21 November 2019

News Flash

निर्जंतुकीकरणाचे धडे

निर्जंतुकीकरण ही वैद्यक क्षेत्रात आज अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाची संकल्पना मानली जाते.

निर्जंतुकीकरण ही वैद्यक क्षेत्रात आज अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाची संकल्पना मानली जाते; परंतु १९ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत परिस्थिती वेगळी होती. निर्जंतुकीकरणाच्या अभावी, शस्त्रक्रिया झालेले अनेक रुग्ण मूळ कारणाऐवजी गँग्रीन होऊनच दगावायचे. कारण शस्त्रक्रियेच्या ठिकाणी संसर्ग होऊन त्यातून रुग्णाला गँग्रीन होत असे. या गँग्रीनला अटकाव प्रथम घातला गेला तो जोसेफ लिस्टर या इंग्रज वैद्यकतज्ज्ञाच्या संशोधनाने. त्या काळी वैद्यकीय क्षेत्रात असा समज होता, की जखमेतून बाहेर पडणाऱ्या दरुगधीमुळे हवा अस्वच्छ होत असावी आणि त्यामुळे गँग्रीन होतो; परंतु जर जखमा नीट स्वच्छ केल्या, तर त्यातील काही जखमा भरून येत असल्याचे लिस्टरला आढळले होते. यावरून लिस्टरने जखमेतच या गँग्रीनचे कारण शोधण्याचे ठरवले. दरम्यान लुई पाश्चरने सादर केलेले कुजण्याच्या क्रियेवरचे काही शोधनिबंध लिस्टरच्या वाचनात आले. हे शोधनिबंध वाचल्यानंतर लिस्टरला गँग्रीन म्हणजे जखमेतच आंबण्याच्या क्रियेद्वारे खोलवर झालेला जंतुसंसर्ग असण्याची शक्यता वाटली. म्हणजे, पाश्चरच्या रोगसंक्रमणाच्या सिद्धांतानुसार हा जंतुसंसर्गच होता.

गँग्रीन टाळण्यासंबंधी संशोधन करताना, लिस्टरला काबरेलिक आम्लासंबंधी काही माहिती मिळाली. सांडपाणी जिवाणूमुक्त करण्यासाठी वापरले जाणारे हे रसायन लिस्टरने जखमा स्वच्छ करण्यासाठी वापरण्याचे ठरवले. अपघातात होणाऱ्या अस्थिभंगांच्या अनेक प्रकरणांचा शेवट हा गँग्रीनमध्ये होत असे. लिस्टरने अशा प्रकरणांतील जखमा काबरेलिक आम्लाने स्वच्छ करण्यास सुरुवात केली. जखमांबरोबरच शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या वस्तूसुद्धा काबरेलिक आम्लाने धुऊन घेतल्या जाऊ लागल्या. तसेच वॉर्डमध्ये सर्वत्र काबरेलिक आम्लाचा फवारा मारला जाऊ लागला. त्या काळी शस्त्रक्रिया करताना कोणतीही काळजी घेतली जात नसे. शल्यविशारद हे ग्लोव्ह, मास्क, गाऊन अशा कोणत्याही गोष्टींचा उपयोग करत नसत. अनेक वेळा शस्त्रक्रिया करताना नेहमीचेच कपडे वापरले जात. आता लिस्टरने यावरही बंधने आणली. परिणामी ग्लासगो रॉयल इन्फर्मरीतील लिस्टर काम करत असलेल्या वॉर्डमधील मृत्युदराचे प्रमाण शून्यावर आले! लिस्टरने आपले हे निष्कर्ष १८६७ साली ‘द लॅन्सेट’ या वैद्यकशास्त्रावरील सुप्रसिद्ध शोधपत्रिकेत दोन शोधनिबंधांच्या स्वरूपात प्रकाशित केले. कालांतराने काबरेलिक आम्लाऐवजी अधिक सोयीस्कर असणाऱ्या इतर रसायनांचा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी वापर सुरू झाला असला, तरी या शस्त्रक्रियेतील र्निजतुकीकरणाचा शास्त्रशुद्ध पाया घातल्याचे श्रेय जोसेफ लिस्टर याच्याकडेच जाते.

– डॉ. रंजन गग्रे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on July 8, 2019 12:03 am

Web Title: joseph lister mpg 94
Just Now!
X