श्रुती पानसे contact@shrutipanse.com

मोठं होऊन काम- व्यवसायाला लागेपर्यंत आपल्यात साधारणत: कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत याचा शोध लागू शकतो. मात्र लहानपणापासून आपली एक खास बुद्धिमत्ता असते. त्याला पूरक अशा इतर एक किंवा दोन बुद्धिमत्ता असतात. या नैसर्गिक बुद्धिमत्ता कधी आपण छंदाच्या रूपाने जोपासतो. खरं तर हे आपल्या मेंदूतल्या विशिष्ट जागांवरचे न्युरॉन्स आहेत आणि त्यांच्या जुळणीचा विशिष्ट वेग आहे.

मोठं झाल्यावर तू कोण होणार? असे प्रश्न लहान मुलांना वेगवेगळ्या वयांत आपण विचारतो. मुलं कधी म्हणतात, ट्रॅफिक सिग्नलवरचा पोलीस. कारण त्यांनी त्या पोलिसाचा रुबाब बघितलेला असतो. कधी मुलं म्हणतात, डॉक्टर होणार. कारण डॉक्टर आपल्याला बरं करतात, म्हणजे ते चांगले आहेत, हे मुलांना माहीत असतं. मी सन्यात जाणार, विमान चालवणार, मी शिक्षक  होणार, असे सर्व सकारात्मक, चांगलेच व्यवसाय मुलांना करावेसे वाटतात.

मुलांसमोर जे दिसतं त्यातलंच काहीतरी त्यांना व्हावंसं वाटतं. आता आधुनिक काळात त्यांच्यासमोर अनेक व्यवसाय खुले आहेत. टीव्ही, इंटरनेटमधून नवीन व्यवसायाची माहिती मिळते आहे, त्याचबरोबर आतापर्यंत अस्तित्वात नसलेले व्यवसाय स्वत:च्या अक्कलहुशारीने तयार करावेत हे नवं भानही येतंय. टीव्हीमुळे अनेक कलाकारांना, लेखक, कवींना, तंत्रज्ञ, बॅकस्टेजवर काम करणारे कित्येक जण यांना व्यवसाय मिळाला आहे. हातातल्या मोबाइल कॅमेऱ्यामुळे फोटोग्राफी, शॉर्ट फिल्मसुद्धा चित्रित केली जात आहे. फेसबुक, इंटरनेटमुळे आपल्या व्यवसायाची जाहिरात करणं, आपल्याला हव्या त्या व्यवसायासाठी उपयुक्त अशा लोकांचं नेटवìकग करणं, चांगल्या कल्पनांचं आदानप्रदान करणं याला चांगली संधी आहे. ब्लॉग्जमुळे नवे लेखक तयार होताहेत. आपले विचार, आपलं लेखन प्रसिद्ध, तयार करण्यासाठी त्यांना विशेष परिश्रम घ्यावे लागत नाहीत. दहावी – बारावीच्या उंबरठय़ावरील मुलामुलींच्या पालकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. मुलांचा जिथे कल असेल त्यानुसार शिक्षण आणि करिअर निवडू द्यावं. एखादं क्षेत्र असं असतं की जिथे आर्थिक सुरक्षितता नाही, म्हणून पालक विरोध करतात. अशा वेळी मुख्य कोर्स वेगळा आणि त्याला सबकोर्स असावा. तो तरी मुलांच्या बुद्धिमत्तेनुसार असावा. नैसर्गिक बुद्धिमत्तेला बगल देण्याचा प्रयत्न करू नये.