22 October 2018

News Flash

जे आले ते रमले.. : कावसजी पेटीगारा

समाजातील कावसजी पेटीगारा हे १९२८ साली मुंबईच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्त झाले.

मूळच्या इराणी असलेल्या पारशी समाजातील लोकांनी भारतीय संस्कृतीत समरस होऊन त्यातील अनेक व्यक्तींनी व्यापार, उद्योग, कलाक्षेत्र, सरकारी नोकऱ्या यांत पूर्वापार आपल्या कौशल्याने वेगळा ठसा उमटवला. याच समाजातील कावसजी पेटीगारा हे १९२८ साली मुंबईच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्त झाले. ते त्यांच्या जाज्वल्य कर्तव्यनिष्ठेबद्दल विख्यात आहेत. ब्रिटिशराज काळात एखादी बिगर युरोपियन व्यक्ती पोलीस खात्यात एवढय़ा उच्च पदावर पोहोचण्याचे हे पहिलेच उदाहरण! त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, शौर्य या गुणांची पारख करून ब्रिटिश सरकारने १९१६ साली त्यांना ‘खान बहादूर’ हा खिताब देऊन गौरव केला. त्यांचा पूर्णाकृती संगमरवरचा पुतळा मुंबईच्या धोबीतलावच्या फ्रामजी कावसजी इन्स्टिटय़ूटच्या बाहेर १९४२ साली उभा केलेला आहे.

HOT DEALS

मुंबईत १८७७ साली जन्मलेले कावसजी जमशेदजी पेटीगारा यांचे शिक्षण प्रथम सुरतेत आणि मुंबईत झाले. कुठल्याही प्रकारचे पोलीस खात्याचे शिक्षण नसताना १९०३ साली ‘वर्दी’ नसलेले, साध्या कपडय़ांमध्ये ते पोलीस भरती झाले. त्या काळात अशा पोलिसांना ‘सफेदवाला’ असे नाव होते. ते भरती झाल्यावर सहा वर्षांनी १९०९ मध्ये ‘क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट’ म्हणजेच सीआयडी हा नवा विभाग सुरू झाला. सीआयडी खात्याचे दोन उपविभाग होते. गुन्हेगारी आणि राजकीय. यापैकी राजकीय उपविभागात कावसजीची नियुक्ती सबइन्स्पेक्टर या पदावर झाली. सीआयडीच्या राजकीय विभागाला सध्या ‘स्पेशल ब्रँच’ असे नाव आहे.विशेष शिक्षण नसूनही कावसजींना एकदम सबइन्स्पेक्टर पदावर नियुक्त केले गेले त्यामागे एक विशेष कारण होते. त्यांना मुंबई शहराबाबतची असलेली बारीक तपशिलातली माहिती आणि दुसरे म्हणजे कुठे काय चाललंय याची बित्तंबातमी काढण्यात त्यांचा हात धरणारा कुणी नव्हता! त्यामुळेच त्यांच्या संपूर्ण पोलीस कारकीर्दीत त्यांना सीआयडीमध्येच नियुक्त केले गेले! कोणत्याही पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती कधीच झाली नाही. कावसजींच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना बढत्याही भराभर मिळत गेल्या. १९२० साली ते सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस (स्पेशल ब्रँच) झाले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on April 17, 2018 3:43 am

Web Title: kavasji jamshedji petigara former mumbai deputy commissioner