२८ डिसेंबर १९०३ रोजी हंगेरीत जन्मलेल्या, असामान्य स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता असलेल्या नॉयमन यांनी १९२६ या एकाच वर्षी झुरिक येथील तांत्रिक विद्यालयातून रासायनिक अभियांत्रिकीत पदविका आणि बुडापेस्ट विद्यापीठातून गणितात डॉक्टरेट मिळवली. विशीतच ‘जगन्मान्य गणितज्ञ’ अशी गणना झालेल्या नॉयमन यांना गणित, भौतिकशास्त्र, संगणक विज्ञान, अभियांत्रिकी अशा अनेक विषयांत गती होती. शुद्ध आणि उपयोजित गणित या दोन्हीमध्ये तोलामोलाचे योगदान देणाऱ्या नॉयमन यांनी गणिती संख्याशास्त्रात पायाभूत कार्य केले. त्यांच्याच नावाने ओळखली जाणारी बीजगणिताची एक शाखा त्यांनी विकसित केली. तसेच क्वांटम सिद्धान्तातील मापनासाठी गणिती पाया रचला. ‘क्वांटम यांत्रिकी’ या नव्याने विस्तारणाऱ्या विद्याशाखेची पायाभरणी त्यांच्या संशोधनामुळे झाली. प्रिन्स्टन विद्यापीठात आणि तेथील प्रगत अभ्यास संस्थेत त्यांनी १९३१ पासून प्राध्यापक म्हणून काम केले.

नॉयमन व अर्थतज्ज्ञ ऑस्कर मार्गेन्स्टर्न यांच्या ‘थिअरी ऑफ गेम्स अँड इकॉनॉमिक बिहेव्हिअर’ या १९४४ मध्ये प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाने ‘गेम थिअरी’ म्हणजे ‘द्यूत सिद्धांत’ या विषयाची उभारणी झाली. खेळामध्ये पक्षाने कोणता पर्याय निवडला तर त्याला कमाल फायदा किंवा किमान नुकसान होईल यासाठीचे डावपेच कसे आखावे, हे या विषयात विकसित केले जातात. गेम थिअरीच्या पद्धती अर्थातच आर्थिक व्यवहाराशिवाय लष्करी डावपेच आखण्यासाठी व रणनीती ठरवण्यासाठीही उपयोगी आहेत. दुसऱ्या महायुद्धात नॉयमन यांनी मॅनहॅटन प्रकल्पावर काम केले; ज्यात पहिला अणुबॉम्ब बनवला गेला. गणिती सेवांसोबत न्युक्लीय इंधन स्फोटाकरता अंत:स्फोट तंत्राचा वापर करावा, ही नॉयमन यांची सूचना महत्त्वाची ठरली. त्यांनी युद्धानंतर अमेरिकन सरकारसाठी आणि उद्योग व्यवसायातही सल्लागार म्हणून काम केले.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

संगणक कार्यान्वित करण्यासाठी स्मृतिमंजूषेतून क्रमवारीने माहिती घेऊन आज्ञावलीने तिच्यावर प्रक्रिया करीत जावे, ही त्यांची महत्त्वाची संकल्पना सर्वसामान्य संगणकात आजही वापरली जाते. म्हणूनच आपल्या संगणकांना ‘नॉयमन आर्किटेक्चर’ आधारित म्हटले जाते. त्यांनी संगणकाच्या क्षेत्रात ‘बीट’ या एककाचा वापर करण्यास सुरुवात केली. तसेच संगणकाच्या विविध अविश्वसनीय घटकांपासून विश्वसनीय उत्तरे मिळवण्यासारखे जटिल प्रश्न सोडवले. नॉयमन यांच्या विस्तृत आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेसाठी शुद्ध आणि उपयोजित गणित तसेच अनेक शास्त्रांचा समावेश असलेली ‘ऑटोमॅटा थिअरी’ हे एक आदर्श क्षेत्र होते. आयुष्याची शेवटची काही वर्षे संगणक आणि जीवशास्त्र एकत्र आणण्याचे नॉयमन यांचे प्रयत्न कर्करोगाने ८ फेब्रुवारी १९५७ रोजी झालेल्या त्यांच्या मृत्यूमुळे अर्धवट राहिले. अनेक उच्च मानसन्मान मिळालेले नॉयमन हे विसाव्या शतकातील अतुलनीय गणितज्ञ होत असे मानले जाते.

– निशा पाटील

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org