१४०७ साली गुजरातच्या काही प्रदेशांवर पठाणांची सल्तनत सुरू झाली. गुजरातचा पठाण सुलतान महमूदशाह प्रथम याने १४७२ मध्ये जुनागढ घेऊन ते गुजरात सल्तनतमध्ये सामील केले. पुढे जुनागढ राज्य मोगलांच्या अमलाखाली गेले. गुजरातच्या मोगल सुभेदाराकडे नोकरीस असलेला पठाण सेनाधिकारी मोहम्मद शेरखान बाबी याने मोगल साम्राज्याच्या अस्तकाळात जुनागढ ताब्यात घेऊन आपण जुनागढचे नवाब असल्याचे घोषित केले. जुनागढवर १७३० साली स्थापन झालेली बाबी घराण्याची सत्ता पुढे जुनागढ संस्थान १९४८ साली स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत टिकली.  जुनागढवर दोन शतके राज्य केलेल्या बाबी घराण्याचे एकूण नऊ नवाब झाले. स्वत:च्या नावापुढे हे बाबी नवाब, ‘खानजी’ असा खिताब लावून घेत. नवाब मोहम्मद शेरखान आणि नंतरच्या दोन नवाबांनी शेजारचे परगाणे घेऊन जुनागढचा मोठा राज्यविस्तार केला. १८०७ ते १९४८ या काळात जुनागढ हे एक ब्रिटिशअंकित, संरक्षित संस्थान बनून राहिले. जुनागढचा अखेरचा नवाब मोहम्मद महाबत खानजी तृतीय याची कारकीर्द त्याचे अचाट प्राणिप्रेम आणि जुनागढ राज्य पाकिस्तानात विलीन करण्याच्या निर्णयामुळे गाजली. नवाब महाबत खानजी उत्तम प्रशासक होता. पुस्तकप्रेमी महाबतने शैक्षणिक संस्थांना भरघोस मदत करून प्राथमिक शिक्षण मोफत केले. ‘बहादूर खानजी ग्रंथालय’ आणि ‘महाबत खान महाविद्यालय’ स्थापन केले. जुनागढचे राज्यकत्रे मुस्लीम असले तरी बहुसंख्य प्रजा िहदू होती, परंतु या राज्यात एकही धार्मिक दंगल झाली नाही.  जुनागढचे बहुतेक पठाण राज्यकत्रे त्यांच्या चोख प्रशासनाबद्दल विख्यात होते. नवाब महाबत खानजीपूर्वी राज्यातील महसूल वसुलीचे काम पटेल समाजाच्याच लोकांना देण्याची पद्धत होती. या पद्धतीत अफरातफर करण्यास मोठा वाव असल्यामुळे महाबतने ग्रामसमित्या तयार करून त्यांच्याकडे महसुलीची व्यवस्था सोपवली.  खानजीचा मृत्यू पाकिस्तानात १९५९ साली झाला.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com