चिस्तिया या सुफी संप्रदायाचे भारतातील प्रमुख संत ख्वाजा मोईनोद्दीन चिस्ती यांचे उत्तराधिकारी ख्वाजा कुतुबोद्दीन बख्तियार काकी यांनी दिल्ली आणि उत्तर भारतात सुफी मताचा प्रसार केला. बख्तियार काकींची जीवनशैली एखाद्या व्रतस्थ तपस्व्याप्रमाणे होती. त्याग, औदार्य, सहिष्णुता, ध्यानधारणा यांचे ते आदर्श होते. बख्तियार यांनी त्यांचा उपदेश, वचने कुठेही लिहून ठेवलेली नाहीत. सुफी, तसव्वुफ- तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी ते लहान मोठे मजलिस म्हणजे मेळावे भरवीत आणि उपदेश करीत. त्यात मिळालेला बहुतेक पसा गोरगरिबांना वाटून टाकीत.

बख्तियारनी अनेकदा चमत्कार दाखवले, असे सांगितले जाते. ते राहत त्या गल्लीच्या टोकाला एक जण भाकऱ्या करून विकत असे. अनेकवेळा बख्तियारकडे भाकरी घेण्यासाठी पैसे नसत. भाकरीवाल्याला हे माहिती होते तरीही तो निमूटपणे चार काक बख्तियारच्या घराबाहेर निमूटपणे आणून ठेवत असे. ‘काक’ म्हणजे भाकरीसारखा खाण्याचा पदार्थ. एकदा तो काक बनवणारा माणूस परगावी गेल्याने बख्तियारच्या घराबाहेर चार दिवस काक ठेवल्या गेल्या नाहीत. पण काय आश्चर्य! ते चारही दिवस त्यांच्या घराबाहेर काक ठेवलेले आढळले! भाकरीवाला गावाला गेला आहे, हे बख्तियारला माहीत नव्हते. तो गावाहून आल्यावर या भाकऱ्या कोणी ठेवल्या याचा उलगडा झाला नाही. हे अल्लाहचेच काम असावे अशी लोकांची धारणा होऊन या चमत्कारामुळे ‘काकी’ हे विशेषण त्यांच्या नावापुढे जोडले गेले आणि त्यांचे नाव बख्तियार काकी झाले.

बख्तियार काकींना समाची आवड होती. समा म्हणजे परमेश्वराच्या भक्तिपूर्ण कव्वाली गायनाची बैठक. शेख अहमद जायसींची कव्वाली ऐकतानाच दिल्लीत १२३७ साली त्यांचे निधन झाले. त्यांची बोधवचने त्यांचा शिष्य परिदोद्दीन गंजेशक्कर ऊर्फ बाबा फरीद याने एकत्रित करून ‘फवायुदलसायकीन’ या नावाने प्रसिद्ध केली. बख्तियार यांच्या ‘कुतुबोद्दीन’ या नावावरूनच त्यांचे स्मारक म्हणून दिल्लीच्या सुलतानांनी प्रसिद्ध ‘कुतुबमिनार’ बांधलाय. मेहरोली येथील बख्तियारच्या दग्र्याजवळ सुलतान कुतुबुद्दीन आणि इल्तमशने गंधककी बावली ही पायऱ्यांची विहीर, बहादूरशाहाने मोती मसजिद बांधली आहे.    (उत्तरार्ध)

सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com