जोसेफ ब्लॅक स्कॉटिश डॉक्टर आणि रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १६ एप्रिल १७२८ रोजी फ्रान्समधील बॉर्डेकस येथे झाला. वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत जोसेफ ब्लॅक यांचे शिक्षण घरीच झाले. त्यानंतर यु.के. मधील बेलफास्ट येथे आणि त्यापुढील शिक्षण स्कॉटलंड देशातील ग्लासगो व एडिनबरा विद्यापीठात झाले. आपल्या आयुष्यातील ३० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी ग्लासगो व एडिनबरा या विद्यापीठात शरीररचनाशास्त्र, रसायनशास्त्र व औषधशास्त्र या विषयांच्या अध्यापनात व्यतीत केला.

मूतखडय़ाच्या उपचारासाठी मॅग्नेशियम काबरेनेटच्या क्षाराचा उपयोग हा त्यांच्या पीएचडी च्या प्रबंधाचा विषय होता. मॅग्नेशिया हे खनिज, चुनखडीपेक्षा (कॅल्शियम काबरेनेटपेक्षा) वेगळे आहे असे ब्लॅक यांनी सिद्ध केले. मॅग्नेशियात एखादे मूलद्रव्य असल्याची नोंदही त्यांनी केली. त्यांनी कार्बन डायऑक्साइड वायू, पाण्याचा अप्रकट उष्मा या विषयांत संशोधन केले. पाण्याच्या अप्रकट उष्म्याच्या प्रयोगात त्यांनी असे अनुमान काढले की, बर्फाचे पाण्यात व पाण्याचे वाफेत रूपांतर करण्यासाठी पुरवलेल्या उष्णतेमुळे अनुक्रमे बर्फ आणि पाणी तसेच पाणी आणि वाफ यांच्या मिश्रणाच्या तापमानात वाढ होत नाही. परंतु या क्रियेमध्ये अनुक्रमे पाण्याच्या व वाफेच्या प्रमाणात वाढ होते. या प्रयोगावरून त्यांनी, दिलेली उष्णता बर्फकण किंवा पाण्यामध्ये सुप्त स्वरूपात शिरते असा निष्कर्ष काढला. यातूनच पाण्याचा अप्रकट उष्मा या संकल्पनेचा उदय झाला व यामधूनच उष्मागतिकी या विज्ञानशाखेचा पाया रचना गेला. कित्येक पदार्थाचा विशिष्ट उष्मा वेगळा असतो, असेही जोसेफ ब्लॅक यांनी दर्शविले. ग्लासगोमध्येच जोसेफ ब्लॅक यांची भेट वाफेच्या इंजिनाच्या संशोधकाशी म्हणजे जेम्स व्ॉट यांच्याशी झाली पण दोघांचेही अप्रकट उष्मा यावरील संशोधन स्वतंत्रपणे केलेले होते.

अठराव्या शतकातील प्रयोगशील वैज्ञानिकांप्रमाणेच जोसेफ ब्लॅक यांच्या रसायनशास्त्रातील संकल्पना जल, क्षार, पृथ्वी, अग्नी आणि धातू या द्रव्याच्या पाच तत्त्वांवर आधारित होत्या. त्यांचे संसोधन हे प्रामुख्याने वरील घटकांच्या वेगवेगळ्या  स्वरूपातील एकमेकांशी होणाऱ्या अभिक्रियांवर आधारित होते.

विद्यापीठात प्राध्यापक म्हणून व्याख्यान देणे, संशोधक म्हणून संशोधन करणे आणि त्याचबरोबर विद्यापीठाबाहेर ते श्रेष्ठ डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. ६ डिसेंबर १७९९ रोजी एडिनबर्ग येथे जोसेफ ब्लॅक यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एडिनबरा आणि ग्लासगो विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या इमारतींना त्यांचे नाव दिले आहे.

-प्रकाश मोडक

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org