18 April 2019

News Flash

लोकहितवादी प्रशासक माल्कम (३)

त्या काळी मुंबई इलाख्यातील खेडय़ांमधील शाळांना गावठी शाळा म्हणत.

ईस्ट इंडिया कंपनीचा मद्रास येथील एक सामान्य सनिक म्हणून भारतात आलेला स्कॉटिश तरुण जॉन माल्कम पुढे १८२७ मध्ये मुंबई प्रांताच्या गव्हर्नरपदापर्यंत पोहोचला. आपली सत्ता टिकवावी पण तिचा वापर प्रजाहितासाठी करावा अशा धारणेच्या माल्कमने मराठी माणसाला ओळखून त्याप्रमाणे प्रशासनाची दिशा ठरवली. त्यामुळे साम्राज्यवाद आणि स्थितिवाद यावर दृढ निष्ठा असूनही लोकहित साधणाऱ्या माल्कमला अनेक प्रसंगी वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागला.

त्या काळी मुंबई इलाख्यातील खेडय़ांमधील शाळांना गावठी शाळा म्हणत. या गावठी शाळांमध्ये शिक्षक प्रशिक्षित नव्हते आणि तिथे केवळ अक्षरओळख शिकवली जात असे. १८२९ साली माल्कमने गावठी शाळांची ग्रामीण प्रशासनाशी सांगड घालून तिथेही प्रशिक्षित शिक्षकवर्ग नेमून दिला. स्थानिक भाषांमधून शिक्षण देण्यावर भर ठेवताना माल्कमने अभियांत्रिकी ज्ञान सर्वाना खुले केले. शिक्षण प्रसाराच्या माल्कमच्या धोरणाच्या कार्यवाहीत जíव्हस बंधूंची मोठी मदत झाली. त्यांनी कोकणात रत्नागिरीच्या शाळांमधून मुलींनाही प्रवेश दिला. नेटिव्ह स्कूल सोसायटी या संस्थेने रत्नागिरीत तीन मराठी आणि एक इंग्रजी शाळा सुरू केली. माल्कमने  ‘हॉर्टकिल्चर सोसायटी’ ही संस्था स्थापून देशातील शेती, उद्यानविज्ञान, पुष्पोत्पादन या व्यवसायांच्या विकासासाठी प्रयत्न केले. शेतकरी, माळी यांना उत्तेजन देण्यासाठी या संस्थेने बलजोडी, नांगर पुरवले. या कामी फ्रामजी कावसजी, जगन्नाथ शंकरशेट यांनी माल्कमला बरीच मदत केली. या संस्थेने कोबीसारखे अनेक नवीन भाजीपाले महाराष्ट्रात आणले. माल्कमने केलेल्या इतर कामांमध्ये महाबळेश्वरास ‘थंड हवे’च्या ठिकाणाचा दर्जा देणे, सती बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करणे, जमिनीची मोजणी करून शेतसारा ठरविणे, रस्तेबांधणी यांचा विशेष उल्लेख केला जातो. प्रकृतीच्या कारणावरून माल्कम १८३१ मध्ये लंडनला परतला. दोन वर्षांनी, १८३३ साली हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

First Published on August 31, 2018 2:47 am

Web Title: john malcolm 3