून १८१२ मध्ये मोठय़ा रजेवर लंडनला गेला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on August 29, 2018 3:32 am

Web Title: john malcolm